ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयासमोर कळवा खाडी पात्रातील अतिक्रमण ठाणे महापालिकेने काही दिवसांपूर्वी निष्कासित केले होते. या मोकळ्या झालेल्या जागेवर निसर्ग उद्यान वॉकिंग पथ आणि दशक्रिया विधी घाट उभारावे. अशी मागणी ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने आमदार संजय केळकर यांच्याकडे करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यपूर्व काळातील कळवा उड्डाणपूल ते महागिरी कोळीवाडा दरम्यानच्या खाडीपात्रात प्रशासकीय दुर्लक्ष झाल्याने अतिक्रमण करण्यात आले. त्यामुळे येथील खाडी कांदळवन क्षेत्र नष्ट होत असून येथील जैववैविध्य धोक्यात आले आहे. या अतिक्रमणा संदर्भात तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून कारवाई करण्यात आली.येथील अतिक्रमण निष्कासित केले होते.
परंतु, या जागेचा सुयोग्य वापर महापालिकेकडून न झाल्याने पून्हा अतिक्रमणे होत आहेत. हे अतिक्रमण होऊ नये, यासाठी खाडीपात्रालगत अस्तित्वात असलेल्या जागेवरील अतिक्रमणे निष्कासित करुन येथे दशक्रिया विधी घाट उभारावा; तसेच या खाडीपात्रालगत गार्डन ते गणेश विसर्जन घाट पर्यंत वॉकिंग पथ बांधावा, तसेच खाडी कांदळवनात जैववैविध्य, परदेशी पक्षी निरिक्षण स्पॉट देखील या ठिकाणी तयार केल्यास ठाणे शहराच्या सौंदर्यीकरणात भर पडेल, अशी मागणी करण्यात आली आहे.