भुवनेश्वर : मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स भारत दौऱ्यावर आहेत. बिल गेट्स यांनी भारत दौऱ्यात हैदराबादमधील मायक्रोसॉफ्टच्या इंडिया डेव्हलपमेंट सेंटर (IDC) ला भेट दिली. आयडीसी हे मायक्रोसॉफ्टचे भारतातील संशोधन केंद्र आहे. या केंद्राची स्थापना १९९८ मध्ये करण्यात आली होती. यावर्षी या केंद्राला २५ वर्ष पूर्ण होतील.
बिल गेट्स यांनी आपली दौऱ्यात ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला देखील भेट दिली. बिल गेट्स यांनी दि. २८ फेब्रुवारी २०२४ बुधवारी सकाळी भुवनेश्वरमधील एका झोपडपट्टीला भेट दिली आणि तेथे राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. यासोबतच त्यांनी राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांसह मां मंगला बस्ती येथील बिजू आदर्श कॉलनीलाही भेट दिली.
बिल गेट्स यांनी झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांशी संवाद साधला. गेट्स दि. २७ फेब्रुवारी २०२४ मंगळवारी येथे आले. आज त्यांनी भुवनेश्वरमधील एका झोपडपट्टीला भेट दिली. यानंतर ते ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेणार आहेत. ओडीशा राज्यामध्ये राज्य सरकारसोबत मिळून बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन अनेक उपक्रम चालवते.
ओडिशा दौऱ्यात बिल गेट्स यांना कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी आणि कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या वतीने KISS मानवतावादी पुरस्कार २०२३ देण्यात आला. हा पुरस्कार बिल गेट्स यांच्या परोपकारी कामासाठी देण्यात आला आहे.
काय आहे बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन?
बिल गेट्स आणि त्यांची पूर्व पत्नी मेलिंडा गेट्स यांनी मिळून २००० साली या फाऊंडेशनची स्थापना केली होती. २०२० मध्ये ६९ अब्ज अमेरिकी डॉलरसह बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन जगातील दुसरी सर्वात मोठी धर्मादाय संस्था बनली आहे. आरोग्यसेवा सुधारणे आणि जगभरातील गरिबी कमी करणे ही बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ची मुख्य उदिष्ट्ये आहेत. फाउंडेशनच्या प्रमुख व्यक्तींमध्ये बिल गेट्स, मेलिंडा फ्रेंच गेट्स, वॉरेन बफे यांचा समावेश आहे.