गणेशोत्सवातील स्पर्धांपासून रेडिओ जॉकीपर्यंतचा गणेश आचवल यांचा कलाप्रवास हा सर्वार्थाने थक्क करणारा आहे. त्यावर टाकलेला हा प्रकाश...
गणेश आचवल यांचा जन्म मुंबईचा. त्यांचे वडील यशवंत आचवल हे मुख्याध्यापक होते, तर आई सुनीता आचवल या शिक्षिका. गणेश यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण डीजीटी हायस्कूल येथे झाले. त्यानंतर गणेश यांनी सिडनहॅम महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पदवी आणि पदयुत्तर शिक्षण घेतले. त्यानंतर व्यावसायिक शिक्षणाची गरज लक्षात घेऊन गणेश यांनी के. सी. लॉ कॉलेजमधून ‘एलएलबी’चे शिक्षण घेतले. विशेष म्हणजे, गणेश आचवल यांना ‘एलएलबी’मध्ये ’लिगल थिअरी’ या विषयात मुंबईतून सर्वप्रथम आल्याबद्दल मुंबई विद्यापीठाचे सुवर्णपदकही मिळाले.शालेय जीवनापासून गणेश यांना वक्तृत्व, निबंध, हस्ताक्षर, कथाकथन यांसारख्या स्पर्धेत भाग घेण्याची विशेष आवड होती.तसेच गणेश यांना त्यांच्या आई-वडिलांनी लहानपणी सुप्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक रत्नाकर मतकरी यांच्या ’छंद शिबिरात’ पाठवले, जिथे खर्या अर्थाने गणेश आचवल यांच्यातील कलागुणांचा सर्वांगीण विकास झाला. त्यावेळी आई-वडिलांमुळे शाळेतून घरी आल्यावर गणेश यांना आकाशवाणीवरील वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्याची ओढ लागली. पण, भविष्यात आपण स्वत: आकाशवाणीसाठी काम करू, याची गणेश यांना साधी पुसटशी कल्पना ही नव्हती.
मुळात गणेश आचवल यांनी लहानपणी गीता पाठांतर स्पर्धेत भाग घेतला आणि तोच त्याच्या आयुष्यातील पहिला रंगमंचावरील सुखद अनुभव होता. त्यानंतर रंगमंच आणि त्यांच्यात एक अनोखं नातं गुंफलं गेलं. त्यामुळे गणेशोत्सवातील स्पर्धांनी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याचे आचवल आवर्जून अधोरेखित करतात. त्यात शाळेत होणार्या बालनाट्य स्पर्धेतही गणेश सहभागी होत.पुढे महाविद्यालयीन जीवनात मल्हार, अभाविप महोत्सवात अनेक पारितोषिक गणेश यांनी पटकावली. त्यातही कथाकथन आणि वक्तृत्व हा तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. आचार्य अत्रे कथाकथन स्पर्धा, रत्नाकर मतकरी गूढ कथास्पर्धेतही त्यांनी विजेतेपद पटकावले. ज्यात शाळेतील आणि महाविद्यालयातील शिक्षक आणि आई-वडिलांनी गणेश यांना भरपूर प्रोत्साहन दिले. त्यामुळे महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचा अध्यक्ष, वार्षिक अंकाचे संपादक, नाट्य विभागाचा सदस्य, राष्ट्रीय सेवा योजनेचा स्वयंसेवक, अशा अनेकविध जबाबदार्या गणेश यांनी सांभाळल्या. दरम्यान, पदवीच्या तृतीय वर्षांला असताना गणेश यांना सिडनहॅम महाविद्यालयाचा प्रतिष्ठेचा ‘diamond jubilee award for art and culture’ हा पुरस्कार मिळाला. ज्यामुळे आकाशवाणीवरील युवावाणी विभागाने गणेश यांची मुलाखत घेतली होती.
त्या मुलाखतीतील आशय आवडल्याने तिथल्या एक अधिकार्याने गणेश यांना पुन्हा बोलवून घेतले आणि आकाशवाणीची स्वरचाचणी घेऊन त्यांना युवावाणी विभागात कामावर रुजूही करून घेतले. त्यावेळी १९९६ ते १९९९ पर्यंत गणेश युवावाणी विभागात कॉफी हाऊस आणि विविध मान्यवरांच्या मुलाखती घेत. त्यानंतर १९९९ साली त्यांनी ‘एफ.एम’ची परीक्षा उत्तीर्ण केली आणि गेली २५ वर्षं आचवल ‘एफएम रेनबो’ वाहिनीवर म्हणजे ‘१०७.१ मेगा हर्ट्झ’वर रेडिओ जॉकी म्हणून कार्यरत आहेत.रेडिओवरील कार्यक्रमात भक्ती बर्वे-इनामदार, पद्मजा फेणाणी जोगळेकर, मुक्ता बर्वे, कौशल इनामदार, अविनाश नारकर, ऐश्वर्या नारकर, सोनाली कुलकर्णी, रेणुका शहाणे यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांची मुलाखत आचवल यांनी घेतली. तसेच आकाशवाणीवर ‘एफएम रेडिओ’ जॉकी म्हणून कार्यरत असताना प्रश्नमंजुषा, शब्दखेळ, अंताक्षरी असे नावीन्यपूर्ण कार्यक्रमदेखील त्यांनी सादर केले.
दरम्यान, २०२२-२३ साली त्यांनी पत्रकारितेत ‘एम.ए’ ही साठ्ये महाविद्यालयातून पूर्ण केले. तसेच २००२ पासून मुंबईतील अनेक नामंकित महाविद्यालयातील ‘मास मीडिया’, ‘बीबीआय’, ‘बीएमएस’ विभागात अध्यापनाचे काम आचवल करत आहेत. तसेच प्रतिष्ठित दैनिकांमधूनदेखील गणेश आचवल सातत्याने लिखाण करत असतात. त्याचबरोबर ‘सागरिका म्युझिक’च्या काही सीडीजसाठी डबिंग आणि व्हॉईस ओव्हर्स त्यांनी केले. तसेच ‘गिरगाव अॅप’ या डिजिटल अॅपच्या व्हिडिओसाठी आवाजही त्यांनी दिलाय. तसेच सामाजिक बांधिलकी लक्षात घेता, ‘नॅब’ म्हणजे ‘नॅशनल असोसिएशन फॉर दि ब्लाइंड’ या संस्थेसाठी त्यांनी काही पाठ्यपुस्तकेसुद्धा ध्वनिमुद्रित केली आहेत. त्याचसोबत डिजिटल माध्यमाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन, त्यांनी ‘गिरगाव युट्यूब चॅनल’करिता ’गिरगाव टॉक शो’मध्ये २५ भागांमध्ये मुलाखतकार म्हणून काम केले. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आचवल यांना २००८-०९ या वर्षासाठी ‘रोटरी क्लब ऑफ पनवेल’तर्फे सर्वोत्कृष्ट आकाशवाणी निवेदक पुरस्कार, आवाजाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल आणि रेडिओ क्षेत्रातील योगदानाबद्दल ‘नृत्यकला निकेतन’, गिरगाव या संस्थेतर्फे विशेष पुरस्कार, अंबर भरारी आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ यांच्यातर्फे ’सिनेपत्रकारिता गौरव पुरस्कार’, अखिल भारतीय नाट्य परिषद, बोरिवलीतर्फे आकाशवाणीमधील योगदानाबद्दल ’स्वराभिनय गौरव पुरस्कार’ बहाल केला. तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!
-सुप्रिम मस्कर