मुंबई: ' बिझनेस स्टँडर्ड ' या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अदानी ग्रुप पश्चिम आशियातून २.६ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात आणून आपल्या ग्रीन हायड्रोजन, एअरपोर्ट या प्रकल्पासाठी आणू शकते. परदेशी सोव्हरिन फंडिंगची तरतूद करून अदानी समुहाकडून आगामी प्रकल्पाचे विस्तारीकरण करण्यासाठी हा निधी वापरला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही गुंतवणूक २०२४ चा मध्यावर भारतीय बाजारात महत्वाची ठरणार असल्याचे आकलन तज्ज्ञांच्या मते केले गेले. याबाबत नक्की कधी गुंतवणूक येईल याबाबत प्राथमिक माहिती निश्चित झाली नाही. मार्च २४ च्या तिमाहीत कंपनीचा ईबिटीडीए (कर,डेप्रिसिएशन, व्याज मोजण्यापूर्वी नफा) हा ८०००० कोटींच्या घरात जाऊ शकतो असा कयास बाजारात केला जात आहे.
मागील आर्थिक वर्षी हिंडेनबर्ग अहवालानंतर अदानी गुपला आर्थिक झळ सोसावी लागली होती. परंतु कमबॅक करत कंपनीने आपले वर्चस्व अबाधित राखले. याशिवाय जीक्यूसी पार्टनर, कतार इन्व्हेसमेंट अथोरिटी, टोटल एनर्जी अशा जागतिक संस्थेने अदानींसोबत आपली गुंतवणूक करुन कंपनीवर विश्वास दाखवला होता. यापूर्वी कंपनीने ४.६ अब्ज डॉलरची विविध प्रकल्पात गुंतवणूक, खरेदी विक्री, लोन परतावा , ग्रीन एनर्जी गुंतवणूक अशा विविध विषयांवर उलाढाल प्राप्त केली होती. नुकताच अदानी समुहाकडून गुजरातमध्ये सर्वांत मोठा ऊर्जा प्रकल्प घोषित करण्यात आला होता.