चटका बसण्याचा अनुभव आपण सर्वांनीच आयुष्यात कधी ना कधी घेतला असेल. पण, घरात असेल अथवा कारखान्यांमध्ये आगीने भाजण्याचे अपघात दुर्देवाने घडून येतात. तेव्हा, अशावेळी नेमके प्रथमोपचार काय करावे? असे प्रसंग घडू नये म्हणून कोणते प्रतिबंधात्मक उपाय करता येतील? यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
अगदी आजही अमुक एका व्यक्तीने अंगावर रॉकेल ओतून स्वतःस पेटवून दिले, अशा बातम्या वाचण्या-ऐकण्यात येतात. जीवन संपविण्याचा हा एक भेसूर मार्ग आहे. यात मरण येऊन सुटका झाली तर ठीक, नाही तर अतिशय वेदनादायी मरणयातना भोगाव्या लागतात. आपली त्वचा आपल्या शरीरातील आतल्या अवयवांचे संरक्षण करते. पण, त्वचेचे आवरणच नाहीसे झाले तर जंतू व विषाणू संसर्ग होतो. गंभीररित्या भाजलेले कित्येक रुग्ण अनेक दिवस अत्यवस्थ असतात व शेवटी सेप्टिसेमियाचे बळी ठरतात.जनरल प्रॅक्टिसमध्ये भाजलेले बरेच रुग्ण येतात. साधा चटका ते जास्त प्रमाणात भाजलेले असे सगळेच रुग्ण हाताळावे लागतात. अंगावर गरम पाणी पडणे, चहा सांडणे, गरम तेल अंगावर उडणे, फटाका हातात फुटणे इत्यादी छोट्या प्रकारापासून ते आग लागून होरपळणे, इलेक्ट्रिकचा शॉक लागून भाजणे, धुराच्या लोटाने गुदमरणे असे अनेक प्रकार हाताळावे लागतात.भाजलेला रुग्ण दवाखान्यात आल्यावर आधी त्याच्या जनरल अवस्थेचा अंदाज घेतला जातो. ‘रुल ऑफ नाईनचा’ उपयोग करून भाजलेला भाग हा किती टक्के आहे, ते ठरविले जाते. वाफ लागून किंवा सौम्य चटका बसून त्वचेच्या वरच्या भागास इजा होऊन त्वचेवर फोड येतात. रुग्णाच्या आजाराचा अंदाज घेऊन पुढील इलाज केला जातो.
भाजणे जास्त प्रमाणात असल्यास रुग्णास हॉस्पिटलमध्ये भरती होण्याचा सल्ला दिला जातो. उदा-
1) शरीराच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भाजणे
2) चेहरा, डोळा, सांधे, हात, पाय, गुप्तांग भाजणे
3) आग लागून धुराच्या लोटात गुदमरणे
4) इलेक्ट्रिकचा शॉक लागून भाजणे
5) भाजण्याबरोबर इतर इजा होणे उदा- हाड फ्रॅक्चर होणे
6) अस्थमा, मिरगी यासारख्या आजाराचे रुग्ण
भाजणे जास्त प्रमाणात नसेल, तर ते घरगुती उपचाराने सुद्धा बरे होतात.
प्रथमोपचार
सर्वप्रथम भाजलेला भाग पाण्याखाली धरणे. त्यामुळे तापमान खाली येते व त्वचेला होणारी इजा कमी होते. शक्य असल्यास नळाच्या पाण्याखाली जळालेला भाग धरावा. भाजलेला भाग छोटा असल्यास व जखम वरच्यावर असल्यास कोमट पाण्याने किंवा डेटॉल मिश्रित पाण्याने जखम स्वच्छ धुवावी. त्यावर घरात उपलब्ध असलेला मलम लावावा. सोफ्रामायसिन, सिल्व्हर सल्फा डायझिन हे मलम परिणामकारक आहेत. दिवसातून दोन ते तीन वेळा मलम लावावा. भाजलेल्या जागी फोड आल्यास तो फोडण्याची घाई करू नये. दोन ते तीन दिवसांनी तो फोड आपोआप फुटून जखमेवर एक पापुद्रा तयार होतो. या पापुद्य्राच्या संरक्षणाखाली आतली जखम हळूहळू भरू लागते.भाजण्याची जखम मोठी असल्यास, बोटांवर असल्यास, सांध्यांच्या भोवती किंवा चेहर्यावर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
लहान मुलांमधील भाजणे
रांगणारी मुले गरम पदार्थास अचानक स्पर्श करतात. गरम इस्त्री, तवा यांचा चटका, गरम पाणी किंवा चहा अंगावर सांडणे हेदेखील लहान मुलांमध्ये आढळते. लहान मुलांच्या बोटांना व सांध्याभोवती असलेल्या जखमांसाठी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घेणे. लहान मुलांमध्ये बोटे एकमेकाला जोडली जातात व ते अधूपण आयुष्यभर राहते. बोटांच्या वाढीवरदेखील या भाजण्याच्या जखमेचा परिणाम होतो. डोळ्याच्या भोवती भाजले असल्यास डोळ्यांचा डॉक्टरांचा सल्ला घेणे.वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये 40 वर्षांपूर्वी ‘स्किन बँक’ होती. निष्णात प्लास्टिक सर्जन डॉ. केसवानी हे भाजलेल्या मुलांवर उपचार करायचे. भाजलेल्या मुलांच्या जखमा या ऑपरेशन थिएटरमध्ये साफ केल्या जायच्या व त्यानंतर जर जखम मोठ्या सांध्याजवळ असेल, तर अशा सांध्याभोवती प्लॅस्टर लावले जाई. यामुळे तो सांधा आखडून जात नाही व जखम लवकर भरून निघते. भाजल्यामुळे चेहर्यास विद्रुपता आल्यास, बोटे एकमेकांस जुळली असल्यास शस्त्रक्रिया करून या जखमा व्यवस्थित करण्यात येतात. ‘स्किन ग्राफ्टिंग’देखील अशा रुग्णांमध्ये करण्यात येते. वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये 40 वर्षांपूर्वी ’बर्नस् वार्ड’ होता.
भाजण्याची जखम घेऊन रुग्ण दवाखान्यात आल्यास त्याच्या व्याप्तीचा अंदाज घ्यावा. जखम जास्त मोठी व गंभीर नसल्यास नॉर्मल सलाईन किंवा डेटॉलच्या पाण्याने स्वच्छ पुसून घेऊन त्यावर मलम लावावा. शक्यतो जखम उघडी ठेवावी. रुग्णास धर्नुवाताचे इंजेक्शन द्यावे. वेदनाशामक गोळ्या व प्रतिजैविक औषध डॉक्टरांच्या सल्लाने घ्यावीत. जखम जुनी झाल्यावर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी जखमेवर जाड पापुद्रा तयार होतो. हळूहळू तो सुकू लागतो. हे क्रस्ट डॉक्टरांकडून काढून घेणे. जखम बरी झाल्यावर तो भाग आकसू नये, याची काळजी घ्यावी. भाजल्यामुळे तयार झालेला व्रण वरच्या वर असल्यास काही महिन्यांमध्ये तो नाहीसा होतो. व्रण मोठा व खोल असल्यास तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे.शरीराच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त भाग भाजला गेला असल्यास रुग्णास हॉस्पिटलमध्ये भरती करणे गरजेचे असते. जंतूसंसर्गाची मुख्य भीती असते व नंतर हा संसर्ग संपूर्ण शरीरभर पसरतो. विद्यार्थीदशेत केईएम हॉस्पिटलमध्ये असे बरेच रुग्ण पाहिले. त्यांच्या अंगावर लोखंडी जाळीचे हुड टाकले जायचे व त्यावर ब्लॅकेट टाकले जायचे. अंगावर माशा बसू नये, म्हणून ही व्यवस्था असायची. या रुग्णांभोवती एक विचित्र दुर्गंधी असायची. अशा रुग्णांचे ड्रेसिंग इंटर्न किंवा ज्युनियर डॉक्टरला करावे लागायचे. रुग्णाला होणार्या वेदना व त्याचा भेसूर झालेला चेहरा बघवत नसे. दारुड्या नवर्याच्या जाचाला कंटाळून जाळून घेण्याचे प्रकार जास्त असत. यातून वाचल्यावर येणारी विद्रुपता आणखीन भयानक असे.
प्रॅक्टिसच्या सुरुवातीच्या काळात पाहिलेली एक केस आजही आठवते. चाळीत राहणारी एक बाई आपल्या दोन लहान मुलींना माझ्याकडे औषध घेण्यासाठी घेऊन येत असे. छोटेसे घर, प्रचंड सासूरवास, वस्तीचा बकालपणा या सर्वांचा परिणाम होऊन तिने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. अंगावर रॉकेल ओतून स्वत:स पेटवून घेतले. सासूवर राग होता म्हणून स्वत:ला पेटविल्यावर सासूला घट्ट मिठ्ठी मारली. शेजार्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, पण काही उपयोग झाला नाही. काही मिनिटांतच त्या सासू-सुना कोसळल्या व मृत्युमुखी पडल्या. मृत्यू किती भेसूर असतो, हे त्यावेळेस पाहण्यास मिळाले. त्या बाईचा नवरा पुढे त्या दोन छोट्या मुलींना घेऊन बरेच दिवस औषध घेण्यासाठी माझ्याकडे येत असे. त्यांना बघून जीव कासाविस होत असे.
प्रतिबंधात्मक उपाय
आमच्या लहानपणी जमिनीवर स्टोव्ह ठेवून त्यावर स्वयंपाक केला जायचा. छोट्याशा घरामध्ये लहान मुले स्टोव्हभोवतीच खेळायची. यामुळे आईला फार सतर्क राहावे लागे. पुढे चालून ओट्यावर स्वयंपाक करणे सुरू झाले. आम्ही भावंडेपण तोपर्यंत थोडी मोठी व सजाण झालो होतो.घरोघरी गॅस सिलिंडरमुळे चुलीवर स्वयंपाक कमी होऊ लागले व लहान मुलांचे भाजण्याचे प्रमाण कमी होत आहे. अग्नी ही देवता आहे. तिचा उपयोग श्रद्धापूर्वक व योग्य दिशेने व्हावा. तसे न झाल्यास अग्नीच्या प्रकोपास सामोरे जावे लागते. दिवाळीच्या दिवसात काही आगाऊ मुले अॅटम बॉम्ब हातामध्ये फोडण्याचा प्रयत्न करतात व गंभीररित्या भाजतात.गॅसची नळी जुनी होऊन त्यातून गॅस लिक होऊन आग लागण्याचे प्रकार बर्याच वेळा ऐकण्यात येतात. गॅसची नळी जुनी झाल्यास ती योग्यवेळी बदलून घेणे, घरकाम झाल्यावर गॅसचे मुख्य बटण बंद करणे अशा गोष्टी पाळल्यास अनर्थ टळू शकतो.मोठ्या सोसायट्यांसाठी अग्निशमनाची वेगळी व्यवस्था असते. आग लागल्यावर काय काळजी घ्यायची, याबद्दलची माहिती स्थानिक अग्निशमक दलाकडून दिली जाते. ‘फायर फायटिंग’ यंत्रणेची नियमित तपासणी केली जावी. कॉलेज जीवनात ’दि बर्निंग ट्रेन’ आणि ’टॉवरींग इन्फ्रेनो’ या चित्रपटातील अग्नीची भीषणता पाहिली होती, अशी भीषणता कुणाच्याही वाट्याला न यावी.
अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न होताना आजही ऐकण्यात येतो. सुनेस जीवंत जाळण्याचा प्रयत्न झालेला आजही ऐकण्यात येतो. समाजजीवनातील या व्यथा तुम्हा-आम्हालाच दूर करायच्या आहेत. एकमेकांस नीट समजून घेणे, आपला इतरांना जाच होणार नाही, असे आपले वागणे पाहिजे. वाढदिवसासाठी 200 कोटी रुपये खर्च केल्याचे आपण वाचतो, तर दुसरीकडे उपासमारीमुळे कुपोषणाच्या गर्तेत अडकलेले माझे बांधव मी बघतो, तेव्हा मन व्यथित होते. आपल्या सुबत्तेतील काही हिस्सा आपल्या संपर्कात येणार्या कष्टकर्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी वापरावा.जगातील आपले अस्तित्व म्हणजे एका गेस्ट हाऊसमधील वास्तव्यासारखे आहे. आपल्या हयातीत येथील सर्व सुखसोयींचा उपभोग घ्या. आपले जीवन आपल्यासाठी तर आनंदी ठरावेच, पण दुसर्यांना पण आनंद देण्याचा माफक प्रयत्न आपण करावा. गेस्ट हाऊस छोटे किंवा मोठे असेल, सर्वांना एकाच मार्गाने जावयाचे आहे. सर्व काही येथेच सोडून सरणावर चढायचे आहे व अग्नीदेवताच आपल्याला पंचतत्वात विलीन करणार आहे.समाजातील भाजण्याचा प्रतिबंध तुम्हाला-आम्हालाच करायचा आहे. आपण स्वत: आनंदी राहून व सभोवताली आनंद पसरवून हे करायचे आहे. किरकोळ भाजणेदेखील आपल्यापासून दूर राहो ही सदिच्छा!
- डॉ.मिलिंद शेजवळ