नवी दिल्ली: पश्चिम बंगाल, बिहार आणि दिल्लीनंतर जम्मू – काश्मीरमध्येही काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीमध्ये फूट पडली आहे. नॅशनल कॉन्फरन्स हा पक्ष प्रदेशात कोणत्याही पक्षासोबत आघाडी करणार नसल्याची घोषणा फारुख अब्दुल्ला यांनी केली आहे.नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्द्ल्ला म्हणाले की, जम्मू – काश्मीरमध्ये कोणत्याही पक्षासोबत आघाडी करण्याची नॅशनल कॉन्फरन्सची ईच्छा नाही. प्रदेशात लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये नॅशनल कॉन्फरन्स एकट्यानेच निवडणूक लढवणार आहे, अशी घोषणा अब्दुल्ला यांनी केली आहे.
विशेष म्हणजे फारुख अब्दुल्ला यांच्या एका टिप्पणीने ते भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये (रालोआ) तर जाणार नाहीत ना, असा संशय निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला चर्चा करण्यास बोलावले तर आपण नक्कीच चर्चेस जाऊ, असे अब्दुल्ला यांनी म्हटले आहे.काँग्रेसप्रणित ‘इंडिया’ आघाडीस फूटीचे ग्रहण लागले आहे. कमकुवत झालेला असूनही आघाडीमध्ये आपलाच वरचष्मा राहिल, या काँग्रेसच्या धोरणास आता ‘इंडिया’ आघाडीमधील घटकपक्ष कंटाळले असून त्यांनी आघाडी सोडण्यास प्रारंभ केला आहे. आतापर्यंत तृणमूल काँग्रेस, जनता दल युनायटेड (जदयु) आणि आम आदमी पक्षाने ‘इंडिया’ आघाडी सोडली आहे. त्यामध्ये आता जम्मू – काश्मीरमधील नॅशनल कॉन्फरन्सची भर पडली आहे.