जन्मजात अंधत्व तरीही २२ भाषांचं ज्ञान! जगद्गुरु रामभद्राचार्य महाराजांचा थक्क करणारा जीवनप्रवास
18-Feb-2024
Total Views | 330
शनिवार, दि. १७ फेब्रुवारीला देशातील साहित्य क्षेत्रातील सर्वांत नामांकित आणि प्रसिद्ध असा ज्ञानपीठ पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आला. त्यातील एक होते, जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज आणि दुसरे प्रसिद्ध शायर आणि गीतकार गुलजार. रामभद्राचार्य महाराज यांना संस्कृत भाषेतील योगदानासाठी तर गुलजार यांना उर्दूतील साहित्यनिर्मितीसाठी हा पुरस्कार देण्यात आला.
ज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टकडून साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९६५ साली मल्याळम लेखक जी. शंकरा कुरूप यांना पहिल्यांदा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आला होता. ११ लाख रुपये रोख, मानपत्र आणि वाग्देवीची कांस्य मूर्ती असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. १९८२ पर्यंत हा पुरस्कार लेखकाच्या एका सर्वोत्तम साहित्य निर्मितीसाठी दिला जात होता. पण त्यानंतर भारतीय साहित्यातील लेखकाच्या एकूण योगदानासाठी तो दिला जाऊ लागला. यावेळीच्या ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार आणि जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज यांना मिळाला आहे. गुलजार हे सध्याच्या काळातील सर्वोत्तम उर्दू कवी आहेत.
याआधी त्यांना २००२ मध्ये उर्दूतील कामासाठी साहित्य अकादमी पुरस्कार, २००४ मध्ये पद्मभूषण, २०१३ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि चित्रपटांमधील विविध कामांसाठी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. गुलजार यांच्या प्रसिद्ध कलाकृती आहेत- रात पश्मीने की, एक बूंद चांद, पंद्रह पांच पचहत्तर और चौरस रात. गुलजार यांचे साहित्यनिर्मितीमध्ये मोठे योगदान असले तरी, त्यांची खरी ओळख चित्रपटांमधूनच होते. साहित्यनिर्मिती बरोबरच ते दिग्दर्शक, गीतकार, संवाद आणि पटकथा लेखक म्हणून चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. गुलजार यांनी १९६३ मध्ये विमल रॉय यांच्या बंदिनी चित्रपटातून गीतकार म्हणून पदार्पण केले. मौसम, आंधी, अंगूर, नमकीन और कोशिश हे गुलजार यांनी दिग्दर्शित केलेले प्रसिद्ध चित्रपट आहेत.
गुलजार यांच्यानंतर जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज यांच्याविषयी आपण माहिती घेऊ, उत्तर प्रदेशमध्ये दि. १४ जानेवारी, १९५० रोजी जन्मलेल्या जगद्गुरू रामभद्राचार्यजी यांचं मूळ नाव आहे गिरीधर मिश्र. जन्मानंतर अवघ्या दोनच महिन्यांत त्यांनी आपली दृष्टी गमावली. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक उपचार केलेत परंतु, त्यांना यश आले नाही आणि त्यांच्या पदरात जन्मभरासाठीचे अंधत्व आले. तरीही खचून न जाता जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज यांनी प्राथमिक शिक्षण आजोबांच्या देखरेखीखाली घेतलं. त्यांचे आजोबा त्यांना रामायण, महाभारत, विश्रामसागर, सुखसागर, प्रेमसागर, ब्रजविलास इत्यादी काव्यांतील श्लोक ऐकवत असत. विशेष म्हणजे त्यांना अंध व्यक्तींना वाचण्यासाठी वापरण्यात येणारी ब्रेन लिपीसुद्धा येत नाही. त्यांनी फक्त ऐकून सर्व श्लोक तोंडपाठ केलेले आहेत.
वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी त्यांनी अवध भाषेत आपली पहिली कविता रचली. रामभद्राचार्यजींनी पाच वर्षांचे असताना ऐकून ऐकून केवळ १५ दिवसांत संपूर्ण भगवतगीता तोंडपाठ केली. वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी ६० दिवसांत संपूर्ण श्री रामचरितमानस तोंडपाठ केले. कालांतरानं, त्यांनी सर्व वैदिक साहित्य, संस्कृत व्याकरण, भागवत, प्रमुख उपनिषदे, संत तुलसीदासांच्या सर्व रचना तसंच संस्कृत आणि भारतीय साहित्यातील इतर अनेक रचना लक्षात ठेवल्यात.
तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की, रामभद्राचार्य महाराज अंध असूनही त्यांना तब्बल २२ भाषा अवगत आहेत आणि त्यांनी आतापर्यंत ८० ग्रंथांची रचना केलीये. रामभद्राचार्य महाराज चित्रकुट इथं वास्तव्यास आहेत. हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे पीठ असलेल्या तुलसी पीठाची त्यांनी स्थापना केलीये. रामभद्राचार्य महाराज आपल्या अध्यात्मिक कार्यासाठीच नव्हे, तर सामाजिक कार्यासाठीसुद्धा ओळखले जातात. दि. २३ ऑगस्ट, १९९६ रोजी स्वामी रामभद्राचार्य यांनी चित्रकूट येथे अंध विद्यार्थ्यांसाठी तुलसी प्रज्ञाचक्षू विद्यालयाची स्थापना केली. त्यानंतर दि. २७ सप्टेंबर, २००१ रोजी चित्रकुट इथं त्यांनी अपंग विद्यापीठाची स्थापना केली. हे भारतातील पहिले अपंग विद्यापीठ आहे. स्वामी रामभद्राचार्य हे या विद्यापीठाचे आजीवन कुलगुरु आहेत. त्यांच्या याच कार्यासाठी २०१५ मध्ये जगद्गुरू श्री रामभद्राचार्य जी यांना भारत सरकारने पद्मविभूषण देऊन सन्मानित केले होते, तर आता त्यांच्या संस्कृत भाषेतील योगदानासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात येत आहे.
पण यापेक्षाही जगद्गुरुंची आणखी ओळख आहे, ती म्हणजे श्रीराम जन्मभूमी खटल्यातील साक्षीदार म्हणून. आपल्याला माहितीच असेल रामजन्मभूमी आंदोलनाचा खटला १३४ वर्षांपेक्षा जास्त काळ न्यायालयामध्ये चालला. या काळात हिंदू पक्षाकडून रामललाच्या जन्मस्थानीच बाबरी ढाच्या बांधण्यात आला असल्याचे अनेक ऐतिहासिक आणि पुरातत्वीय पुरावे सादर करण्यात आले होते. पण न्यायालयात मुस्लीम पक्षाने रामाचा जन्म बाबरी ढाच्याच्या जागीच झाला आहे, हे सांगणारे धार्मिक ग्रंथातील पुरावे मागितले. त्यावेळी हिंदू पक्षाच्या मदतीला धाऊन आले जगद्गुरु श्री रामभद्राचार्य महाराज. त्यांनीच न्यायालयात जवळजवळ ४३७ धार्मिक ग्रंथातील साक्ष्य न्यायालयासमोर सादर केल्या आणि हे सिद्ध केलं की, धार्मिक ग्रंथात राम जन्मभूमीच्या स्थानाचा उल्लेख आहे आणि ते स्थान हे बाबरी ढाच्याच आहे. यासाठी त्यांनी ऋग्वेदातील जैमिनीय संहितेतील श्लोक न्यायालयासमोर सादर केले. शरयू नदीपासून रामजन्मभूमीचं स्थान किती अंतरावर आहे आणि त्याच अंतरावर बाबरी ढाचा आहे, हे या श्लोकांमधून सांगण्यात आलं होतं. त्यांच्या धार्मिक ग्रंथातील अचूक साक्षींमुळे न्यायालयात हिंदू पक्षाची बाजू मजबूत झाली. त्यांच्याच याचं साक्षीमुळे हजारो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदूंना अयोध्येत भव्य राम मंदिर उभारता आले. त्यांचे राम मंदिर आंदोलनातील योगदान आणि त्यांचा ऐकून जीवनप्रवास जाणून घेतल्यावर त्यांच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाही.