‘अब की बार नवाज शरीफ सरकार’

    06-Feb-2024   
Total Views |
Nawaz Sharif Will be pakistan pm

नवाज शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होणार, हे स्पष्ट असले तरी ते किती काळ लष्कराची मर्जी राखू शकतील, याबाबत शंका आहे. पण, वर्षानुवर्षे नवाज शरीफ यांची सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींशी घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये भारत आणि आखाती अरब देशांमध्ये संबंध मोठ्या प्रमाणावर सुधारले असल्याने त्यांचा परिणाम भारत पाकिस्तान संबंधांवरही होऊ शकेल.
 
पाकिस्तान पुन्हा एकदा निवडणुकांसाठी सज्ज झाला आहे. उद्या, गुरुवार, दि. ८ फेब्रुवारी रोजी तिथे मतदान होणार असून निवडणुकीच्या मैदानामध्ये १६७ पक्ष आणि ५ हजार, १२१ उमेदवार आहेत. २३ कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानात मतदारांची संख्या अवघी १२ कोटी, ८० लाख असून, त्यातील तब्बल ४४ टक्के मतदार ३५ वर्षांहून कमी वयाचे आहेत. २०१८ सालच्या निवडणुकांनंतर पंतप्रधान बनलेल्या इमरान खान यांना विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा ठोठावण्यात आली असून ते सध्या तुरुंगात आहेत. त्यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाचे डझनभर नेते तुरुंगात आहेत किंवा लपून बसले आहेत. पक्षाचे बॅट आणि बॉल हे चिन्ह रद्द करण्यात आल्यामुळे ते विविध चिन्हांवर निवडणुका लढत आहेत.

त्यांच्या प्रचारावर आणि पैसे उभारण्यावर अनेक निर्बंध असल्यामुळे त्यांचा समाजमाध्यमांवरील प्रचारावर जोर अधिक दिसतो. दुसरीकडे २०१८ सालच्या निवडणुकांमध्ये निवडणूक लढण्यावर बंदी घातलेले आणि विविध गुन्ह्यांमध्ये शिक्षा होऊनही प्रकृतीच्या कारणास्तव सुमारे चार वर्षं पाकिस्तानबाहेर राहिलेले नवाज शरीफ पाकिस्तानात परतले असून, चौथ्यांदा पंतप्रधान बनण्यासाठी सज्ज झाले आहेत. पाकिस्तानचे लष्कर ज्याच्या बाजूने तो पक्ष निवडणुका जिंकतो, असा इतिहास असून, यावेळेस लष्कराने नवाज शरीफ यांच्या बाजूने आपली ताकद लावली आहे. तरी देखील या निवडणुकांबाबत प्रचंड उत्सुकता आहे. इमरान खान आजही जनतेत लोकप्रिय आहेत. नेतृत्त्व तुरुंगात असतानाही त्यांच्या पक्षाला संसदेत एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळेल आणि खैबर पख्तुनख्वा या प्रांतात त्यांची सलग तिसर्‍यांदा सत्ता येईल, असा अंदाज आहे.

पाकिस्तानच्या ७७ वर्षांच्या इतिहासात ३१ वर्षं थेट लष्कराच्या हातात सत्ता राहिली असून, उरलेला काळ मुख्यतः लष्कराचा पाठिंबा असलेल्या पक्षाचे सरकार स्थापन झाले. पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय सभागृहाच्या ३३६ जागा असून, त्या लोकसंख्येच्या प्रमाणात विविध राज्यांमध्ये विभागल्या जातात. त्यातील २६६ जागा सर्वांसाठी खुल्या असून, ६० जागा महिलांसाठी राखीव असतात. दहा जागा बिगर मुस्लीम धर्मीयांसाठी राखीव असतात. पंजाबमध्ये १७३ जागा असून सिंधमध्ये ७५, तर खैबर पख्तुनख्वामध्ये ५५ जागा आहेत. बलुचिस्तानमध्ये २० जागा असून इस्लामाबादमध्ये तीन जागा आहेत. नवाज शरीफ यांच्या मुस्लीम लीगचा पंजाबमध्ये वरचश्मा असून, इमरान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ला खैबर पख्तुनख्वा आणि पंजाबमध्ये पाठिंबा आहे. बिलावल भुट्टो झरदारी यांच्या ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ला मुख्यतः सिंध प्रांतात पाठिंबा आहे.
पाकिस्तानमध्ये २००८ सालापासून लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार कार्यरत आहे.

बेनझीर भुट्टोंच्या हत्येनंतर झालेल्या २००८ सालच्या निवडणुकीत ‘पाकिस्तान पीपल्स पार्टी’ची सत्ता आली. २०१३ सालेल्या निवडणुकीत लष्कराच्या मदतीने नवाज शरीफ यांच्या ‘मुस्लीम लीग’ची सत्ता आली. भारताशी शांततेसाठी वाटाघाटी केल्यामुळे नवाज शरीफ अल्पावधीतच लष्करासाठी अप्रिय झाले. एप्रिल २०१६ मध्ये जगभरात गाजलेल्या ‘पनामा पेपर्स’ घोटाळ्यात नवाज शरीफ यांच्या तीन मुलांनी ‘ऑफशोअर’ कंपन्यांच्या माध्यमातून लंडनमध्ये आलिशान घरं घेतल्याचे उघड झाले. दि. २८ जुलै, २०१७ रोजी सर्वोच्चन्यायालयाने नवाज शरीफ यांच्याकडे पंतप्रधानपदी राहण्यासाठी आवश्यक असलेले प्रामाणिकपणा आणि सचोटी हे गुण नसल्यामुळे त्यांना राजीनामा देण्यास सांगितले. शरीफ यांनी राजीनामा दिला खरा, पण आपल्या जागी आपल्या विश्वासातील शाहिद खक्कान अब्बासी यांना पंतप्रधानपदी व आपला भाऊ शाहबाज शरीफ याला पक्षाच्या अध्यक्षपदी बसवले. लष्कराशी झालेल्या कराराचा भाग म्हणून नवाज शरीफ यांनी ऑक्टोबर २०१७मध्ये आपल्या कुटुंबीयांसह सौदी अरेबियाला प्रयाण केले. निवडणुका तोंडावर असताना पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्तरदायित्त्व विभागाने नवाज शरीफ यांना भ्रष्टाचार प्रकरणी दहा वर्षांची, त्यांची मुलगी मरियम हिला सात वर्षांची, तर जावई सफदर यांना एक वर्षांची शिक्षा ठोठावली.
 
पाकिस्तानचे लष्कर आणि ‘आयएसआय’ने इमरान खानच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. लवकरच त्यांचे इमरानशीही मतभेद झाले. इमरान खानचा कल चीन आणि तुर्कीकडे होता. इमरानने तुर्कीच्या सुफी धर्मगुरुंना बळ पुरवले. तुर्की आणि मलेशियाच्या मदतीने त्यांनी सौदी अरेबिया आणि अन्य आखाती देशांच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचाही प्रयत्न केला. परिणामी, भारत आणि आखाती अरब देशांमधील जवळीक आणखी वाढू लागली. इमरान खानने रशियाशी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करून अमेरिकेचा रोष ओढवून घेतला. आखाती देश, भारत, अमेरिका आणि इस्रायलला एकमेकांच्या जवळ येताना पाहून पाकिस्तानी लष्कराला आपण मागे पडत असल्याची जाणीव झाली. अमेरिकेने अफगाणिस्तानमधून माघार घेतल्यावर तेथे सत्तेवर आलेल्या तालिबान सरकारला स्थिरस्थावर करण्यासाठी अमेरिका मोठ्या प्रमाणावर मदत करेल, असा इमरान खान यांचा अंदाज होता. पण, अमेरिकेने अफगाणिस्तानमधून आपल्याला संपूर्णतः बाहेर काढल्यामुळे हा उद्देशही साध्य होऊ शकला नाही. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराने इमरान खान यांच्याविरूद्ध कारस्थान करून त्यांना भ्रष्टाचाराच्या तसेच देशद्रोहाच्या आरोपांमध्ये गोवले. त्यांच्या सहकार्‍यांना तसेच मित्रपक्षांना सरकारचा पाठिंबा काढायला भाग पाडले. दि. १० एप्रिल, २०२२ रोजी विरोधी पक्षांनी इमरान खान यांच्या सरकारविरोधात अविश्वास ठराव १७४ विरूद्ध शून्य मतांनी मंजूर झाला आणि नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज शरीफ पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
 
पाकिस्तानमध्ये मे २०२३ मध्ये निवडणुका होणे अपेक्षित होते. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असणारी पाकिस्तानची अर्थव्यवस्था, वाढती महागाई आणि बेरोजगारी यामुळे शाहबाज शरीफ सरकारचा विजय अवघड दिसत होता. एप्रिल २०२२ मध्ये पाकिस्तानच्या लष्कराने याच मुद्द्यांवर कोंडीत सापडलेल्या इमरान खानचे सरकार पाडले होते. पण, शाहबाज शरीफ यांच्या काळात पाकिस्तानची परिस्थिती आणखी घसरली आणि इमरान खान यांनी विरोधी पक्षनेता म्हणून अवघ्या वर्षभरात आपली लोकप्रियता परत मिळवली. मे महिन्यात निवडणुका झाल्या असत्या, तर इमरानच्या नेतृत्त्वाखाली ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले असते.

