‘फक्त तीन मिनिटांत महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांना संपवून टाकू’ अशी धमकी देणारा तो व्हिडिओ बारामतीच्या ‘तुतारी’ कंपूतील योगेश सावंतने शेअर करावा, हा निव्वळ योगायोग असू शकतो का? काय म्हणावे? इफ्तार, रोजे, १३ बॉम्बस्फोट सगळे ओके वाटते. मात्र, हिंदू समाजातील एक गट नको? मग ते रामदास स्वामी असू देत की, स्वा. सावरकर, केवळ ब्राह्मण म्हणून त्यांच्या महान कर्तृत्वाला नाकारणारे कपाळकरंटेच. आताही देवेंद्र फडणवीस केवळ जन्माने ब्राह्मण म्हणून त्यांच्या वाट्याला कायमचा अंगार? का? हा कोणता सामाजिक न्याय? ही कोणती समता? शाहू, फुले, आंबेडकरांनी ही शिकवण दिलेली नाही. एखादी व्यक्ती ब्राह्मण आहे म्हणून तिला ऐनकेनप्रकारे कोंडीत पकडणे, ब्राह्मण समाजाला अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन शिवीगाळ, निंदा करणे हे नेहमीचेच आहे. का?का? तर म्हणे पूर्वी ब्राह्मणांमुळे अस्पृश्यता सहन करावी लागली. मी स्वतः इतर मागासवर्गीय समाजाची. आजही इतर मागासवर्गीय आणि मराठा समाज असा जातीभेद केला जात नाही का? लोक संधी देताना, लाभाची पदं देताना स्वत:च्या जातीच्या, भावकीच्या लोकांचा प्रथम विचार करत नाहीत का? तरीही बदनाम केवळ ब्राह्मणच का? कोण्या अत्यंत जातीयवादी व्यक्तीने समाजद्रोही, देशात फूट पाडण्याचे वक्तव्य करावे? खरे तर पानाच्या टपरीवर आणि छपरी देशी बारमध्ये वल्गना करणारे अनेक असतात. त्यांना काही महत्त्वही द्यायचे नसते. यापेक्षा अशी लोकं काही वेगळी नाहीत. पण, अशा प्रवृत्तींना वेळीच आळा घालायला हवा. म्हातारी मेल्याचे दुःख नाही, पण काळ सोकावतोय.(आता काही स्त्रीवाद्यांचे म्हणणे आहे की, तुम्ही म्हातारीच मरते असे का म्हणता? लिंगभेद करता!) असो. ‘ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवू’ म्हणणार्या व्यक्तीची आणि तोे व्हिडिओ शेअर करणार्या सावंतचीही चौकशी व्हायला हवी. तो आणि त्याचे बोलविते धनी आहेत, ते म्हणजे संपूर्ण मराठा समाज नव्हे. सध्या आधुनिक जगात प्रबुद्ध समाज जातपात विसरून भारताच्या विश्वगुरूतेकडे वाटचाल करत आहे. अशावेळी ‘मी मराठा, मी इतर मागासवर्गीय, मी ब्राह्मण, मी बौद्ध’ वगैरे म्हणत समाजविघातक कृत्ये करणार्यांची गय नकोच! अशा वृत्ती घडवल्या जातात. अशांना घडवणारे की बिघडवणारे कोण, हे समाजापुढे यायला हवे!
महाराष्ट्रात? ‘नो-नाय-नेव्हर’
काहीही झाले तरी महाराष्ट्रात जाणार नाही मम्मा. अगं भाजपवाल्यांना हिंदू लोक मत देतात. त्यामुळे मी नव्हतो का मागे म्हणालो की, मी काश्मीर कौल ब्राह्मण आहे आणि माझे गोत्र कश्यप आहे. दीदीने पण नाही का मोठा ‘रेड’ कलरचा टीका लावला होता, तर तेव्हा मी ब्राह्मण आहे असे म्हणालो. पण, खरे-खोटे आपल्याला आणि जगाला पण माहिती आहे ना मम्मा. तर महाराष्ट्रात आपल्या शेतकरी, ‘सीएए’ आंदोलनसारखे कुणी तरी सगेसोयर्यांचे आरक्षण मागतय. त्यांच्या कुण्या एका माणसानं म्हंटल की, तीन मिनिटांत ते ब्राह्मणांना संपवणार म्हणून. मग मी कसा जाऊ तिकडे? ‘नो नाय नेव्हर’ हं तर एक मात्र बरं झालं, महाराष्ट्रात माझ्या ‘भारत जोडो’ यात्रेला काही दिवस शिल्लक आहेत. कारण, महाराष्ट्रातही लोक रामनामात दंग आहेत. भाजप-सेनेचे राज्य आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना भुलवण्यासाठी जानवं घालू म्हंटल तर आता दि. ११ मार्चला पवित्र रमजान आहे. ईद-इफ्तार-रोजे सगळं कसं जोषात केले पाहिजे. वायनाडला मला तिकीट पाहिजे आणि जिंकायचं पण आहे ना म्हणून. आणखीन एक गुड लक की, या काळात ख्रिसमस नाही. नाही तर एकाच वेळी किती ड्रेसकोड बदलावे लागले असते. जाऊ दे मम्मा, वायनाडमध्ये माझ्या जागेवर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने उमेदवारी मागितली. मग माझे काय होणार? मी कुठेही जाईन, पण महाराष्ट्रात जाणार नाही. काय म्हणता मला काही होणार नाही? ते सगेसोयरे आरक्षणवाले आपल्या टिकैत अंकलला भेटलेत असे लोक म्हणतात. हं म्हणजे प्रकरण सीरियसली नाही ना घ्यायचं. आपलेच लोक आहेत असे वाटतं का मम्मा? काही कळत नाही. महाराष्ट्रातले आपले ते मशालवाला दादा पण काही बोलत नाही. त्यांचे ते ‘राईट हँड’ पण यावर काहीच बोलत नाहीत. कुणाला विचारावं? तुतारीवाल्यांना विचारायचं तर त्यांच्याच टोप्यांनी टोपी उडवली, असे लोक म्हणतात. मम्मा, कुठले कनेक्शन कुठे असेल काही कळत नाही. काय म्हणता? कनेक्शन कुठूनही असेल तरी महाराष्ट्रात त्याची ठिणगी एकाच ठिकाणहून पडते? आणि त्या ठिणगीचा वणवा करणे काही कठीण आहे का? काय म्हणता? सध्या महाराष्ट्रात जातीय विद्वेष वणवा माजवणार्यांना पद्धतशीर ‘करेक्ट कार्यक्रम’ कमळवाले करत आहेत? मग तर मम्मा, मी जाणाारच नाही महाराष्ट्रात!