संपूर्ण ब्राम्हण समाजाला धमकी! रोहित पवारांचा हात? विधानसभेत खडाजंगी

    29-Feb-2024
Total Views | 191

Fadanvis & Rohit Pawar


मुंबई :
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धमकी देणाऱ्या इसमाची एक व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली असून यावरुन गुरुवारी विधानसभेत खडाजंगी झाली. या व्हिडीओतील व्यक्तीचे नाव योगेश सावंत असून त्याचा शरद पवार गटाशी संबंध असल्याचा आरोप भाजप नेते राम कदम आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच योगेश सावंतच्या अटकेनंतर आमदार रोहित पवारांनी त्याच्या सुटकेसाठी पोलिसांना फोन केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
 
भाजप नेते राम कदम यांनी पॉईंट ऑफ इन्फॉरमेशन अंतर्गत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आलेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, “सांताक्रूज पोलीस स्थानकात २७ तारखेला अजय पनवेलकर यांनी तक्रार नोंदवली. त्यांच्या मोबाईलमध्ये असलेली एक व्हिडीओ क्लिप घेऊन ते पोलिस स्टेशनला पोहोचले. या व्हायरल क्लिपमधून महाराष्ट्रात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र समोर आलं आहे. या व्हिडीओ क्लिपमध्ये एक इसम म्हणतो की, 'देवेंद्र फडणवीसला आम्ही महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीससारखे तीन मिनिटांत महाराष्ट्रातले अख्खे ब्राह्मण आम्ही संपवून टाकू. आमच्यावर काय गुन्हे नोंदवायचे ते नोंदवा. हा मराठ्यांचा महाराष्ट्र आहे आणि मराठेच राज्य करणार," असे या व्हिडीओमध्ये म्हटले आहे."
 
"माहिती घेतल्यानंतर कळलं की, या इसमाचं नाव योगेश सावंत असं आहे आणि त्याचा बारामतीशी संबंध आहे. तिथल्या वरीष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार फोन करुन सांगतात की, त्या इसमाला सोडून द्या. रोहित पवारांचा याच्याशी काय संबंध आहे? मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भुमिका आहे. पण मराठ्यांच्या आडून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र रोहित पवार करत असतील ते मराठा समाजाला बदनाम करत आहेत," असे राम कदम म्हणाले.
 
याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की, “किती जातीवादी असता येईल, याचा आता कळस झाला. ‘एक समाज आम्ही तीन मिनिटांत संपवू आणि त्याच्या पुढे देवेंद्र फडणवीस तुला संपवू’ असं व्हिडीओत म्हटलं. याबाबत युवासेनेच्या पदाधिकाऱ्याने तक्रार केली. त्यात योगेश सावंत सापडला. तो स्वत: म्हणतोय की, मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार गटाचा पदाधिकारी आहे."
 
"त्यानंतर रोहित पवारांनी स्वत: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला फोन केला. त्यांचा काय संबंध? मराठा समाज हा शांततेने आंदोलन करतो. मनोज जरांगे यांच्या भूमिकेला आम्ही याआधी पाठिंबा दिला. पण आता त्यांच्या मागील राजकीय हस्तक्षेप टप्प्या टप्प्याने उघड होतोय. त्यांचा बोलविता धनी कोण आहे? त्यांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा हात आहे का? रोहित पवार यांनी फोन केला होता का? याची चौकशी झाली पाहिजे," अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषीवर योग्य ती कारवाई करावी, असा आदेश तालिका अध्यक्षांनी दिले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121