समर्थांच्या मते, भगवंताने रामावतारात खूप कष्ट सहन केले. सर्व प्रकारच्या यातना सोसून अतुल पराक्रमाने रामांनी रावणाचा वध करून त्याच्या बंदिवासातील देवतांना मुक्त केले. राम हा सर्वदृष्ट्या आदर्श आहे. रामाची ओळख कोदंडधारी राम अशीच आहे, तो पराक्रमी आहे, दुष्टांचा नाश करून भक्तांना अभय देणारा आहे. रामचरित्राला व रामाभोवती असणार्या सद्गुणी पात्रांना आध्यात्मिक गुरूंनी मान दिला आहे. सर्वजण रामचरणी नतमस्तक आहेत. आपल्या सांस्कृतिक इतिहासात रामाचे स्थान उच्चकोटीचे आहे. समर्थांना रामाचे, त्याच्या चरित्रकथांचे, पराक्रमाचे विलक्षण आकर्षण आहे.
देव भक्ताची उपेक्षा करीत नाही, हे सांगण्यासाठी या श्लोकांच्या गटात भगवंताचे अवतार थोडक्यात सांगावे, असे स्वामींच्या मनात होते. रामावतारानंतर स्वामी कृष्णावताराकडे वळले आहेत. त्या अवतारात भगवंत भक्तासाठी त्वरेने धावून येतो, असे त्याचे वैशिष्ट्य सांगितले आहे. परंतु, याच श्लोकात पुढे, हा ज्ञानी भगवंत कलियुगात मौन धरून बसला आहे, असे आपले निरीक्षण त्यांनी नोंदवले आहे. तो श्लोक असा आहे -
तये द्रुपदीकारणें लागवेगें।
त्वरें धांवतु सर्व सांडूनि मागें।
कळीलागि जाला असें बोध्य मौनी।
नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी ॥१२४॥
भक्त जेव्हा भगवंताला व्याकूळतेने हाक मारतो, तेव्हा भगवंत भक्तासाठी त्वरेने धावत येतो. आपली सारी कामे टाकून धावून येतो. हे कृष्णावतारात द्रौपदी वस्त्रहरण प्रसंगी सर्वांना दिसून आले आहे. महाभारतातील द्रौपदी वस्त्रहरण हा प्रसंग सर्वसाधारणपणे सर्वांना माहीत आहे. दुर्योधनाने शकुनीमामाच्या सांगण्यावरून धर्मराजाला द्युत खेळण्यासाठी पाचारण केले. द्युताच्या खेळातील फासा टाकण्याचे काम शकुनी करत होता. गर्विष्ठ दुर्योधनाचाअहंकार वाढवून पांडवाच्या द्वेषाचा अग्नी भडकत ठेवण्याचे काम शकुनी बिनबोभाटपणे करीत होता. दरबारातील भीष्म, द्रोण इत्यादीकांना त्याने याची कल्पना येऊ दिली नाही. शकुनीने फासा टाकण्यात न्यायाने न वागता कपटाने दुर्योधनाला विजय मिळवून दिला. धर्मराज हरला तरी खेळ त्याला सोडता येत नव्हता. सर्व हरल्यावर दुर्योधनाने धर्मराजाला चिथावून भावांना पणाला लावायला सांगितले.
शकुनीच्या हातचलाखीने तेथेही तो हरला. सर्व भाऊ गुलाम होऊन खाली मान घालून दरबारात बसले. मग धर्मराजाला स्वतःलापणाला लावण्यास सांगण्यात आले. त्यातही धर्मराज हरला. मग दुर्योधनानेद्रौपदीला पणाला लाव म्हणून धर्माला सांगितले. द्युतात तो द्रौपदीलाही हरून बसला. दुर्योधनाच्या मते, आता द्रौपदीही गुलाम झाली असल्याने त्याने तिला दरबारात आणण्यासाठी दुःशासनाला पाठवले. दुःशासनाने तिला केसांना धरून बळजबरीने दरबारात आणले. तिचा आपल्या पराक्रमी पतिराजांवर व स्वतःच्या ज्ञानावर विश्वास होता. परंतु, आपले पती अगोदरच गुलाम होऊन खाली मान घालून बसले आहेत, तेव्हा ते आपले रक्षण करू शकणार नाहीत, हे तिने ओळखले. मग तिने आपल्या ज्ञानाचा उपयोग करायचे ठरवले. तिने बाणेदारपणे विचारले की, “धर्मराज प्रथम द्युतात हरला की, त्याने प्रथम मला पणाला लावले?” त्यावर दुर्योधन म्हणाला की, ’‘धर्म प्रथम हरला व माझा गुलाम झाला.” त्यावर द्रौपदीने असा युक्तिवाद केला की, धर्मराज जर प्रथम हरला, तर त्याला मला पणाला लावण्याचा अधिकारच उरत राहत नाही. तथापि, दरबारातील शिष्टमंडळाने असे मत व्यक्त केले की, धर्मराज स्वतःला पणाला लावून हरला असला तरी द्रौपदी त्याची पत्नी राहते, तेव्हा तिच्यावर धर्माचा अधिकार कायम राहतो. तेवढ्यात दुःशासनाने गुलाम म्हणून तिच्या वस्त्रालाच हात घातला.
आता कोणीच आपले रक्षण करू शकणार नाही, हे जाणून आर्तपणे तिने कृष्णाला साद घातली. त्याक्षणी आपली सर्व कामे बाजूला टाकून कृष्ण धावून आला. त्याने वस्त्रे पुरवून पांचालीची अब्रू राखली. नंतर तिने कृष्णाला विचारले, “तू माझी लाज राखलीस, पण यायला वेळ का लावला?” त्यावर कृष्ण म्हणाला, “मी लगेचच येणार होतो, पण तुला तुझ्या पतिदेवतांच्या पराक्रमावर व स्वतःच्या ज्ञानीपणाच्या युक्तिवादावर विश्वास होता. जेव्हा तो फोल ठरला व तू काकुळतीने मला हाक मारलीस, त्याक्षणी मी धावून आलो. भक्त जेव्हा माझ्यावर पूर्ण विश्वास टाकून आर्तपणे मला हाक मारतो, तेव्हा सर्व कामे बाजूला टाकून मी त्वरेने धावत येतो.” भक्तासाठी तत्क्षणी धावून जाण्याचा गुणविशेष भगवंताने कृष्णावतारात दाखवला आहे.
कृष्णाच्या अवतार समाप्तीनंतर कलियुगाची लक्षणे दिसू लागली होती. १८ दिवस चाललेल्या महाभारत युद्धात प्रचंड रक्तपात होऊन कौरववंशाचा नाश झाला. पुढे यदूवंशाचाही नाश झाला. युद्धात कौरववंश नष्ट झाल्याच्या वेदनेने गांधारीने, ‘कृष्ण हा विनाश वाचवू शकला असता, पण त्याने तसे केले नाही’ असा ठपका कृष्णावर ठेवून यदूवंशाचा नाश होईल, असा शाप तिने दिला. श्रीकृष्णाच्या द्वारकेत यादव आपसात भांडून मेले. ’यादवी माजणे’ हा वाक्प्रचार यावरूनच आला असावा. या यादवांनी एका ऋषींची थट्टा करून त्यांच्या शापाने यदूवंशाचा नाश ओढवून घेतला. त्यातच श्रीकृष्णावताराची समाप्ती झाली. सर्व यदूवंश नष्ट झाला.
समर्थांनी या श्लोकाच्या तिसर्या ओळीत ‘कळीलागि जाला असे बोध्य मौनी।’ असे म्हटले आहे. काही अभ्यासकांनी त्यातून वेगळे अर्थ काढून बोध्य म्हणजे गौतम बुद्धाला कलियुगातील भगवंताचा अवतार म्हटले आहे. कलियुगाची लक्षणे शास्त्रात सांगितलेली आहेत. त्यानुसार कलियुगात लोक दया, क्षमा हे गुण विसरतील. श्रद्धा लोप पावेल. असुरी संपत्तीला मानमान्यता मिळेल. आपसात प्रेम नसल्याने द्वेष, मत्सर, खून, मारामार्या, युद्धे होऊन लोक अतीस्वार्थी बनतील. लोक भोगवादी बनतील वगैरे अशा कलियुगात अहिंसा, शांतीचा उपदेश करणारा बुद्ध, भगवंताचा अवतार असा ‘बोध्य मौनी’ या शब्दाचा अर्थ त्यांनी घेतला आहे. पण, तो बरोबर वाटत नाही. ‘बोध्य’ शब्दाचा बुद्धाशी संबंध नाही.
वैदिक परंपरेत भगवंत अवतार घेतो, असे सांगितले आहे. बुद्ध वेद मानत नाही, उलट त्याने वेदांची निंदा केली आहे. आत्म्याचे अस्तित्व मान्य नाही, अशा बुद्धाला भगवंताचा अवतार मानणे तर्कदृष्ट्या योग्य नाही, असे प्रा. के. वि. बेलसरे यांनी म्हटले आहे. ते योग्य आहे. ‘बोध्य’ याचा अर्थ ‘ज्ञानी’ असा आहे. कलियुगात या ज्ञानी भगवंताने मौन पत्करले आहे. तो फक्त आपल्या भक्तांशी ध्यानात बोलू शकतो. इतरवेळी त्याने मौन धारण केले आहे, असे असले तरी देव भक्ताची उपेक्षा करीत नाही. देवाला भक्ताचा अभिमान असतो. म्हणून माणसाने देवाची भक्ती सोडू नये, असे समर्थांचे सांगणे आहे.
७७३८७७८३२२