विखार आणि विकास

    06-Feb-2024   
Total Views |
UBT group chief Uddhav Thackeray Travelled by Vande Bharat Train
 
'मोदींनी दहा वर्षांत काय केले? कुठे आहे विकास? महागाईने जनता हैराण आहे. मोदींना भाजपकडून प्रभू श्रीरामाच्या जागी दाखविण्याचा प्रयत्न...’ वगैरे वगैरे बरीच बाष्कळ बडबड उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिल्लक टोळक्याने नुकत्याच पार पडलेल्या ठाकरेंच्या कोकण दौर्‍यादरम्यान केली. आता ठाकरी-टोमणे शैलीची विखारी लाखोली वाहिल्यानंतर, तर उद्धव यांना कोकणची गरमी चांगलीच बोचली. मग काय, हेच ठाकरे दाम्पत्य चक्क दौरा आटोपून चिपळूणहून मुंबईकडे ‘वंदे भारत’ रेल्वेने निघाले. हे म्हणजे, समोरच्याला चोर चोर म्हणून आधी हिणवायचे आणि नंतर मात्र त्याच चोरीच्या गाडीतून आलिशान प्रवास करायचा, असा हा ढोंगीपणा! उद्धव ठाकरे यांची अख्खी कारकिर्दीच म्हणा अशा दुटप्पीपणाने माखलेली. शरद पवार, अजित पवार आणि एकूणच काँग्रेस पक्षाबद्दल ठाकरेंची महाविकास आघाडी स्थापनेपूर्वी काय भूमिका होती, ते वेगळे उगाळायला नको. आताही ठाकरे तोच गित्ता गिरवताना दिसतायत. ‘मोदींनी विकासच केला नाही’ म्हणून फुसके शाब्दिक बाण सोडायचे आणि मोदींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘वंदे भारत’ने प्रवास करायचा, अशी ही सोयीस्कर भूमिका. आता ‘वंदे भारत’ने आपण प्रवास केला, तर चर्चा तर होणारच, याची ठाकरेंना कल्पना नव्हती का? तर तसे अजिबात नाही. उलट ठाकरेंनी कोकण दौर्‍यात “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शत्रू मानत नाही. पण, ते मला शत्रू का मानतात. माझी चूक काय?” असे म्हणत स्वत:ची पडती बाजू सावरण्याचा केविलवाणा प्रयत्नही केला. त्यानंतर लगोलग ठाकरेंनी मुंबईकडे ‘वंदे भारत’ने प्रयाण केले. पण, तिथे उपस्थित एकाही पत्रकाराला मोदींना एकीकडे शिव्या हासडता आणि दुसरीकडे त्याच मोदींच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘वंदे भारत’ने प्रवास का करता, असा प्रश्न उपस्थित का करावासा वाटला नाही? यावरुन ठाकरेंनी मोदींकडे मैत्रीचा हात पुन्हा पुढे केल्याच्या चर्चांनाही उधाण आले. उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नितीशकुमार ठरणार वगैरे चित्रही माध्यमांनी रंगवले. असे हे उद्धव ठाकरे स्वत:ला कोकणचे भाग्यविधाते मानतात. मग सर्वसामान्य कोकणी माणसाप्रमाणे लालपरीने, सामान्य रेल्वेने धक्के खात ठाकरेंनी मुंबईपर्यंत प्रवास का केला नाही? असो. मुख्यमंत्री असताना स्वत:चे वाहन चालवण्याचे कौशल्य दाखविणार्‍या ठाकरेंची यंदा मात्र ‘शायनिंग’ची ही संधी हुकली, नाही का?
 
उद्विग्न आणि उद्ध्वस्त
 
"मागच्या चार दिवसांत मला कोकणात दिसलं की, एक वेगळं भगवं वादळ हे आता दिल्लीच्या तख्तावर आदळणार आहे. काहींच्या मनात अजूनही प्रश्न आहे की, ‘इंडिया’ आघाडी आहे, महाविकास आघाडी आहे, पण पर्याय कुठे आहेत? पण, लक्षात ठेवा, हुकूमशाहीला पर्याय द्यायचा नसतो. हुकूमशाही उखडून फेकायची असते, हाच पहिला पर्याय असतो. आपल्याला तेच करायचं आहे.” इति उद्धव ठाकरे. यातील ‘हुकूमशाही उखडून फेकायची असते’ याच तत्वानुसार एकनाथ शिंदे आणि त्यांच्या साथीदारांनी ठाकरेंच्या हुकूमशाहीला कायमचा सुरुंग लावत ‘पर्याय उभा केला.’ मनमानी आणि कंपूशाहीच्या ठाकरेंच्या कारभाराविरोधात शिंदेंनी बंड केले आणि उद्धव ठाकरेंची घराणेशाही, हुकूमशाही क्षणार्धात मोडीत काढली. मुख्यमंत्रिपद तर गेलेच, अख्खा पक्षही त्यांच्या याच अहंकारामुळे हातातून गेला. पण, दुर्दैव हेच की, ‘आत्मपरीक्षण’ हा शब्दच मुळी ठाकरेंच्या जीवनकोशात नाही, म्हणूनच ‘आत्मप्रौढीपणा’ त्यांना सर्वार्थाने भोवला. वास्तव हेच की, खुद्द ठाकरेंनाच ‘इंडी’ आणि महाविकास आघाडीच्या उरल्यासुरल्या अस्तित्वाबाबत शंका आहे. पण, आता स्थिती अशी की, धड ना ते एक पाऊल मागे टाकू शकतात आणि महाविकास आघाडीबरोबर पाऊल पुढे टाकले, तरी सत्तासोपानाचा मार्ग खडतरच. तरीसुद्धा ‘शिवसेनेचा मुख्यमंत्री बसवणार’ हे खोटे भावनिक आवाहन करताना ठाकरेंची जीभ अजिबात दड होत नाही, हेच त्यांचे राजकीय कौशल्य! महाविकास आघाडीत ठाकरेंचे-पवारांचे प्रत्येकी पाव पक्ष. काँग्रेसवरही फुटीचे ग्रहण कायम आहेच. वंचितचा ‘प्रकाश’ आज आहे, उद्या क्षणार्धात अंधारही करेल. त्यामुळे स्वत:ला ममता बॅनर्जी, स्टॅलिन यांसारखे राजकीयदृष्ट्या सक्षम प्रादेशिक नेतृत्व समजण्याची चूक ठाकरेंनी कदापि करू नये. ममता, स्टॅलिन यांच्याकडे पक्षाची ताकद आणि सत्तेची सोबत, दोहोंची साथ. त्यात तृणमूल आणि द्रमुक हे पक्ष त्या त्या राज्यात स्वबळावर पाय रोवून घट्ट उभे आहेत. त्यामुळे ठाकरे आणि त्यांची शिल्लकसेना अन्य प्रादेशिक नेत्यांच्या आसपासही नाही. तेव्हा, नेमके कोणाच्या बळावर ठाकरे कथित हुकूमशाही उखडून फेकणार, हे स्वत:च तेच जाणो. आधीच उखडून फेकले गेलेल्या अशा उद्विग्नाने इतरांना उद्ध्वस्त करण्याचा इतका उर्मठपणा दाखविणे बरं नव्हे!
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची