राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर अजित पवारांनी दि. २५ फेब्रुवारी रोजी अधिवेशनाच्या पहिल्याचं दिवशी आपली भुमिका सांगणारे एक पत्र समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले. यात त्यांनी राजकीय कारकीर्दीपासून राष्ट्रवादीतील फुटीपर्यत अनेक गोष्टींसह विकास कामांची आणि पुढील विकासाच्या ब्लू प्रिंटची माहिती दिली. ज्यात शरद पवारांचा साधा उल्लेख नाही. उलट कार्यकर्त्यांनी टिकाटिपण्णी करण्याऐवजी विकासांची ब्लू प्रिंट जनतेसमोर मांडावी असे अजित पवार म्हणतात. पण त्यानंतर दि. २६ फेब्रवारी रोजी बारामतीकरांची भुमिका नावाने समाजमाध्यमांवर एक पत्र व्हायरल झालं. ह्यात कुठेही ते पत्र कोणत्या पक्षाने किंवा कार्यकर्त्याने लिहलयं हे सांगितले होते. पण त्या पत्रातील मजकूर शरद पवार गटाला अनुकुल असा होता. साहजिकच सर्वांनी शरद पवार गटाकडे बोटं दाखवायला सुरुवात केली. त्यामुळे या पत्रात नेमंक काय आहे? ते पत्र नेमंक कोणी लिहलं? यासह पत्रातून भुमिका मांडण्याचा हा प्रकार काय आहे?
अजित पवारांनी लिहलेल्या पत्रात त्यांनी मुळात भाजप, शिवसेना युती संबधी, बारामतीसाठी केलेल्या कामाविषयी, तरुणांना राजकारणात दिलेल्या संधीबद्दल लिहलं आहे, आणि शेवटी वडीलधाऱ्या आणि ज्येष्ठांचा आदर करणे हा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उचांवता येईल, मूलभूत सुविधा कसा पुरवता येतील यांचा विचार करणार असल्याचं लिहलयं. पण ह्यात शरद पवारांचा साधा उल्लेख नसल्याने ही गोष्ट पवार गटाच्या जिव्हारी लागते. ज्यानंतर गटातील नेते आक्रमक होतात. त्यानंतर दि. २६ फेब्रुवारीला एक पत्र बारामतीकरांची भुमिका या नावाने व्हायरल झाले. त्यात शरद पवार कसे राजकारणात आले? त्यांच्यानंतरची पिढी म्हणजे राजेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये कसे अजित पवारांना राजकारणात आणले गेले. आणि त्यानंतर पवार घराण्यातील आताची तरुण पिढी म्हणजे रोहित पवार आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कसं आप्पासाहेबांचा थेट वारसदार म्हणून रोहित पवारांना राजकारणात आणून राजेंद्र पवारांना न्याय देण्यात आला. यांची माहिती देण्यात आली.
पण या वादात रोहित पवार आजवर कायम उजवे ठरत आलेत. तसे संकेत खुद्द शरद पवारांनीच वेळोवेळी दाखवून दिलेत. २०२० मध्ये शरद पवारांनी "पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत. आम्ही त्यांच्या मताला कवडीचीही किंमत देत नाही," असे वक्तव्य केले होते. त्यामुळे बारामतीकरांची भुमिका या नावाने व्हायरल झालेल्या पत्राप्रमाणे राजेंद्र पवारांना न्याय देणं अशी काही भुमिका वास्तवात दिसत नाही. कारण २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ऑफीसमध्ये पार्थ पवाराचं येणं जाणं वाढलेलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी काही मुद्यांवर पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी पार्थ पवार हे लोकसभा निवडणूकीची तयारी करतायेत, ते निवडणूक लढविणार का? असा प्रश्न एका पत्रकारांने विचारला. त्यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, सगळी तिकीटं कुटुंबातच दिली तर कार्यकर्त्यांनी काय करायचं? , असे विधान पवारांनी केलं. ज्यातून रोहित पवारांना शरद पवारांनी दिलेलं अधिक महत्त्व लक्षात येतं.
पण आता बारामतीकरांची भुमिका ह्या पत्रामुळे राजेंद्र पवारांना दि. २७ फेब्रुवारी थेट माध्यमांसमोर येऊन पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि पवार कुटुंब का फुटलं यावर भाष्य केलं. ज्यात त्यांनी शरद पवारांच्या विनंतीला मान राखून आपण राजकारणात आलो नाही, अशी भूमिका अचानक कुठलाही प्रश्न कुणी विचारला नसताना मांडली. याचा अर्थ हा सर्व खटाटोप अजित पवारांना आणि त्यांच्या पक्षाला लक्ष्य करण्यासाठी होता का? असा प्रश्न निर्माण होतो. याचा अर्थ शरद पवारांना बारामती हा गड मजबूत ठेवायचा आहे, त्यासाठी हे निनावी पत्र आणि राजेंद्र पवार यांच्या पत्रकार परिषदेचा आधार घेण्याचा प्रयत्न केला जातोयं.त्यात आता शरद पवार गट विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी बारामतीच्या होम ग्राऊंडवरच लोकसभेत आमनेसामने येणार आहेत. विशेष म्हणजे सुनेत्रा पवारांच्या रुपाने अजित पवार पुढचा बारामतीचा लोकसभा उमेदवार उतरवू पहात आहेत. त्यात सुनेत्राताईंच्या कार्याची माहिती देणारे बॅनर्स आणि प्रचार रथ बारामतीत फिरू लागले आहेत.
मुळात सुप्रिया सुळेंना यापूर्वी कुठल्याही इतक्या तगड्या उमेदवाराला झुंज देण्याची वेळ शरद पवारांनी कधी येऊ दिली नाही. त्यात शरद पवारांना आणि सुप्रिया सुळेंना कळून चुकलं आहे की, बारामती लोकसभाही त्यांच्याकडून अजित पवार हिसकावून घेण्याच्या तयारीत आहेत. सुनेत्रा पवार आता लोकसभेसाठी बारामती मतदारात संघटन बांधणी करण्याच्या तयारीत आहेत. ही गोष्ट सुप्रिया सुळेंना कळून चुकल्यानंतर ताईंनी अचानक बारामतीतला आपला मुक्काम वाढवला. मतदार संघातील भेटीगाठी वाढवल्या. मतदार संघातील कामे मार्गी लागावीत यासाठी त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू केला आहे. इतकचं काय तर निवडणुकीआधीच विकासकामांची माहिती त्यांनी माध्यमांवर प्रसिद्ध केली. त्यामुळे अजित पवारांविरोधात ताईंची लढाई सोप्पी नसणार हे खुद्द शरद पवार जाणून आहेत. नवा पक्ष नवं चिन्ह आणि सोबत राहिलेले उमेदवार जिंकून आणून देण्याचे आव्हान पेलायचं असेल तर अजित पवारांच्या विरुद्ध रान उठवल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच बारामतीकरांची भुमिका या नावाच्या आडून शरद पवार अजितदादांना लक्ष्य करु पहात आहेत का?