पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या महत्वपुर्ण आवाहनामुळे आणि भावनिक नात्यामुळे अनंत अंबानी आणि राधिका मर्चन्ट गुजरातमधील जामनगरमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.
Anant Ambani Radhika Merchant
मुंबई : सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या घरात लग्नसराईची धावपळ पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी (
Anant Ambani) राधिका मर्चंट (Radhika Merchant) हिच्यासोबत १२ जुलै रोजी लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. पण त्यापुर्वी गुजरातमधील जामनगर येथे अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंग कार्यक्रमांचे आयोजन १ ते ३ मार्च मध्ये करण्यात आले आहे. या भव्य दिव्य सोहळ्याला राजकीय नेत्यांपासून ते कलाकारांपर्यंत हजारोंच्या संख्येने पाहूणे मंडळी येणार आहेत.
मुळात अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांनी आपल्या प्री-वेडिंग कार्यक्रमांसाठी जामनगरची निवड करण्यामागे एक महत्वाचे कारण आहे. एका मुलाखतीत स्वत: अनंत अंबानी यांनी याचे कारण सांगितले होते. अनंत अंबानी म्हणाले होते की, “काही दिवसांपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘वेड इन इंडिया’चे आवाहन केले होते. अनंत अंबानी यांना पंतप्रधान मोदी यांचे हे आवाहन खूप भावल्यामुळे त्यांनी परदेशाऐवजी भारतात लग्न करण्याचा निर्णय घेत प्री वेडिंगचे सर्व कार्यक्रम गुजरातमधील जामनगरमध्ये करण्याचे ठरवले.
अनंत यांना जामनगरबद्दल विशेष आपुलकी का?
जामनगरमध्ये प्री-वेडिंगचे कार्यक्रम करण्यामागचे आणखी एक कारण अनंत अंबानी यांनी सांगितले. अनंत यांच्या आजीचा जन्म जामनगरमध्ये झाला होता. त्यांचे आजोबा धीरुभाई अंबानी आणि मुकेश अंबानी यांनी उद्योगाची सुरुवात याच जामनगरमधून केली असल्यामुळे जामनगरबद्दल त्यांना विशेष आपुलकी आहे असून जामनगरमध्येच त्यांचेही बालपण गेले असल्यामुळे या जागेशी विशेष भावनिक नाते असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
‘वेड इन इंडिया’चे पंतप्रधानांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्यावर्षी डेस्टिनेशन वेडिंगसाठी परदेशाची निवड करणाऱ्या जोडप्यांना भारतातच लग्न करण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमात हे वक्तव्य करत त्यांनी ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवरच ‘वेड इन इंडिया’चे आवाहन देशवासियांना केले होते.