"जरांगेंबद्दल मी आधीपासूनच सांगत होतो! आता स्पष्ट होतयं की...!", भुजबळांनी केलं मोठं वक्तव्य
26-Feb-2024
Total Views | 91
मुंबई : गेली दोन ते तीन महिने मी सांगत होतो. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. मनोज जरांगेंच्या आजूबाजूचे लोकच आता सगळं बोलायला लागले आहेत, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. मनोज जरांगेंवर त्यांचेच काही सहाकारी गंभीर आरोप करत आहेत. यावर आता प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली.
छगन भुजबळ म्हणाले की, "जरांगेंनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर केलेल्या हास्यास्पद आरोपांवर उत्तर देण्याच्या लायकीचेही ते नाहीत. गेली दोन ते तीन महिने मी पहिल्यापासून सांगत होतो. पण आता सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे. जरांगेंच्या आजूबाजूचे लोकच आता सगळं बोलायला लागले आहेत. त्यामुळे काय खरं आहे. त्यांच्या पाठीमागे कोण आहे हे सगळं हळूहळू बाहेर येत आहे."
ते पुढे म्हणाले की, "याआधीसुद्धा पोलिसांवर दगडफेक करण्याच्या वेळी कोणते लोकं होते याबद्दल मी बोललो होतो. आता त्याची पुष्टी होत आहे, कारण त्यांच्यासोबतचे लोकच हे सांगत आहेत. पोलिसांवर दगडफेक झाल्यानंतर त्यांनी बचावात्मक लाठीचार्ज केला होता. परंतू, पहिली बाजू लोकांसमोर आलेली नाही. त्यामुळे पवार साहेब, उद्धव ठाकरे तिथे गेल्याने ते एका दिवसात देव झाले. त्यांनी पोलिसांवर दगफेक केली आहे आणि ८० पोलिस जखमी झालेत हे जर पवार साहेबांना माहिती असतं तर तेसुद्धा गेले नसले. दगडफेक झाल्यानंतर राजेश टोपे आणि रोहित पवार यांनी जरांगेंना आणून बसवलं आणि सांगितलं की, शरद पवार येत आहेत. तुम्ही परत येऊन बसा. जरांगेंच्या सोबत असलेले वाळेकर सांगतात की, टोपेंनी मिटींग घेऊन दगड गोळा करा असे सांगितले. यात खरं काय आहे, याचा पोलिस तपास करतील," असेही भुजबळ म्हणाले आहेत.