ब्राम्हण द्वेषाची व्हिडिओ व्हायरल करणारा पवारांचा हस्तक! नेमंक प्रकरण काय?

    29-Feb-2024
Total Views |
yogesh sawant case

दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी मराठा आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या मनोज जरांगेंच्या तोंडी ‘माझ्यावर गोळ्या झाडा’, ‘माझा बळी घ्या’ अशी आत्मघातकी भाषा आली. तसेच जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात जातीयवादी अश्लाघ्य शेरेबाजी ही केली. त्यानंतर दि.२७ फेब्रुवारीला एक व्हिडिओ समाजमाध्यामावर व्हायरल झाला. ज्या व्हिडिओतील भाषणाचे पडसाद दि. २९ फेब्रुवारी २०२४ रोजी विधानसभेत उमटले. त्या व्हिडिओत फडणवीसांवर आणि ब्राम्हण समाजावर खालच्या पातळीवर जात टिका करण्यात आली. हा व्हिडिओ एका इसमाने समाजमाध्यमावर व्हायरल केला. त्यामुळे फडणवीसांवर आणि ब्राम्हण समाजाबद्दलच्या द्वेषपूर्ण व्हीडिओ शेअर करणारी ती व्यक्ती कोण आहे? रोहित पवार आणि त्या व्यक्तीचे संबध काय आहेत? भाजप नेत्यांनी त्या व्यक्तिवर काय टिका केली आहे? यासर्व गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत.

दि.२९ फेब्रुवारीला भाजप नेते राम कदम यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, सांताक्रूज पोलीस स्थानकात २७ फेब्रुवारीला अजय पनवेलकर यांनी एक तक्रार नोंदवली. मुळात त्यांच्या मोबाईलवर एक व्हायरल व्हिडिओ क्लिप आली होती. त्यात एक इसम म्हणतो की, 'देवेंद्र फडणवीसांना आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीसांसारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू. आमच्यावर काय गुन्हे नोंदवायचे ते नोंदवा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार," असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे."दरम्यान राम कदम म्हणाले की, या व्हिडिओसंबधी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केल्यावर ती द्वेषपुर्ण व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या इसमाचं नाव योगेश सावंत असून त्यांचा बारामतीशी संबध आहे. योगेश सावंत हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा महाराष्ट्र राज्याचा सोशल मीडिया उपाध्यक्ष आहे, असे त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरील माहितीवरून कळते. ज्यांनी हा द्वेषपुर्ण व्हिडिओ व्हायरल केला होता.

दरम्यान तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार फोन करुन योगेश सावंत यांना सोडून देण्यास सांगितले, असे आरोप ही राम कदन यांनी केले. मुळात मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भुमिका आहे. पण मराठ्यांच्या आडून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार करत असतील ते मराठा समाजाला बदनाम करत आहेत," असे ही राम कदम म्हणाले.त्यात रोहित पवारांनी ही विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पोलिसांनी योगेश सावंतला पोलीस स्टेशनला आणलं होतं. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात नेत आहेत. मी त्याला स्वत: भेटण्यासाठी चाललो आहे. उगाच सत्ताधाऱ्यांनी तिथे अ‍ॅक्टिंग करू नये. आणि मी जाहीरपणे सांगतोय ,तो आमचा कार्यकर्ता आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

मुळात या सगळ्यात काही वर्षांपुर्वी शातंतापुर्ण पद्धतीने आंदोलन करणारा मराठा समाज अचानक आक्रमक कसा झाला? मराठा आंदोलनात राजकीय हस्तक्षेप करून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यात रोहित पवार म्हणाले की, कुठल्यातरी यूट्यूब चॅनलने एका सामाजिक कार्यकर्त्याची मुलाखत घेतली.ती फक्त योगेश सावंत यांनी सोशल मीडियावर त्याच्या पेजवर टाकली होती. तुम्ही त्या यूट्यूब चॅनलवर कारवाई करत नाही. जो पत्रकार तिथे होता,त्यांच्यावर कारवाई केली जात नाही, मात्र या कार्यकर्त्यावर कारवाई केली जाते, असा प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केला. परंतु अशा पद्धतीने दोन समाजात द्वेष पसरवणारे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित करणे कितपत योग्य आहे. आणि गुन्हा करणाऱ्यापेक्षा त्याला साथ देणारा आणि त्याला पाठिशी घालणाराही गुन्हेगारच असतो. रोहित पवारांना ही गोष्ट लक्षात आणून द्यावी लागेल.

मुळात ह्या प्रकरणाचे पडसाद विधानसभेत उमटण्याआधी जरांगेंनी केलेल्या हिंसक वक्तव्यांविषयी हरकत नोंदवत, एसआयटी चौकशीचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले होते. तरी आजही आंदोलनाच्या आडून राजकीय हस्तक आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्यामुळे आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आहे. मुळात महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला अठारा पगड जातीचा आहे. पण त्यात ही एका आंदोलानाच्या आडून विशिष्ट जात समुहाला टार्गेट करणे केव्हाही चुकीचे. मुळात ही लढाई आरक्षणाची आहे. जातीजातीची नाही, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि जातीयवाद पसरवणाऱ्या राजकारण्यापासून आंदोलन दूर ठेवायला हवे, अन्यथा आंदोलनला गालबोट लागण्याची शक्यता आहे.