आता उत्तराखंडमध्ये हलाला-बहुपत्नीकत्वावर बंदी येणार
06-Feb-2024
Total Views | 30
नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभेत समान नागरी कायदा (UCC) लागू करण्यात आला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी यूसीसी विधेयक सभागृहात मांडले. आता उत्तराखंड विधानसभा यावर चर्चा करेल आणि त्यानंतर ते पास होईल.उत्तराखंडचे मुख्यमंत्री धामी यांनी विधानसभेत समान नागरी कायदा मसुदा सादर करताच तिथे उपस्थित आमदारांनी वंदे मातरम आणि जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. दुपारच्या जेवणानंतर या विधेयकावर चर्चेसाठी वेळ निश्चित करण्यात आला. यावर आता विधानसभेत दुपारी दोनपासून चर्चा होणार आहे. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडताना भारतीय राज्यघटनेची प्रत हाती घेतली होती.
उत्तराखंड विधानसभेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात आले आहे. हे सत्र दि.५ फेब्रुवारी २०२४ पासून सुरू झाले असून ते दि.८ फेब्रुवारी २०२४ रोजी संपेल. या विधेयकाला दि.४ फेब्रुवारी २०२४ ला उत्तराखंड मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.या विधेयकाचा मसुदा उत्तराखंड सरकारच्या २ फेब्रुवारी रोजी पाच सदस्यीय समितीने सादर केला होता. या विधेयकातील बारकावे समजून घेऊन त्याला आकार देण्यासाठी हे पाच सदस्यीय पॅनल तयार करण्यात आले होते. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती रंजना देसाई अध्यक्षस्थानी होत्या.या विधेयकाच्या सादरीकरणासह, उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य बनले आहे जेथे विधानसभेत UCC कायदा सादर केला गेला.