मुंबई : जम्मू-काश्मिरमधून ‘कलम३७० हटवण्यामागचा संघर्ष, काश्मीरचा इतिहास व आतंकवादाची पार्श्वभूमी, राजकीय हस्तक्षेप या सर्व सत्य घटनांची बांधणी 'आर्टिकल ३७०' या चित्रपटात दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी मांडली आहे. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी तर या चित्रपटाचे कौतुक केलेच, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील विशेष कौतुक केले होते. दरम्यान, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत असून या चित्रपटाने द कश्मिर फाईल्स चित्रपटाचा देखील रेकॉर्ड मोडीत काढला आहे.
‘सॅकनिल्क’च्या रीपोर्टनुसार या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ५.७५ कोटींची कमाई केली आहे. जयपुर, पुणे, दिल्ली, चेन्नई या शहरांमध्ये प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला आहे. दरम्यान, ‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाने विवेक अग्निहोत्री यांच्या ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. द काश्मिर फाइल्स या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ३.५५ कोटींची कमाई केली होती.
आदित्य जांभळे दिग्दर्शित, लिखित आणि आदित्य धर निर्मित या चित्रपटात यामी गौतम प्रियामणी, वैभव तत्ववादी, अरुण गोविल, किरण करमरकर, असित गोपीनाथ रेडिज, किरण करमरकर, अश्वनी कुमार आणि इरावती हर्षेसारखे मातब्बक कलाकार आहेत.