सोलापूर आणि मालेगावात वक्फ बोर्डाकडून लॅण्ड जिहाद!
- गोपीचंद पडळकर; हिंदूंना घरे सोडून जाण्यास बाध्य केले जात असल्याचा आरोप
29-Feb-2024
Total Views | 192
मुंबई : सोलापूर आणि मालेगावात वक्फ बोर्डाकडून लॅण्ड जिहाद सुरू आहे. एका विशिष्ट समाजाचे लोक येथील रहिवाशांना वारंवार त्रास देऊन घर सोडून जाण्यासाठी भाग पाडत आहेत, धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी रोजी विधान परिषदेत केली.
पडळकर म्हणाले, सोलापूर महापालिका हद्दीतील साखरपेठ परिसरात सीटी सर्व्हे क्रमांक ९९/८० येथे दीडशे वर्षांपासून मोठ्या संख्येत हिंदू लोक रहात आहेत. या ठिकाणी वक्फ बोर्डाकडून स्थानिकांना वारंवार नोटिसा देऊन भूमी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे. याविरोधात स्थानिकांनी अनेक मोर्चे काढले. येथील रहिवासी महापालिकेत अनेक वर्षांपासून कर भरतात, त्यांच्याकडे प्रॉपर्टी कार्ड आहे, तरी अद्याप ७/१२ वर नावे लागू शकली नाहीत. एका विशिष्ट समाजाचे लोक त्यांना वारंवार त्रास देत आहेत, घर सोडून जाण्यासाठी धमक्या दिल्या जात आहेत. याकडे सरकारने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी विधान परिषदेत केली.
सोलापूर येथे साखरपेठ हद्दीत 'हाशी मकीर मशीद ट्रस्ट' स्थापन झाले आहे. जाकीर जहांगीर मणीयार आणि अहमद कलामसाब सैय्यद हे त्याचे ट्रस्टी आहेत. ते सरकारी नोकरीत, परिवहन विभागात कार्यरत आहेत. जर ते सरकारी नोकरीत असतील, तर त्यांना ट्रस्टवर राहण्याचा अधिकार नाही. या ट्रस्टची माहिती घेतली, तेव्हा या तिची धर्मादाय विभागाकडेही नोंद नसल्याचे समोर आले. त्यामुळे हा विषय गंभीर असून, प्रशासनाने कारवाई करावी आणि रहिवाशांना न्याय द्यावा, असे पडळकर म्हणाले.
खोट्या कागदपत्रांआधारे जमिनी लाटल्या!
मालेगावमध्येही लॅण्ड जिहादचा विषय जोर धरू लागला आहे. दसाने, मौजे धाणे, चिखल आहोळ, वडगाव येथे बनावट दस्तांआधारे अयोग्य नोंदी करून जमिनीची कागदपत्रे तयार करण्यात आली. यासंदर्भात मी सरकारला पुरावे देऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणी सरकारने कारवाई करावी, अशी मागणी पडळकर यांनी केली.