धार्मिक कॉरिडोरचे अर्थकारणास बळ

    05-Feb-2024   
Total Views |
Religious Corridors
 
आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे.

काशीप्रमाणेच पूर्वेकडील आसाममध्ये माँ कामाख्या कॉरिडोर विकसित केला जाईल. यासाठी एकूण 498 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. माँ कामाख्या कॉरिडोरची पंतप्रधान मोदींनी पायाभरणी केली. त्यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”स्वातंत्र्यानंतर सत्तेत असलेल्या लोकांना प्रार्थनास्थळांचे महत्त्व कळले नाही. राजकीय कारणांमुळे त्यांनी स्वतःच्या संस्कृतीची लाज बाळगण्याची प्रवृत्ती विकसित केली.” ते म्हणाले की, ”अयोध्येतील भव्य कार्यक्रमानंतर मी आता येथे कामाख्या मातेच्या दारात आलो आहे. ‘माँ कामाख्या दिव्यलोक’ प्रकल्पाची पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले. जेव्हा ते पूर्ण होईल, तेव्हा ते देशभरातील आणि जगभरातील देवीच्या भक्तांना अपार आनंदाने भारून टाकणारा असेल.”
 
केंद्र सरकार 498 कोटी रूपये खर्चून बांधत असलेल्या, कामाख्या मंदिर कॉरिडोरवर पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”ते पूर्ण झाल्यानंतर या शक्तिपीठात मोठ्या संख्येने भाविक येतील. यामुळे संपूर्ण ईशान्येकडील पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. ते ईशान्येचे प्रवेशद्वार बनेल.” ते म्हणाले की, “ही आपल्या संस्कृतीची प्रतीके आहेत आणि हजारो वर्षांची आव्हाने असतानाही, आपण स्वतःला कसे जपले आहे. आपल्या सशक्त संस्कृतीचा भाग असलेली अनेक प्रतीके आता उद्ध्वस्त झाली आहेत. वारसा स्थळांचा विकास आणि संवर्धन हे भाजपच्या ‘डबल इंजिन’ सरकारचे धोरण असल्याचे ते म्हणाले. त्यांनी आसामचे उदाहरण दिले आणि सांगितले की, हे असे ठिकाण आहे, जिथे धर्म, अध्यात्म आणि इतिहास आधुनिकतेशी जोडलेले आहेत. मोदी म्हणाले की, ”त्यांनी सुरू केलेले प्रकल्प केवळ ईशान्येकडीलच नव्हे, तर उर्वरित दक्षिण आशियाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ मजबूत करतील.श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाली असून, 2024च्या लोकसभा निवडणुकीत मंदिराचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर आता धार्मिक कॉरिडोरवर केंद्राचे लक्ष आहे आणि आता राज्य सरकारेही त्यावर लक्ष केंद्रित करत आहेत.

 ओडिशा हे त्याचे ताजे उदाहरण आहे, जेथे गेल्या महिन्यातच जगन्नाथ मंदिर हेरिटेज कॉरिडोरचे उद्घाटन झाले. काशी आणि महाकाल कॉरिडोरच्या निर्मितीनंतर येथे येणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे. याचा फायदा राज्यांनाही झाला आहे. यातून संपूर्ण राज्याचे चित्र बदलत आहे. आगामी काळात भारताला विकसित देश बनवण्यात तीर्थक्षेत्राच्या अर्थव्यवस्थेचा मोठा वाटा असेल. मंदिरांबद्दल असे म्हटले जाते की, ते स्थानिक रोजगार देतात; परंतु विकासाचे चाक फिरवण्याचीही क्षमता मंदिरांमध्ये असल्याचे सिद्ध होत आहे.गेल्या दोन वर्षांत काशी विश्वनाथांच्या दर्शनासाठी विक्रमी संख्येने भाविक आले आहेत. काशी कॉरिडोरच्या निर्मितीनंतर 13 कोटींहून अधिक भाविक काशी विश्वनाथ मंदिरात पोहोचले. दि. 13 डिसेंबर 2021 रोजी पंतप्रधान मोदींनी काशी कॉरिडोरचे उद्घाटन केले होते. काशीची भव्यता आणि दिव्यता पाहण्यासाठी आजूबाजूच्या जिल्ह्यांतूनच नव्हे, तर दूरच्या राज्यांतूनही लोक येत आहेत. कॉरिडोर तयार झाल्यानंतर पूर्वीपेक्षा जास्त भाविकांना एकाच वेळी दर्शन घेण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. कॅम्पसमधील वैद्यकीय सुविधा, अल्पोपहार, आसनव्यवस्था, गंगा गेट इत्यादी सुविधा लोकांना प्रभावित करतात. एवढ्या मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांचा थेट फायदा वाराणसीला झाला.
 
आर्थिक दृष्टिकोनातून सांगायचे, तर बनारसची अर्थव्यवस्था कॉरिडोर बनल्यापासून दहापटीने वाढली आहे. 2021 मध्ये उद्घाटनापूर्वी धार्मिक पर्यटनासाठी येणार्‍या लोकांची संख्या सोईसुविधांअभावी खूपच कमी होती; मात्र पायाभूत सुविधा आणि सुविधा वाढल्याने येथील पर्यटकांची संख्या सुमारे दहा पटीने वाढली आहे. जर कोणी पर्यटक येथे आला, तर तो येथील बाजारपेठेत एक हजार ते दोन हजार रूपये खर्च करतो आणि यामुळे येथील अर्थव्यवस्था मजबूत होते.काशी, उज्जैन, केदारनाथ आणि आता अयोध्येला मोठ्या संख्येने लोक पोहोचत आहेत. याचा उल्लेख पंतप्रधान मोदींनी केला. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ”गेल्या दहा वर्षांत परिस्थिती बदलली आहे.” ते म्हणाले की, ”गेल्या एका वर्षात 8.5 कोटी लोकांनी काशीला भेट दिली, उज्जैनमध्ये पाच कोटींहून अधिक लोकांनी महाकाल लोकाला भेट दिली आणि 19 लाखांहून अधिक भाविकांनी केदारधामला भेट दिली. राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याच्या अवघ्या 12 दिवसांत 24 लाखांहून अधिक पर्यटकांनी अयोध्येला भेट दिली.“ ते म्हणाले की, “अशा वारसा स्थळांना यात्रेकरूंची संख्या वाढल्याने, गरीब लोकांचे जीवनमानही उंचावते.“

काशी कॉरिडोर आणि राम मंदिराच्या उभारणीचा उत्तर प्रदेशला खूप फायदा झाला आहे. धार्मिक पर्यटन वाढल्यामुळे अयोध्या आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये झपाट्याने बदल होत आहेत. राज्याचे पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री जयवीर सिंह म्हणाले की, ”देशांतर्गत पर्यटनाच्या बाबतीत उत्तर प्रदेश संपूर्ण देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये राज्यात 31.85 कोटी पर्यटक आले होते. ही संख्या 2021च्या तुलनेत 180 टक्के अधिक आहे.”देशात दोन-तीन वर्षांत काशी विश्वनाथ मंदिर, सोमनाथ मंदिर, महाकाल कॉरिडोर बांधले गेले. मथुरा-वृंदावन, अयोध्यानंतर आता गुवाहाटीमध्ये कामाख्या मंदिराचे काम सुरू झाले आहे. राज्य सरकारे मंदिर विकास आणि धार्मिक कॉरिडोरवर भर देत आहेत. सध्या देशातील 20 हून अधिक मंदिर कॉरिडोरवर काम सुरू झाले असून, त्यावर सुमारे 13 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. राजस्थानमध्ये तीन कॉरिडोर, उत्तर प्रदेशमध्ये मथुरा-वृंदावन कॉरिडोर, अयोध्येत रामजन्मभूमी कॉरिडोर तसेच मध्य प्रदेशातील ओंकारेश्वरमध्ये सर्वाधिक खर्च करण्यात येत आहे. महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही असे कॉरिडोर बांधले जात आहेत. काशी कॉरिडोरच्या धर्तीवर बाबा बैद्यनाथ कॉरिडॉरचे काम वेगाने सुरू आहे. हा बदलही येत्या काही वर्षांत दिसणार आहे. रेल्वे, विमानतळ आणि रस्ते यांवरही वेगाने काम सुरू आहे. त्यामुळे येत्या काही वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आध्यात्मिक पर्यटनाचा वाटा महत्त्वाचा असणार आहे.



 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.