सुप्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार यांना नुकत्याच जाहीर झालेल्या ‘ज्ञानपीठ’ पुरस्कारानिमित्ताने त्यांच्या काव्याविष्काराचे हे रसग्रहण...
आपल्या देशातील समस्त भाषांमध्ये लिहिलेल्या कविता वाचण्यासाठी, समजून घेण्यासाठी मला एक आयुष्य अपुरे आहे. शक्य तेवढी या मातीतली कविता समजून घेण्याचा माझा आजवरच्या काळामध्ये आटोकाट प्रयत्न राहिला आहे. आपल्या देशात मग तुम्ही उर्दू, मराठी, कोकणी, हिंदी, तमिळ, मल्याळम या किंवा अन्य कोणत्याही भारतीय भाषांमध्ये कविता लिहित असलात, तरी शेवटी तुम्ही आपल्या संस्कृतीबद्दल, आपल्या भावनांबद्दलच लिहित असता.“
काही वर्षांपूर्वी गुलजार यांना भेटण्याचा आणि त्यांच्यासोबत कवितेबद्दल दीर्घ संवाद साधण्याचा योग आला, त्यावेळी अशा तरल भाषेमध्ये त्यांनी आपल्या कविताप्रेमाची ग्वाही देतानाच, कविता ही फक्त शब्दांची उतरंड नाही, तर भावनांची अलवार गुंतवणूक असल्याचीही जाणीव सहजपणे करून दिली होती. एकूणच आपल्या कविता, सिनेगीतांपासून ते चित्रपटांपर्यंत प्रत्येक कलाकृतीतून आपल्याला जे सांगायचे आहे, त्याची सुप्त जाणीव करून देण्यात गुलजार वाकबगार आहेत. खर्या कवीमनाचे ते द्योतकच असते. पण, तरीही अर्थविंवचनेच्या भोवर्यात गुलजारांची कविता कधी अडकली नाही. कविता ही नेहमीच ’बिटवीन द लाइन्स’ असते, हे गुलजार यांनी अत्यंत ताकदीने मांडले. म्हणूनच ’त्रिवेणी’ ही ‘हायकू’सदृश्य रचना गुलजारांच्या या सुप्तजाणीव प्रदेशाचे अनभिषिक्त प्रतिनिधित्व करते. गंगा-यमुनेसारख्या दोन समांतर प्रवाहांप्रमाणे असणारा एक शेर आणि त्यानंतर त्या सगळयाला छेद देणारी तिसरी ओळ; जी या दोघांतच लपली आहे-सरस्वतीसारखी! ती थोडे अंतर राखून प्रकट होते आणि आपल्या विचारविश्वाला वेगळीच कलाटणी देते. इथे गुलजार दिसतात.
गेल्या 60 वर्षांहून अधिक काळ गुलजार भारतीय संवेदनशीलतेचे दूत म्हणून जगभरातील रसिकगणात ज्ञात आहेत. अनुभव हे फक्त सांगण्यापुरते मर्यादित न राखता, ते सहअनुभूतीच्या पातळीवरून समोरच्या व्यक्तीमध्ये झिरपणे अधिक गरजेचे आहे आणि गुलजार यांनी आजवरच्या आपल्या प्रत्येक कलाकृतीमधून याचे प्रत्ययकारी दर्शन घडवले आहे. ‘गुलजार’ या चार अक्षरांची मोहिनी गेल्या चार पिढ्यांवर आहे. ‘गुलजार’ या शब्दाला लगडून येणारे, सगळेच संदर्भ म्हणूनच कोणाही संवेदनशील हृदयाला आर्त करतात. सभोवतालामध्ये विखुरलेल्या स्वतःच्या अस्तित्वाच्या कणांना वेगळे करता येत नसते. कधीच. कोणालाही!
