राम मंदिरावर बीबीसीचे कव्हरेज प्रक्षोभक! ब्रिटीश संसदेतच निषेध, खासदाराकडून चर्चेची मागणी
03-Feb-2024
Total Views | 71
मुंबई : राम मंदिर प्राण प्रतिष्ठापनेवर बीबीसीने केलेल्या नकारात्मक कव्हरेजचा निषेध करण्यात येत आहे. बीबीसी ही युनायटेड किंगडमची सरकारी मीडिया संस्था असून आता त्यांच्याच देशात बीबीसीचा विरोध करण्यात येत आहे. २२ जानेवारी रोजी झालेल्या रामलला प्राणप्रतिष्ठापणेच्या सोहळ्याचे बीबीसीने केलेले कव्हरेज हे पक्षपाती, भेदभावपूर्ण आणि प्रक्षोभक असल्याचे ब्रिटनच्या एका खासदाराने म्हटले आहे.
कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, "उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाने जगभरातील हिंदू आनंदी आहेत. परंतू, बीबीसीने एका नष्ट झालेल्या मशीदीच्या जागेवर बांधण्यात आलेली रचना असे याचे वर्णन केले. मात्र, २ हजार वर्षांपुर्वी तिथे एक भव्य मंदिर होते हे ते विसरले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, मुस्लीम पक्षाला त्याच शहरात मशीद बांधण्यासाठी ५ एकर जमीनही देण्यात आली आहे," अशी आठवण त्यांनी करुन दिली.
खासदार बॉब ब्लॅकमन म्हणाले की, "जगभरात जे काही चालले आहे त्याचे कव्हरेज बीबीसी किती निष्पक्षपातीपणे करत आहे, याची नोंद घेऊन त्यावर चर्चा व्हायला हवी. यावर हाऊस ऑफ कॉमन्सचे नेते पोनी पेनी मॉर्डोंट म्हणाले की, "बीबीसीच्या समिक्षेबाबत महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत."
त्यानंतर बीबीसीलाही या अहवालाबाबत स्पष्टीकरण प्रकाशित करावे लागले. यात त्यांनी म्हटले की, "काही वाचकांना हा लेख पक्षपाती वाटला असून त्यात भडकाऊ भाषेचा वापर करण्यात आला आहे. काय घडले याचा अचूक आणि निष्पक्ष लेखाजोखा द्यायला हवा." पण हा लेख हिंदूंचा अपमान करणारा आहे यावर बीबीसीने असहमती दर्शवली.