...म्हणून आंदोलनावर शंका!

    20-Feb-2024   
Total Views |
Farmers protest violence

केंद्र सरकारशी चर्चा निष्फळ ठरल्यानंतर, शेतकरी आंदोेलकांनी दिल्लीकडे कूच करण्याचा निर्धार पुनश्च व्यक्त केला. यादरम्यान, शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमांमध्ये प्रवेश करू नये, म्हणून पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात आहे. दिल्ली-हरियाणाच्या सिंगू सीमेवर पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुरांचाही मारा केला. सरकारच्या या सगळ्या प्रतिबंधात्मक आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना बघून, विरोधकांसह पुरोगामींनी मोदी सरकार शेतकरीविरोधी असल्याच्या जुन्याच अजेंड्याला पुन्हा उकळी देण्याचा प्रयत्न चालवलेला दिसतो. पण, यादरम्यान शेतकरी संघटनेतील एका नेत्याने केलेल्या विधानामुळे या आंदोलनाच्या मूळ हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ‘भारतीय किसान युनियन’चे नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांनी मोदींचा राम मंदिर उद्घाटनानंतर उंचावलेला प्रसिद्धीचा आलेख खाली खेचण्यासाठीच, हे आंदोलन छेडल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामुळे शेतकरी, त्यांच्या मागण्या यांना पुढे रेटून मोदी सरकारची प्रतीमा मलिन करणे, मोदी सरकारला शेतकरीविरोधी ठरविण्याचा एक पद्धतशीर डाव रचल्याचे डल्लेवाल यांच्या दाव्यानंतर अगदी स्पष्ट झाले. तसेच लोकसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर असताना, पुन्हा शेतकरी आंदोलनाने डोके वर काढणे, हा निव्वळ योगायोग नाही. निवडणुकांच्या या रणधुमाळीत शेतकरी आंदोलनाचा फटका भाजपला बसावा आणि किमान शेतकरीबहुल मतदारसंघात तरी भाजपच्या उमेदवारांचा पराभव व्हावा, हाच यामागचा उद्देश. केवळ डल्लेवाल यांचे विधानच नाही, तर खलिस्तानींनीही गेल्यावेळेप्रमाणे यंदाही या आंदोलनात छुप्या पद्धतीने उडी घेतलेली दिसते. कॅनडामध्ये बसलेल्या खलिस्तानी पन्नूने आंदोलकांना कर्तारपूर सीमेवर तुमच्यासाठी शस्त्रास्त्रे तयार ठेवली असल्याचेही विधान केले. यावरून शेतकरी आंदोलनाच्या पडद्याआड देशविरोधी खलिस्तानी शक्तींची मोदी सरकारविरुद्ध लढण्याची खुमखुमीच दिसून येते. एकूणच काय तर भारतात अराजक माजावे, निवडणुकांच्या काळात अशा आंदोलनाने सरकार बॅकफूटवर जावे, सरकारकडून एखादी घोडचूक व्हावी आणि शेतकर्‍यांचे रक्त सांडावे, अशा कुटिल मनसुब्यांसह हा खेळ अगदी पद्धतशीरपणे सुरू आहे. या आव्हानातून मोदी सरकार नेमका कसा मार्ग काढून, हे षड्यंत्र हाणून पडते, ते बघणे आता महत्त्वाचे!
 
...म्हणून तुम्ही हिंदूविरोधीच!
 
आम्ही झोपी गेला आहात. तुम्ही त्यांचे (मोदी सरकारचे) म्हणणे मान्य केले. तुम्ही आधीच पराभव मान्य केलात. २४ तास फक्त ‘जय श्रीराम’चे नारे देत आहात. पण, तुमच्या खिशातून रोज पैसे काढले जात आहेत. तुम्ही उपाशी मरताय,” इति श्री श्री राहुल गांधी. आता काँग्रेस आणि गांधी घराण्याचा हिंदूविरोध, रामद्वेष हा तसा सर्वश्रुत. तो आजच्या चर्चेचा विषय नाहीच. पण, राहुल गांधी यांचा वरील उद्वेग बरेच काही सांगून जातो आणि म्हणूनच तो समजून घेतला पाहिजे. मोदींच्या मागील दहा वर्षांच्या काळात हिंदूंच्या मानसिकतेत झालेला बदल हेच राहुल गांधींचे खरे दुखणे. म्हणजे बघा, मोदींमुळे ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ ही घोषणा प्रत्यक्षात सत्यात उतरली. झोपी गेलेला हिंदू खडबडून जागा झाला. पण, ‘जय श्रीराम’चे नारे देणारा, जो हिंदू जागृत झालेला, जागा झाल्याचे आपल्याला दिसते, तोच हिंदू नेमका झोपी गेल्याचे राहुल गांधींना वाटते. हे असे का? ‘अपना अपना नजरिया’ म्हणतात, त्याप्रमाणे राहुल गांधींचा या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा देव-देव करून हिंदू समाजच झोपी गेला आहे, असा टोकाचा निराशावादी, तर मोदी सरकारचा दृष्टिकोन रामाची पुनर्स्थापना करून रामराज्याच्या प्रारंभाचा, असा अत्यंत आशावादी. राहुल गांधींचे म्हणणे की, हिंदूंच्या खिशातून पैसे काढून घेतले जात आहेत, तो उपाशी मरतोय. म्हणजे धर्माची पट्टी डोळ्यावर बांधलेला हिंदू समाज राहुल गांधींच्या दृष्टीने आंधळा! पण, याउलट राम मंदिरामुळे हजारो हिंदूंना रोजगार उपलब्ध झाला. त्यांच्या खिशात पैसे आले. कुटुंबाचे पोट भरू लागले. हिंदूंचेच नव्हे, तर ८० कोटी नागरिकांना मोदी सरकार मोफत रेशनचे वाटप करून, एकही गरीब उपाशी राहणार नाही, म्हणून प्रयत्नशील आहे. पण, तरी राहुल गांधींना वाटते, ‘जय श्रीराम’ म्हणून हिंदूंनी मोदी सरकारपुढे हार मानली. हार या हिंदूंनी नव्हे, तर ती राहुल गांधींनीच खरं तर मान्य केली आहे. ते हिंदू झोपी गेला, असे वरकरणी म्हणत असले, तरी जागा झालेला हा हिंदू राहुलटोळीची पुरती झोप उडवून गेला. मतांची भूक राहुल गांधींनाच कासावीस करत आहे. त्यांच्या खिशातून आता हिंदूंची उरलीसुरली मतेही निसटत चालली आहेत. आपला दारूण पराभव राहुल गांधींना स्पष्ट दिसू लागलाय. म्हणूनच आज त्यांना उघड्या डोळ्यांनीही नेमके सगळेच विपरित दिसते. ‘मनी वसे ते स्वप्नी दिसे’ हेच खरे!

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची