सत्ता सर्वांनाच हवी असते; पण एक पक्ष आणि एका घराण्याचे भले करण्यासाठी ती हस्तगत करणे आणि देशाला जगात सर्वश्रेष्ठ स्थानावर नेण्यासाठी सामान्य भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी ती प्राप्त करणे, यात जमीन-अस्मानाचा फरक. भाजपने पुन्हा एकदा सत्तेचे स्वप्न पाहिले, ते देशाला केवळ विकसित राष्ट्र बनविण्यासाठी नव्हे, तर भारताला त्याच्या हक्काचा जागतिक आत्मसन्मान मिळवून देण्यासाठीच. हाच भाजपच्या ‘पार्टी विथ ए डिफरन्स’चा अर्थ असून, अन्य पक्षांच्या तुलनेतील गुणात्मक फरक आहे.
देशाला बलशाली बनविण्याचे ध्येय बाळगणार्या पक्षाची स्थितीही तशीच बळकट असली पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या नुकत्याच पार पडलेल्या, राष्ट्रीय अधिवेशनात त्याच्या शीर्षस्थ नेत्यांच्या भाषणांतून देशाला बलवान बनविण्याचा आत्मविश्वास तर प्रकट होत होताच; पण हे ध्येय साध्य करण्यासाठी लागणारी कार्यक्षम आणि व्यावसायिक प्रगल्भता आणि ध्येयदृष्टीही या पक्षाकडे आणि त्याच्या नेत्यांकडे आहे, त्याचेही दर्शन घडले. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला केवळ बहुमत नको आहे (जे त्याला मिळेल, ही काळ्या दगडावरील रेघ आहे), तर काही मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी लागणारे दोन तृतीयांश बहुमत हवे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातही ‘अबकी बार चारसौ पार’ या घोषणेचे पडसाद उमटले. भाजपच्या अधिवेशनात संघटनशक्तीचे आणि भारताबद्दलच्या राष्ट्रप्रेमाचे दर्शन नेत्यांच्या भाषणातून घडले. भारताला बलशाली, विश्वगुरू बनविण्यासाठी कोणावर आक्रमण करण्याची आपल्याला गरजच नाही; कारण भारतीयांमध्ये ती शक्ती अंगभूतच आहे. तिला आता फक्त जागृत करण्यात येत आहे, इतकेच!
अधिवेशनात भाजपच्या ज्या प्रमुख नेत्यांची भाषणे झाली, त्यापैकी गृहमंत्री अमित शाह यांच्या जोशपूर्ण भाषणात पुन्हा सत्तेत येण्याचा आत्मविश्वास तर जाणवत होताच; पण आगामी लोकसभा निवडणुकांचा हा संघर्ष देशाला बलशाली बनविण्याचे ध्येय असलेल्या भाजप आणि घराणेशाहीद्वारे वैयक्तिक लाभ आणि देशाची हानी करणार्या विरोधी पक्षांमधील लढाई असल्याचा स्पष्ट दृष्टिकोनही दिसून आला. ही वैचारिक स्पष्टताच भाजपला सशक्त करीत असून, सामान्य जनतेशी त्याचे बंध अधिक दृढ करताना दिसते. सत्ता हे उपभोगाचे नव्हे, तर जनसेवेचे साधन आहे, याची जाणीव त्याच्या नेत्यांना असल्यामुळेच, या पक्षाचे सरकार गेली दहा वर्षे भ्रष्टाचारमुक्त राहिले. भारताला बलशाली बनवायचे असेल, तर सरकार समाजाच्या केवळ एका गटाच्या किंवा समूहाच्या बाजूचे असून चालत नाही, तर ते सर्वसमावेशक असले पाहिजे, हे शाह यांनी आपल्या भाषणात सांगितले.
भाजपचे सरकार केवळ शेतकर्यांचे किंवा गरिबांचे असणार नाही, ते केवळ शहरांभिमुख किंवा ग्रामीण भागाभिमुख असणार नाही, असे सांगून शाह यांनी विरोधकांच्या या एकतर्फी आणि अतार्किक युक्तिवादातील पोकळपणा दाखवून दिला. “गरीब आणि शेतकर्यांच्या हितासाठी काम करणारे सरकार हे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारे असू शकते, हे भाजपने दाखवून दिले आहे,” असे सांगून शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. त्या पक्षाचे नेते राहुल गांधी हे सत्तेसाठी राष्ट्रविरोधी शक्तींशी हातमिळवणी करून, देशाच्या सुरक्षेबाबत तडजोड करतात, असे सांगून त्यांनी काश्मीरला विशेष दर्जा देणार्या ‘३७०’ कलमाची पुनर्स्थापना करण्याच्या, त्यांच्या वक्तव्याचा वापर पाकिस्तानने ‘संयुक्त राष्ट्रां’मध्ये केला होता, याची आठवण करून दिली. तसेच भारतीय अर्थव्यवस्थेला डळमळीत करणार्या, जॉर्ज सोरोस या अब्जाधीशाच्या कारस्थानांचाही संदर्भ दिला. म्हणूनच आगामी निवडणूक ही देशाला सर्वोच्च प्राधान्य देणारा भाजप आणि घराणेशाहीला संरक्षण देणार्या घराणेशाहीवादी पक्षांतील युद्ध आहे, हेही त्यांनी सांगितले.
आपला पक्ष पुन्हा सत्तेवर येणार आहे, याबद्दल नरेंद्र मोदी यांच्या मनात तर शंका नाहीच; पण त्यांनीच सांगितल्याप्रमाणे अनेक देशांच्या सरकारांनाही भारतात मोदी हेच पुन्हा पंतप्रधान होतील, याची खात्री असल्याचे दिसते. आपल्याला अनेक देशांकडून येत्या जून, जुलै, सप्टेंबरमध्ये होणार्या परदेशातील कार्यक्रमांची आमंत्रणे येत असल्याचे सांगत, मोदी यांनी हा मुद्दा स्पष्ट केला. “आपल्याला तिसर्यांदा देशाची सत्ता हवी आहे, ती उपभोगण्यासाठी नव्हे, तर भारतीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी,” असे सांगून मोदी यांनी यासंदर्भात छत्रपती शिवाजी महाराजांचा दाखला दिला. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले प्रेरणास्रोत असल्याचे सांगून, त्यांच्या राज्यकारभाराचा आदर्शच आपण डोळ्यांसमोर ठेवला आहे. महाराजांनीही राज्याभिषेक झाल्यावर, रयतेच्या कल्याणासाठी काम करण्याचा आपला वसा पुढे सुरूच ठेवला होता, असे सांगत मोदी यांनी आपणही भारताला विश्वगुरू बनविण्याच्या आपल्या ध्येयासाठी आपल्याला दोन तृतीयांश बहुमत देण्याचे आवाहन करीत असल्याचे आपल्या भाषणात सांगितले.
मोदी यांच्या या भावनेला भारतीय जनता पक्षानेही साथ दिली असून, अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या बांधणीच्या निर्णयाचे स्वागत करणारा ठराव राष्ट्रीय कार्यकारिणीने मंजूर केला आहे. भव्य राम मंदिराचे निर्माण हे आगामी एक हजार वर्षे भारतात रामराज्य प्रस्थापित करण्याचे पहिले पाऊल असून, त्यामुळे कालचक्र भारताच्या बाजूने फिरविण्यात आल्याचे, या ठरावात नमूद करण्यात आले आहे. राम मंदिर हे भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या ध्येयाचे प्रतीक असून, ते भारतीय राज्यघटनेच्या ध्येयांशीही सुसंगत आहे, असे या ठरावात म्हटले आहे. भाजप नेत्यांच्या भाषणातील हा आत्मविश्वास प्रभू रामाचे अस्तित्वच नाकारणार्या विरोधकांच्या नैराश्याचे रुपांतर वैफल्यग्रस्ततेत करणारा आहे, हे निश्चित!