वन्यजीव रक्षणाचा वस्तुपाठ

    07-Feb-2024   
Total Views |
Article on Avinash Harad

फोटोग्राफीच्या छंदापासून सुरू झालेला पर्यावरण क्षेत्रातील प्रवास... वन्यजीव संवर्धनाबरोबरच अन्य क्षेत्रांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणार्‍या ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश हरड यांच्याविषयी...

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळापासून पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी झटणारे, सध्या ठाण्याचे मानद वन्यजीव रक्षक म्हणून कार्यरत असलेले अविनाश हरड. पर्यावरणाबरोबरच इतर क्षेत्रांमध्ये काम करणार्‍या अविनाश यांचा जन्म जुलै १९८२ मधील मासले बेलपाडा गावातील. माळशेज घाटाच्या वरील भागात असलेल्या टोकावडे येथे प्राथमिक शिक्षणाची सुरुवात करून पुढे माध्यमिक शिक्षणासाठी ते शहराजवळ आले. कल्याणच्या आर. एम. ओक महाविद्यालयात त्यांनी सातवी ते दहावीचे शिक्षण पूर्ण केले आणि पुढे महाविद्यालयीन शिक्षणासाठी बिर्ला महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनापासूनच अविनाश यांना फोटोग्राफीचा छंद. जंगलात जाऊन फूल, पक्षी, प्राणी अशा जैवविविधतेचे फोटो टिपण्याचा छंद जोपासतच त्यांना पर्यावरणाविषयी कुतूहल निर्माण होऊ लागले. छायाचित्रणाचा छंद जोपासत असतानाच, जंगलामध्ये असलेली पुरातन मंदिरे दिसल्यानंतर त्यांच्याबद्दल आत्मियता वाटून ती वाचावीत, टिकावीत, असे त्यांना मनापासून वाटू लागले. त्याबरोबरच त्यांनी अशाप्रकारच्या पुरातन मंदिरांच्या छायाचित्रणालाही सुरुवात केली.

ही मंदिरे टिकायला हवीत, असं वाटून त्यांनी यासाठी अभ्यासही सुरू केला. बिर्ला महाविद्यालयामध्ये वाणिज्य शाखेतून पदवीधर झालेल्या अविनाश यांनी पुढे ‘एंडोलॉजी’मध्ये (भारतीय पुरात्त्व) पदव्युत्तर पदवीही घेतली. पुण्यातील टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून त्यांनी ही पदवी घेतली. त्यावेळी ‘एशियाटिक सोसायटी’कडून मुरबाड तालुक्याच दस्तऐवजीकरण करण्यासाठी त्यांना फेलोशिपही मिळाली होती. यादरम्यानच, अविनाश यांनी एक संग्रहालयही सुरू केले. उल्हास नदी या कोकणातील सर्वांत मोठ्या नदीच्या असलेल्या खोर्‍याच्या अनुषंगाने हे वस्तूसंग्रहालय बनविण्यात आले आहे. या खोर्‍यामध्ये बर्‍याच मोठ्या प्रमाणावर असलेली जैवविविधता, तसेच सामाजिक, भौगोलिक अंग यादृष्टीने हे संग्रहालय बनविण्यात आले असून, नदीच्या अनुषंगाने बनविण्यात आलेले हे भारतातील पहिलेच संग्रहालय. मात्र, काही कायदेशीर बाबींमुळे ते अद्याप सुरू होऊ शकलेले नाही, हे अविनाश खेदाने सांगतात.
 
या सर्व कामांबरोबरच पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होतेच. एवढे कमी म्हणून की काय, या जोडीला सध्या ते कायद्याचे शिक्षणही घेत आहेत. अविनाश यांनी या सर्व कामाचा विस्तार करत ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ची स्थापना केली. २००२ पासून सुरू झालेल्या या प्रतिष्ठानने अनेक क्षेत्रांमध्ये काम केले. २०१४ मध्ये हे प्रतिष्ठान नोंदणीकृत झाले असून, याअंतर्गत ‘सीड बँक’, नर्सरी, रेस्क्यू सेंटर, संग्रहालये अशा विविध शाखांमध्ये काम सुरू आहे. २०१८ मध्ये ‘प्रकृती’ या नावाने सुरू केलेल्या ‘रेस्क्यू सेंटर’मध्ये महाराष्ट्र वनविभागाच्या समन्वयातून प्राणी, पक्षी आणले जातात. जखमी किंवा आजारी अवस्थेतील अशा साडेसहा हजारांहून अधिक जीवांवर उपचार केले आहेत. यामध्ये सर्वाधिक सरपटणार्‍या प्राण्यांचा समावेश असून, त्यामध्ये कासवे, विविध जातींचे सर्प यांचा समावेश आहे. तसेच, अनेक पक्षी-प्रजातींवरही उपचार करण्यात आले आहेत. त्या खालोखाल सस्तन प्राण्यांवरही उपचार करण्यात आले असून यामध्ये चौशिंगे, सिव्हेट, कोल्हे, बिबटे इत्यादी प्राणी प्रजातींचा समावेश आहे. याबरोबरच ‘अश्वमेध प्रतिष्ठान’ माहिती संकलनाचे काम करत असून, या प्रतिष्ठानाची तीन वस्तुसंग्रहालयेही आहेत.

पर्यावरण क्षेत्रातील अविनाश यांचे आणखी एक उल्लेखनीय काम सांगायचे म्हणजे भीमाशंकर अभयारण्यातील सिद्धगडचे. २००४ सालची गोष्ट. भीमाशंकर अभयारण्याच्या मागच्या बाजूला असलेला सिद्धगड किल्ल्यावर दि. २६ जुलै, २००५ रोजी दरड कोसळली. ज्यावेळी मुंबई पाण्याखाली बुडाली होती आणि सर्वांचे लक्ष मुंबईकडे लागलेले असताना, सिद्धगडच्या दुर्घटनेकडे कुणाचे फारसे लक्ष नव्हते. त्यामुळे इथे लक्ष घालून अविनाश यांनी सिद्धगड पुनर्वसनासाठी प्रयत्न सुरू केले. येथील स्थानिक लोकांना तात्पुरते दुसर्‍या ठिकाणी स्थलांतरित करून त्यांच्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. आता अतिवृष्टी झाली तरी स्थानिकांच्या डोक्यावर हक्काचे छप्पर उपलब्ध आहे. या कामाबरोबरच त्यांनी तिथले दस्तऐवजीकरण आणि इतर माहिती मिळवणे सुरू केले. यानिमित्त पर्यावरणाबरोबरच त्या भागातील सामाजिक समस्या, संस्कृती, लोकांच्या आर्थिक समस्या इत्यादी अनेक गोष्टी हळूहळू माहीत होऊ लागल्या. भीमाशंकर अभयारण्य शेकरु संवर्धनासाठी तयार करण्यात आले होते. पण, आता शेकरुच नाही, तर इथे बिबटेही दिसून येतात. त्यामुळेच हा अधिवास संवर्धित आणि पुनरूज्जीवित करणे शक्य झाल्याचे सांगत, अविनाश यांनी या कामाची यशस्वीताच पटवून दिली.

अविनाश महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत घेऊन देवराई संवर्धन, संरक्षण, पाणवठ्यांचं संवर्धन, प्लास्टिक निर्मूलन, किनार्‍यांची सफाई असे अनेक उपक्रम सातत्याने राबवितात. तसेच, वनवे नियंत्रित करण्यासाठी लाल रेषा (फायर लाईन) काढण्याचे कामही ते मुलांमार्फत करून घेतात. जेणेकरून पर्यावरणाच्या कामास हातभार लागून विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीही होते. “आपण खूप ‘ग्लोबल’ झालो आहोत, पण आता आपल्याला ‘लोकल’ होण्याची गरज आहे,” असे म्हणणारे अविनाश आपल्या परिसरापासून पर्यावरणाच्या किंवा इतर कुठल्याही कामाची सुरुवात करायला हवी, असे पोटतिडकीने सांगतात. यापुढेही माहिती आणि दस्तऐवजीकरणाच्या पार्श्वभूमीवर वन्यजीव भ्रमणमार्गांसाठी काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.