आत्मीय दुःखातूनच नवनिर्मिती अंकुरत असते. गुलजार यांची कविता याची यथार्थ साक्ष आहे. आपल्या जखमांना कवटाळण्यापेक्षा इतरांच्या वेदनेवर फुंकर घालण्याची अंतर्भावना गुलजारांमध्ये सहजगत्या आहे. त्यांच्यातील बहुभाषिकत्व हे फक्त कविता-साहित्य शिकण्यापुरते नसते, तर त्या भाषेतील वेदनेला संवेदना देत, भाषिक बंधनातून कवितेला मोकळे करत, प्रादेशिकतेच्या पटलावर उंचावण्यासाठी असते. त्यातूनच मग मराठीतील विंदा करंदीकर, अरूण कोलटकर, दि. पु. चित्रे, कुसुमाग्रज यांच्यापासून ते सौमित्र यांच्या कवितांपर्यंत त्यांच्या भावानुवादाचा पट उलगडत जातो. ”मराठी कविता माझ्यासाठी कधीच अनोळखी नव्हती. ही कविता माझ्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा भाग आहे. माझा रियाझ आहे. मराठी कवितांची चाल, शब्दरचना, आशयघनता, त्यातील नाद हे माझ्यामध्ये वसले आहेत. गेल्या साठेएक वर्षांपासून मी या भूमीचा, येथे रुजलेल्या कवितांचा सहयात्री आहे. सुरुवातीच्या काळात पु. ल. देशपांडे यांच्यासोबतच्या भेटीतून मला मराठीतील विविध कवितांची ओळख झाली, पुढे ती वाढतच गेली. आता तर ती माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग झालेली आहे,” असे सांगतानाच एकूणच कवितेचे आपल्यावर अगणित उपकार असल्याचे, गुलजार यांनी आवर्जून नमूद केले होते. प्रत्येक काळातील जगण्याच्या प्रत्येक अनुभवाला तत्कालीन भाषेचे कोंदण देत, त्यांची कविता अत्यंत स्वाभाविकरित्या कागदावर उतरते. म्हणूनच त्यांची प्रत्येक ओळ ही ‘कन्टेपररी’ असते. ती कोणत्याही काळात वाचली, तरी प्रत्येक वेळी ती नवानुभूती देत असते.
“कला हेच जीवन आहे. जी जीवनापासून विलग आहे, ती कलाच नव्हे! एकूण जगण्याबाबत कवीचा स्वतःचा असा दृष्टिकोन असलाच पाहिजे,” असे त्यांचे कलेबद्दल थेट मत आहे. संपूर्ण आयुष्य कवितेला वाहिलेल्या, या कलंदर अवलियाला कविता हे अत्यंत वैयक्तिक प्रकरण वाटते. “माझी कविता ही नेहमीच खासगी वाटत राहिली आहे. त्यामुळे त्यामध्ये मी कधीही विनाकारण राजकीय टिप्पणी करण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याची गरजही वाटली नाही. राजकारणाबद्दल मत व्यक्त करण्यासाठी इतर माध्यमे आहेत, कविता ही काही त्याची भूमी नाही,” असे ते जरी म्हणत असले, तरी आपल्या एकूण कवितेवर समाजातील घडामोडींचा भाव आणि प्रभाव नक्कीच कळत-नकळत पडत असल्याचेही त्याचवेळी नमूद करतात. जगण्याच्या प्रत्येक अंगाला भिडताना, प्रत्येक बाब मनाच्या तळकोपर्यात कुठे ना कुठेतरी नकळत जागा तयार करते आणि पुढेमागे एखाद्या कवितेमध्ये तितक्याच उत्स्फूर्तपणे उसळी घेऊन, आपले स्थान पटकावून टाकत असते. गुलजार यांच्या कित्येक कवितांमध्ये आपल्याला हे अगदी सहजपणे जाणवते.
‘जिन्दगी जिने की वजह हैं, कविता...’ असे गुलजार अत्यंत सहज बोलून जातात आणि ते खरेही आहे म्हणा. जेव्हा जगण्याच्या सगळ्या आशा, अस्तित्वाच्या प्रत्येक खुणांवर वार होत होते, तेव्हा कवितेनेच बाहू पसरून आपलेसे केले, ही जाणीव ते कायम जागती राखतात. आपण धार्मिक आहोत, असे गुलजार सांगत असले, तरी “इतरांसारखा माझा देव मंदिर, मशीद, गुरुद्वारा, चर्चमध्ये बंदिस्त नसून, माझ्या कवितेतूनच माझा देव मला भेटत असतो.” आपण काव्यधर्मी आहोत, कविता हेच माझे अध्यात्म‘ असे गुलजार सांगू शकतात; कारण देवा-धर्मांच्या नावावर माणसांचे, देशाचे सांडलेले रक्त आजही त्यांच्या डोळ्यांसमोर येत असावे, म्हणूनच किमान कवितेच्या माध्यमातून तरी हा सीमावाद पुसण्याचा ते प्रयत्न करत राहतात. आणि म्हणूनच,
आंखों को वीजा नहीं लगता,
सपनों की सरहद होती नहीं,
बंद आंखो से रोज में सरहद पार चला जाता हूं मिलने
मेहंदी हसन से!
असे आपल्या खर्जातील आवाजात सांगणारे, गुलजार प्रत्येक रसिक पिढीला आपलेसे वाटत राहतात.