त्यामुळे नवाज शरीफ यांना पाकिस्तानमध्ये परत आणण्याची योजना बनवण्यात आली. नवाज शरीफ यांना निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्याविरूद्ध असलेले गुन्हे मागे घेणे आवश्यक होते. त्यासाठी पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उमर आटा बांदियाल निवृत्त होण्याची वाट पाहण्यात आली. इमरान खान यांना जामीन देण्यात आणि २०१८ साली नवाज शरीफ यांना शिक्षा ठोठावण्यात बांदियाल यांचा सहभाग होता. सप्टेंबर २०२३ मध्ये बांदियाल निवृत्त झाल्यावर त्यांच्या जागी काझी फैझ इसा यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर नवाज शरीफ यांच्या परतीचा मार्ग मोकळा झाला. ऑक्टोबर २०२३ मध्ये ते परतल्यानंतर निवडणुकांची घोषणा करण्यात आली.

हे घडत असताना इमरान खान यांना एकापाठोपाठ एक गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवण्यात आले आहे. गेल्याच आठवड्यात इमरान खान आणि त्यांचे परराष्ट्रमंत्री शाह महमूद कुरेशी यांना गुप्तवार्ता सार्वजनिक केल्याबद्दल दहा वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असून, सरकारी भेटवस्तूंचा अपहार केल्याबद्दल १४ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इमरान खान यांनी २०१८ साली पंतप्रधान होण्यापूर्वी बुशरा बीबी यांच्याशी विवाह केला. इमरानचा हा तिसरा विवाह होता, तर बुशरा बीबींचा हा दुसरा विवाह होता. बुशरा बीबींनी आपल्या पहिल्या नवर्‍याला घटस्फोट देऊन ४० दिवसांच्या आत इमरान खान यांच्याशी लग्न केल्याबद्दल त्या दोघांनाही सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

नवाज शरीफ पुन्हा एकदा पंतप्रधान होणार, हे स्पष्ट असले तरी ते किती काळ लष्कराची मर्जी राखू शकतील, याबाबत शंका आहे. पण, वर्षानुवर्षे नवाज शरीफ यांची सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिरातींशी घनिष्ठ संबंध आहेत. गेल्या दहा वर्षांमध्ये भारत आणि आखाती अरब देशांमध्ये संबंध मोठ्या प्रमाणावर सुधारले असल्याने त्यांचा परिणाम भारत पाकिस्तान संबंधांवरही होऊ शकेल. पाकिस्तानात नवीन सरकार स्थिरस्थावर होईपर्यंत भारतात निवडणुकांचे वारे वाहू लागले असतील. भारताला शरीफ यांच्यासोबत शांतता वाटाघाटी करण्याची कोणतीही इच्छा नसली तरी त्यांच्या विजयाने पाकिस्तानचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

अनय जोगळेकर

आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारणाचे अभ्यासक असून राजकीय घडामोडींचे विश्लेषक आणि विशेष प्रकल्पाधिकारी म्हणून ते गेली १२ वर्षं कार्यरत आहेत. वाणिज्य शाखेतील पद्व्युत्तर शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आहे. एकात्मिक जलव्यवस्थापन या विषयात ते मुंबई विद्यापीठातून पीएचडी करत आहेत.  इंटरनेट, तंत्रज्ञान, समाज माध्यमं आणि जागतिकीकरण हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत. संगणकीय मराठी आणि भारतीय भाषांमध्ये माहिती तंत्रज्ञान सहजतेने उपलब्ध व्हावे यासाठी त्यांनी काम केले असून सध्या राज्य मराठी विकास संस्थेच्या नियामक मंडळात ते अशासकीय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. मुक्त स्तंभलेखक म्हणून ते गेली ८ वर्षं विविध वर्तमानपत्र तसेच ब्लॉगच्या माध्यमातून लिहित आहेत.