तामिळनाडूचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचे परवा भाषण झाल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि शाबासकीही दिली. कारण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये एवढी प्रचंड मोठी जाहीर सभा आयोजित करण्याचे शिवधनुष्य अण्णामलाई यांनी लीलया पेलल्याचे कौतुक पंतप्रधानांनी केले. भाजप औषधालाही नसलेल्या या राज्यामध्ये अण्णामलाई ज्या तडफेने भाजप रुजवण्यासाठी काम करत आहेत, ते म्हणूनच सर्वस्वी कौतुकास्पद!
भाजपच्या तेव्हाच्या जुन्या म्हणजे ‘११, अशोक रोड’स्थित कार्यालयामध्ये नव्वदच्या दशकात विजय मिळवून अटल बिहारी वाजपेयी प्रवेश करत असतानाच, नरेंद्र मोदी त्यांना भेटायला येतात आणि त्यांना पाहताच वाजपेयी अगदी कौतुकाने मोदींना मिठी मारून त्यांना शाबासकी देत असतानाचा हा प्रसंग नेहमीच समाजमाध्यमांवर ट्रेंडिंग असतो. ज्येष्ठ नेते भाजपच्या तरुण नेतृत्वास कशी वागणूक देतात, हे सांगण्यासाठी भाजप समर्थकांकडून या प्रसंगाचा दाखला वेळोवेळी दिला जात असतो, तर या व्हिडिओचा संदर्भ देण्याचे कारण म्हणजे, गेल्या दोन दिवसांमध्ये ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या समाजमाध्यमांमध्ये असाच एक व्हिडिओ वेगाने ‘व्हायरल’ झाला होता. तो व्हिडिओ होता तामिळनाडूमधल्या तिरुपूरमध्ये झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भव्य सभेचा. तामिळनाडू भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भारतीय पोलीस सेवेतील माजी अधिकारी अण्णामलाई कुप्पूसामी यांनी काढलेल्या ‘एन मन, एम मक्कल’ या यात्रेच्या समारोपासाठी आयोजित कार्यक्रमास पंतप्रधान मोदी यांनी संबोधित केले. या सभेमध्ये प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचे भाषण झाल्यानंतर पंतप्रधानांनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आणि त्यांना शाबासकीही दिली. कारण, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये एवढी प्रचंड मोठी जाहीर सभा आयोजित करण्याचे शिवधनुष्य अण्णामलाई यांनी लीलया पेलल्याचे कौतुक पंतप्रधानांनी केले. कारण, भाजप औषधालाही नसलेल्या या राज्यामध्ये अण्णामलाई ज्या तडफेने भाजप रुजवण्यासाठी काम करत आहेत, ते खरोखरच कौतुकास्पद!
पंतप्रधानांच्या या कृतीचा फार मोठा सकारात्मक संदेश भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये गेला. अर्थात, तामिळनाडूमध्ये लगेचच भाजपला फार मोठे यश मिळेल; असा त्याचा अर्थ अजिबातच नाही. प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांनादेखील त्याची नेमकी जाणीव आहे. भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशानादरम्यानही त्यांनी तामिळनाडूमध्ये अद्याप बरेच काम करायचे बाकी असल्याचे अगदी खुल्या मनाने मान्य केले होते. लोकसभा निवडणुकीचा विचार करता, राज्यात आजही द्रमुकची स्थिती अतिशय मजबूत असली तरीदेखील द्रमुकला यावेळी राज्यात गेल्यावेळेप्रमाणे म्हणजेच २०१९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जसे निर्भेळयश मिळाले, तसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पुथिया थलाईमुराई-अॅप्ट यांनी घेतलेल्या सर्वेक्षणांमध्ये भाजपचा राज्यात वेगवान प्रसार होत असल्याचेही दिसून आले.तामिळनाडूमध्ये विभागनिहाय करण्यात आलेल्या या सर्वेक्षणामध्ये अनेक नव्या बाबी समोर आल्या.
राज्याच्या दक्षिण विभागामध्ये सत्ताधारी द्रमुकला ३७ टक्क्यांहून अधिक पाठिंबा आहे, तर त्या खालोखाल भाजपला १९.५ टक्के आणि अण्णाद्रमुकला १२.५ पाच टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम विभागामध्ये द्रमुक ३१ टक्के मतांसह आघाडीवर आहे, तर भाजप २२ टक्के आणि अण्णाद्रमुकला २१.४ टक्के मते असल्याचे दिसते. राज्याच्या मध्य विभागात द्रमुकला ४६ टक्के, अण्णाद्रमुकला २०.३ टक्के, तर भाजपला ११ टक्के मते आहेत. द्रमुकचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर विभागात पक्षाचे मताधिक्य ३५.५ टक्के आहे, त्याखालोखाल अण्णाद्रमुक २०, तर भाजप १८ टक्क्यांवर आहे. राज्याची राजधानी चेन्नईदेखील द्रमुकचा मजबूत गड मानला जातो. तेथे द्रमुकला जवळपास ४७ टक्के, तर भाजपला २२ टक्के मतांचा अंदाज आहे, त्याचवेळी अण्णाद्रमुक १०.४ टक्के मतांसह तिसर्या क्रमांकावर आहे.मतांच्या टक्केवारीची २०२४-२०१९ अशी तुलनादेखील सर्वेक्षणात करण्यात आली आहे. त्यानुसार, सत्ताधारी द्रमुकला यंदा ३८ टक्क्यांहून जास्त मते मिळू शकतात. मात्र, हा आकडा गेल्यावेळच्या म्हणजे २०१९ सालच्या ५३.३ टक्क्यांपेक्षा लक्षणीयरित्या कमी आहे. त्याचवेळी भाजप गेल्यावेळच्या ३.७ टक्क्यांवरून सहापट अधिक म्हणजे १८.५ टक्के मते मिळवून दुसर्या क्रमांवर असेल, तर अण्णाद्रमुकच्या गेल्यावेळच्या १८.७ टक्क्यांमध्ये १७.३ टक्के घट होण्याचा अंदाज आहे.
