इंडोनेशियात नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी सैन्य नेते आणि संरक्षणमंत्री प्रबोवो सुबिआंतो यांनी विजय मिळवला. त्यामुळे या सत्तापरिवर्तनाने इंडोनेशियात अनेक बदल होण्याची शक्यता आहे.
१७ हजार बेटांपासून बनलेला देश म्हणजे इंडोनेशिया. जागतिक स्तरावर महत्त्वपूर्ण स्थान असलेल्या या देशात ७००हून अधिक भाषा बोलल्या जातात, तर १ हजार, ३४० हून अधिक जातीसमूह वास्तव्य करतात. जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियातील नागरिकांच्या जीवनशैलीवर अनेक धर्मांचा प्रभाव आहे. मागील दोन दशकांपासून इंडोनेशियात दहशतवाद आणि ख्रिश्चन अल्पसंख्याकांवर होणारे हल्ले वाढत आहेत. सत्तापरिवर्तन, सैन्याचे बंड झेललेला इंडोनेशिया आता लोकशाहीकडे झुकला आहे. मात्र, नवे राष्ट्रपती प्रबोवो सुबिआंतो यांच्यासाठी हा सत्ताप्रवास मुळीच सोपा नसेल. कारण, जागतिक स्तरावर होणार्या बदलांबरोबरच इंडोनेशियाअंतर्गत बदलांना सामोरे जात आहे.काही वर्षांपूर्वीच इंडोनेशियाने आपली राजधानी बदलण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार जकार्ताऐवजी नुसांताराला नव्या राजधानीच्या रूपात निवडण्यात आले आहे. बोर्नियो बोटावर असलेल्या नुसांताराचा विस्तार जवळपास अडीच लाख हेक्टर इतका आहे. इंडोनेशियाने नव्या राजधानीच्या दिशेने वेगाने पावले टाकली आहेत. जकार्तामध्ये समुद्राच्या वाढत्या जलस्तरामुळे महापुराची समस्या उद्भवू शकते.
वायू, जलप्रदूषण, वाढती वाहतूककोंडी या समस्यांचाही सामना जकार्ताला करावा लागतोय. राजधानी बदलण्याची मागणी काही नवीन नाही. १९४५ साली इंडोनेशियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जकार्ता हीच इंडोनेशियाची राजधानी होती. मात्र, राजधानी दुसरीकडे हलविण्यासाठी मागील ८० वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. प्रथम राष्ट्रपती डॉ. सुकार्णो यांच्या कार्यकाळात राजधानीच्या स्थानांतरणाच्या चर्चा समोर येत होत्या. ते राजधानीला पलंगकाराया शहरात वसविण्याच्या शक्यतेवर विचार करत होते. त्याचप्रमाणे जकार्ताच्या जवळच एक नवी राजधानी वसविण्याचाही विचार होता. मात्र, त्यावर ठोस काही झाले नाही. जकार्तामध्ये तब्बल एक कोटी, दहा लाखांहून अधिक लोक राहतात. जगातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या शहरांपैकी एक म्हणजे जकार्ता. राजधानी बदलणे ही एक जटिल प्रक्रिया असून, ज्याला आता सुरुवात झाली आहे. हळूहळू इंडोनेशियाचा प्रशासकीय विभाग जकार्ताहून नुसांतारात स्थानांतरित केला जाणार आहे.दरम्यान, भारत-इंडोनेशियामध्ये अनेक सांस्कृतिक समानता पाहायला मिळते. इंडोनेशियात हिंदू धर्मासोबतच बौद्ध धर्माचाही प्रभाव दिसून येतो. २८ कोटी लोकसंख्येच्या इंडोनेशियात भारतीयांची संख्या जवळपास १ लाख, २० हजार इतकी. त्याबरोबरच भाषा, स्थापत्य, राजेशाही यावर भारतीय संस्कृतीची छाप आढळते. इंडोनेशियातील पुरातन साम्राज्याचे नाव श्री विजया आणि गजाह मधा आहे. दोन्ही देशांतील खानपान-बोलीमध्ये बरीच समानता आहे.
इंडोनेशियाच्या भाषेवर संस्कृतचा प्रभाव आढळतो. रामायण, महाभारताची पात्रे कठपुतळीच्या स्वरूपात पाहायला मिळतात. आसियान क्षेत्रात भारताचा दुसरा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार इंडोनेशिया आहे. दोन्ही देशांत २००५-०६ मध्ये ४.३ अब्ज अमेरिकन डॉलर व्यापार झाला. त्यात वाढ होऊन २०२२-२३ मध्ये तो ३८.८४ अब्ज अमेरिकन डॉलरपर्यंत गेला. भारत इंडोनेशियाकडून कोळसा, कच्चे पाम तेल, खनिज, रबर, कागद, हायड्रोकार्बन भांडार आदी गोष्टी आयात करतो. तसेच, भारत इंडोनेशियाला कृषी साहित्य, पेट्रोलियम उत्पादन, दूरसंचार साहित्य, प्लास्टिक निर्यात करतो. इंडोनेशिया भारतासाठी गुंतवणुकीचे एक हक्काचे स्थान आहे. सध्या इंडोनेशियात ३० भारतीय गुंतवणूक प्रकल्प असून २०००-२०२२ दरम्यान तब्बल ४ हजार, ७५० प्रकल्पांमध्ये भारताने गुंतवणूक केली आहे. त्यात वीज, कपडा, वाहन, खनन, बँकिंग आदी क्षेत्रांचा समावेश आहे. भारताने साबांग बेटावर गुंतवणूक केली आहे. या मार्गावरून जगभरातील ६० टक्के समुद्री व्यापार वाहतूक होते. त्यामुळेच इंडोनेशिया भारतासाठी राजनैतिक, भौगोलिक आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण भागीदार आहे. आता नवी राजधानी आणि सोबत नवेे राष्ट्रपती आल्याने दोन्ही देशांच्या संबंधांवर नेमके काय परिणाम होतात, हे येत्या काही वर्षांत समजेलच.