गोष्ट...
गुलजार आपल्याला भेटत राहतो वाचलेल्या कवितांमधून
ऐकलेल्या गाण्यांमधून
पाहिलेल्या सिनेमांमधून
प्रत्येक भावुक क्षणांमध्ये आपल्यासोबत जगत राहतो गुलजार
कधी आपल्या वेदनेवर फुंकर घालतो गुलजार
तर कधी प्रत्यक्ष वेदना होऊन ठसठसत राहतो
संवेदनशीलतेचे मूर्तिमंत प्रतीक असतो गुलजार
पाण्याप्रमाणे हातात येतो आणि
पार्याप्रमाणे हातातून निसटून जातो गुलजार
गुलजार बोलतो त्याची कविता होते
गुलजार जगतो तीही कविताच असते
जगण्याच्या प्रत्येक बिंदूवर गुलजार भेटत राहतो
सीमारेषेवर तो विभागला जात नाही
स्मरणगर्दीत तो हरवला जात नाही
अस्तित्वाच्या सगळ्या सीमा तो छेदत राहतो
कॅमेर्यापलीकडे जाऊनही तो सांगत असतो
कधी अमीर खुस्रो, कधी गालिब असतो गुलजार
रवींद्रनाथ, प्रेमचंद आणि कुसुमाग्रज सुद्धा असतोच ना गुलजार
गुलजार म्हणतो, ‘जिहाले मुश्की मुकंब रंजीश...’,
‘ओळखत का सर मला?’, ‘बघ माझी आठवण येते का?’
आशक, मस्त आणि फकीरही असतो गुलजार
धमण्यांमधून वाहणार्या रक्तामधेही गुलजार
पहाडांमध्ये गुंजणारा प्रतिध्वनी असतो गुलजार
काश्मीरच्या पश्मिन्यातील अलवारता म्हणजे गुलजार
भटक्यांच्या जगण्याचा अर्थ असतो गुलजार
मीना कुमारीच्या असण्याचा अंश म्हणजे गुलजार
डफावरची साद होऊन गात असतो गुलजार
कैवल्याच्या शिखरावर न्हात असतो गुलजार
एलीसच्या अद्भुत जगाची सफर होतो गुलजार
पोटलीबाबाच्या गाठोड्यातील गोष्ट होतो गुलजार
पंचमदाच्या सुरांचा शब्द असतो गुलजार
जगजीतच्या स्वरात अलवार असतो गुलजार
रावीपारच्या आठवांचा ठेवा होतो गुलजार
ओरखड्यापासून स्वप्नांना जपत असतो गुलजार
तारुण्याचा अनावर बहर असतो गुलजार
‘उम्र का खेल एकतरफा है’ सांगत ‘त्याच्या’शी भांडत असतो गुलजार
भाषेच्याही पार जाऊन पोहोचत असतो गुलजार
अजून मीच मला कुठे सापडलोय असेही म्हणून जातो गुलजार
विद्रोहाच्या आगीसाठी ‘माचीस’ देतो गुलजार
दोघांमधल्या ‘आंधी’वर शाल पांघरतो गुलजार
चंद्रामध्ये भाकरीचा शोध घेतो गुलजार
चांदण्याचा खुर्दा तिच्यावर उधळणाराही गुलजार
त्याच्या तिच्या मुकेपणाची ‘कोशिश’ असतो गुलजार
कृष्ण बनून मीरेवर प्रेम करतो गुलजार
गंगेचा शोध घेत हरवत जातो गुलजार
तिच्या उर्दू जुबाँमध्ये गुरफटत जातो गुलजार
सनईच्या तीव्र सुरात असतो गुलजार
गर्द अरण्यातील प्रकाश किरणात असतो गुलजार
बिमलदांचा सच्चा सहयात्री असतो गुलजार
हरवलेल्या प्रत्येकाची आठवण असतो गुलजार
प्रेयसीच्या गालावरील खळीमध्ये दिसतो गुलजार
आईच्या पांढर्या केसांमधेही जाणवतो गुलजार
भिजलेल्या पेपरमध्ये वाहून जातो गुलजार
शाम रंगामध्ये कधी गाऊन जातो गुलजार
नासिरच्या अभिनयातील दाद होतो गुलजार
पुस्तक बंद केल्यानंतरही भेटत राहतो गुलजार
डोळे मिटल्यावरही दिसत राहतो गुलजार
मनामध्ये सदा नादत राहतो गुलजार
हृदयामध्ये सदा स्पंदत राहतो गुलजार...
किशोर अर्जुन
(लेखक पटकथा लेखक आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शक आहे.)