जागांविषयी बोलायचे तर तामिळनाडूतील ३९ पैकी २९ जागा द्रमुकच्या खात्यात, तर भाजप आणि अण्णाद्रमुक प्रत्येकी चार ते सहा जागांवर विजय मिळवू शकतील.भाजपला राज्यात जनाधार प्राप्त करून देण्यासाठी अण्णामलाई यांचे प्रयत्न अतिशय महत्त्वाचे ठरत आहेत. द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांनी कितीही नाकारले तरीदेखील या दोन द्रविडी पक्षांच्या बालेकिल्ल्यास अण्णामलाई यांनी हादरे देण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी द्रमुकच्या हिंदूंविरोधी राजकारणासही मोठ्या प्रमाणात आव्हान देण्यास प्रारंभ केला. त्यासाठी त्यांनी तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री अण्णादुराई यांच्या हिंदूंविरोधी राजकारणाविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती आणि दोन्ही पक्षांच्या टीकेनंतरही माफी मागण्यास नकार दिला होता. त्याचवेळी द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांच्या राजवटीतील कुशासनाविरोधातील त्यांच्या आक्रमक मोहिमेमुळे अण्णाद्रमुकने भाजपप्रणित ‘रालोआ’ची (एनडीए) साथ सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतरही अण्णामलाई यांनी स्वबळावर राज्यात ‘एन मन, एम मक्कल’ यात्रा सुरू केली आणि ती यशस्वीही करून दाखवली.
अण्णामलाई यांच्या स्वच्छ प्रतिमेमुळेदेखील त्यांच्याविषयी राज्यात आकर्षण वाढत आहे. भारतीय पोलीस सेवेमध्ये कर्नाटकात कार्यरत असतानाही त्यांची निडर कार्यशैली प्रसिद्ध होती. त्यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय झाल्यानंतर द्रमुक सरकारवर ’डीएमके फाईल्स’ या नावाने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले. तामिळनाडूच्या निवडणुकीत द्रविडी पक्ष करत असलेल्या गैरप्रकारांविरोधात आणि द्रमुकच्या घराणेशाहीविरोधात ते अतिशय स्पष्टपणे बोलतात. या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वेक्षणाप्रमाणे भाजपने मतांच्या टक्केवारीचा १५ टक्क्यांचा टप्पा खरोखरच पार केला, तर राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये द्रमुकला तगडे आव्हान उभे करण्याची भाजपची क्षमता नक्कीच असेल.
हिमाचलमध्ये काँग्रेसला हादरे
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये हिमाचल प्रदेशात सत्ताधारी काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी हे पराभूत झाले. सर्वोच्चन्यायालयातील नामवंत वकील असलेल्या सिंघवी यांच्या पराभवामुळे राज्याची सत्ता गमाविण्याची भीती काँग्रेसला सतावू लागली आहे. सध्या जरी विश्वासदर्शक ठराव जिंकून आणि भाजपच्या डझनभर आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरू करून मुख्यमंत्री सुक्खू सरकारने पुढील तीन महिन्यांसाठी तरी सत्ता वाचेल, अशी तजवीज केली आहे.मात्र, हिमाचल प्रदेशातील उदाहरणाद्वारे पुन्हा एकदा काँग्रेस नेतृत्वाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. कारण, मुख्यमंत्रिपदी सुक्खू यांची निवड झाल्यापासूनच पक्षांतर्गत विरोधात सुरुवात झाली होती. काँग्रेसचे एकेकाळचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री विरभद्र सिंह यांची प्रतिमा उभारण्यास जागा न देण्यावरून विरभद्र याचे पुत्र आणि मंत्री विक्रमादित्य यांच्यासह अनेक आमदार सुक्खू यांच्यावर नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे बोलूनही दाखवली होती. राज्यात सर्वकाही आलबेल नसल्याची खात्री असल्यानेच काँग्रेसने सोनिया गांधी यांना हिमाचल प्रदेशऐवजी राजस्थानमधून राज्यसभेवर पाठवले असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष पक्षांतर्गत तिढे सोडविण्यासाठी एवढे पराभव पाहूनही गंभीर नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.