प्रतापगड किल्ल्यावर उभं राहिल्यावर आपण सभोवताली नजर फिरवली की इंग्रजी ’M’ सारखा आकार असलेला एक अत्यंत लक्षवेधी डोंगर आपल्या नजरेत भरतो. महाबळेश्वरच्या अनेक पॉईंट्सवरूनही एव्हाना या अनोख्या डोंगराने आपल्या मनात कुतूहल निर्माण केलेले असते. पण, हा नुसता डोंगर नाही बरं का... तर हा आहे, कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला आणि सातारा व रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर उभा असलेला एक किल्ला आणि गंमत म्हणजे, या किल्ल्याचं नावही त्याच्या आकाराप्रमाणेच ’च’ या अक्षरावरूनच आहे. हा किल्ला म्हणजे मधुमकरंदगड!
मधुमकरंदगडावर पूर्वी जाण्यासाठी पायथ्याच्या हातलोट किंवा चतुर्बेट या गावांमधून किर्रर्र जंगलाचा मनमुराद आस्वाद घेत चांगली दीड-दोन तासांची पायपीट करावी लागत असे. कोयनेच्या खास जंगलभटकंतीचा ‘फील’ देणारा हा एक उत्कृष्ट ट्रेक! पण, गडावर वसलेल्या घोणसपूर या छोटेखानी वस्तीतील ग्रामस्थांच्या सोयीसाठी चतुर्बेट गावातून घोणसपूरपर्यंत कच्चा गाडीमार्ग तयार करण्यात आला असून, बाईक किंवा उत्तम ‘ग्राऊंड क्लियरन्स’ असलेले कोणतेही वाहन घेऊन आपण अगदी सहज घोणसपूरपर्यंत पोहोचू शकतो. ज्यांना जंगलभटकंतीचा अनुभव घ्यायचाच आहे, त्यांनी हातलोट गावातून चढाई केली तरी घोणसपूर गाठता येते. घोणसपूर गाव अत्यंत देखणं असून, कमालीची नैसर्गिक शांतता, माथ्यावरून दिसणारा विस्तीर्ण आसमंत आणि एक निवांतपणा यामुळे हे गाव पहिल्या भेटीतच सुखावून जाते. गावातून गडाकडे जाताना पायथ्याला महादेवाचं म्हणजेच मल्लिकार्जुनाचं मंदिर असून, मुक्कामासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. मंदिर परिसरात काही सतीशिळा असून, त्याही आवर्जून बघाव्यात. मंदिर बघून सोप्या पायवाटेने आपण गडाकडे जायला लागलो की, १५-२० मिनिटांत भग्न प्रवेशद्वारातून आपला बालेकिल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशद्वाराच्या बुरुजाचे काही भग्नावशेष इथे आपल्याला दिसतात.
इथून पुढे गडमाथ्याकडे जाताना पाषाणात कोरलेलं एक वीराचं शिल्प आपल्याला बघायला मिळते. इथून थेट गडमाथ्यावर न जाता मकरंदगडाचं आकर्षण असलेले आणि गडाच्या पोटात खोदून काढलेले खांबटाकं बघायला आपण निघायचे. गडाचा कातळ डावीकडे ठेवत जराश्या अरुंद वाटेने आपण पुढे गेलो की, प्रतापगडाच्या दिशेकडे तोंड करून असलेले खांबटाकं आपल्याला बघायला मिळते. या ठिकाणी निवांत बसून त्या अमृतमय पाण्याचे घोट घशाखाली रिचवतानाचा आणि त्याचवेळी अंगावरून वाहणार्या थंडगार वार्यांच्या झुळुकीचा आस्वाद तो काय वर्णावा! अत्यंत थंडगार असलेले हे पाणी हा गडावरचा एकमेव जलस्रोत आहे. इथे जरा श्रमपरिहार करून टाक्याच्या जवळच असलेल्या पायर्यांच्या वाटेने आपण जरा दमवणारी चढाई करायची आणि १५ मिनिटांत गडमाथा गाठायचा. गडावरही या ठिकाणी मल्लिकार्जुन मंदिर असून याची स्थापना खुद्द शिवछत्रपतींनी केल्याचे जाणकार सांगतात. मधुमकरंदगडावरील हे मंदिर जावळीच्या मोरे घराण्याच्या सप्तशिवपुरीपैकी एक असल्याने, इतिहासात या ठिकाणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
मधुमकरंदगडाचं वैशिष्ट्य म्हणजे, हा अनेक ठिकाणी ‘जोडकिल्ला’ म्हणून जरी ओळखला जात असेल, तरी आपण ज्या मकरंदगडावर उभे आहोत, त्याच्या शेजारच्या मधुशिखरावर मात्र सध्यातरी कोणतेही अवशेष नसल्याने याला ‘जोडकिल्ला’ म्हणावे का, हा प्रश्नच आहे. इथे जाण्याची वाटही अत्यंत निसरडी व धोकादायक असल्याने इथे जाणे टाळलेलेच योग्य. मकरंदगडावर याव्यतिरिक्त कोणतेही अवशेष नसल्याने अगदी तासाभरात आपली गडफेरी संपते.मकरंदगडावरून दिसणारा प्रदेश मात्र सगळा शीण कुठल्याकुठे घालवणारा आहे. गडमाथ्यावरून महाबळेश्वरचे विस्तीर्ण पठार, कोयना बॅकवॉटर्स, प्रतापगड, महिपतगड-सुमारगड-रसाळगड हे रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गत्रिकुट, दहीमुरा, रामरान, कावळ्याचा पाडा, हातलोट घाट, कोंडनाळ, मल्लिकार्जुन पर्वत, चकदेव व नशीब अगदीच जोरदार असेल, तर राजगड, तोरणा व रायगडाचेही दर्शन होऊ शकते. मकरंदगडाच्या परिसरात तेलीसरी, अंगठेसरी, अस्तानसरी, कासारसरी, दौडासरी/धावडासरी इत्यादी अनेक दुर्गम घाटवाटा असून, कोकणातल्या कांदोशी परिसरात जाण्यासाठी त्या आजही वापरल्या जातात.
कसं जायचं?
महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील पार फाट्यावरून आत शिरवली मार्गे चतुर्बेट गावी येऊन पुढे गाडीने घोणसपूरला जात येते किंवा चतुर्बेटच्या अलीकडेच हातलोट गाव असून तिथून दीड तासांचा ट्रेक करता येतो.
पाण्याची सोय : गडावर पिण्यायोग्य पाणी उपलब्ध आहे.
जेवणाची सोय : गडमाथ्यावर जेवणाची सोय उपलब्ध नाही. घोणसपूर येथे विनंती केल्यास घरगुती जेवण मिळू शकते.
ओंकार ओक
oakonkar@gmail.com