मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत कमी काळ काम जरी केले असले तरी आजन्म ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं अशा दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता पाटील यांची आजही आठवण आली तरी डोळे पाणवतात. मराठीच नव्हे तर हिंदी जुन्या जाणत्या कलाकारांसह नव्या फळीच्या कलाकारांनाही त्यांच्या अभिनयाची, सुंदरतेची भूरळ पडली आहे. नुकत्याच एका मुलाखतीत अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने स्मिता पाटील आज असत्या तर आंतरराष्ट्रीय निर्मात्यांनी त्यांना जागतिक सिनेमात करारबद्ध केलं असतं, असं महत्वाचं विधान केलं.
नवाझुद्दीनने अलीकडेच एका मुलाखतीत कलाकारांच्या दिसण्यावर त्यांना इतरांकडून ज्या प्रतिक्रिया ऐकाव्या लागतात, त्यावर भाष्य केले. यावेळी नवाझने अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या नावाचा उल्लेख करत उदाहरण दिले. तो म्हणाला, "एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या दिसण्यावर भारतात वेगवेगळी मतं मांडली जातात. एखादी व्यक्ती भारतात दिसायला चांगली आहे, असा समज असतो तीच व्यक्ती फ्रांस किंवा जर्मनीमध्ये लोकांना आवडू शकत नाही. आपल्याकडे काही खास वर्णाच्या आणि शरीरयष्टीच्या व्यक्तींनाच सुंदर समजलं जातं. पण माझ्या मते स्मिता पाटील सारखी सुंदर अभिनेत्री मी पाहिली नाही."
नवाझ पुढे असं देखील म्हणाला की, "स्मिता पाटीलला पाहून असं वाटतं की त्यांचा जन्म फक्त अभिनय करण्यासाठीच झाला असावा. स्मिता पाटीलकडे तुम्ही पाहिलं तर वरवर त्या एक सामान्य महिला वाटू शकशील. पण जेव्हा त्या कॅमेरासमोर अभिनय करतात तेव्हा त्यांच्याइतकी सुंदर कोणी दिसत नाही. आज त्या असत्या तर अनेक आंतरराष्ट्रीय निर्मात्यांनी त्यांना जागतिक सिनेमात करारबद्ध केलं असतं."