केंद्र सरकारने अखेर देशातील शालेय शिक्षणाशी संबंधित असलेल्या, इयत्ता दहावीपर्यंतच्या वर्गांसाठीच्या विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गासाठी प्रवेश देता येणार नाही, अशा स्वरुपाची मार्गदर्शक तत्त्वे नुकतीच जाहीर केली आहेत. केंद्र सरकारने विद्यार्थ्यांवरील ताण आणि त्या तणावाचे विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर होणारे दुष्परिणाम कमी करण्यासाठी, पावले उचलण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रयत्नाचा भाग म्हणून त्याकडे पाहावे लागेल.
शिक्षणाचा ताण असह्य झाल्याने अनेक विद्यार्थी आत्महत्या करत असल्याची बाबही यापूर्वी अनेकदा समोर आली आहे. देशभरात शिक्षणामुळे ही कोवळी पानगळ होत असताना, शिक्षणाने विद्यार्थ्यांचे जीवन फुलवणे आणि बहरण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मारक ठरताना दिसते. त्यामुळे शिकवणी संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांकडे गंभीरपणे पाहण्याची गरज आहे.केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या निर्देशामुळे, १६ वर्षांच्या आतील विद्यार्थ्यांची नोंदणी यापुढे शिकवणी वर्गासाठी करता येणार नसल्याने, देशभरात त्याबद्दल उलटसुलट चर्चेला आरंभ झाला. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाने या निर्णयाचे स्वागत केले, तर शिकवणी वर्ग चालवणार्यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. पालक काही प्रमाणात द्विधा मनःस्थितीत आहेत. मुळात सरकारला यासारखे नियम का करावे लागतात? ते जाणून घेण्याबरोबर पालकांनी आपली मुले शाळते पाठविणे आणि पुन्हा शाळेतील अभ्यासक्रम शिकण्यासाठी शिकवणी वर्गाला पाठवणे, हे का करावे लागते आहे? याचाही विचार करण्याची गरज आहे.
देशभरात अभ्यासाच्या ओझ्यामुळे विद्यार्थी आत्महत्या करत असल्याच्या दुर्देवी घटनाही अलीकडच्या काळात निदर्शनास आल्या. गेल्या काही वर्षांत शालेय वयातील विद्यार्थ्यांचे हृदयविकाराने निधन होत असल्याचे प्रसंगही अंगावर काटा आणणारेच. त्यामुळे विद्यार्थी विविध कारणांनी तणावाखाली जीवन जगत आहेत. म्हणूनच मग शिक्षण हे विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचा मार्ग निर्माण करण्याऐवजी दुःखाचा मार्ग ठरत आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. विद्यार्थ्यांच्या वाट्याला निराशा येते, हे वर्तमानातील वास्तव. शिक्षणामुळे ताणतणावाचा आलेख उंचावतो, मुले निराशेच्या छायेत सापडत आहेत. मुलांचा रात्रंदिवस गुणांसाठी संघर्ष सुरू आहे, त्यातून त्यांचे जगणे हरवत चालले आहे. जीवनाचा आनंद लुटण्यात हे विद्यार्थी कमी पडतात. कारण, सर्वत्र केवळ गुणांची मागणी आणि स्पर्धा. त्यातच पालकांच्या अपेक्षा मोठ्या प्रमाणावर उंचावलेल्या आहेत. प्रत्येक पालकाला आपला पाल्य ’आयआयटी’तून शिकलेला हवा. पाल्य अभियंता हवा नाही, तर डॉक्टर तरी हवा. त्यांना विशिष्ट ठिकाणी आणि विशिष्ट महाविद्यालयातच प्रवेश हवा. पालकांना सारेच मनासारखे हवे. मुलांची अभिरुची, कल यांपेक्षा पालकांच्या अपेक्षा अधिक वरचढ ठरलेल्या दिसतात. पालकांच्या उंचावणार्या अपेक्षा अधिक चिंतेची वाट ठरू लागली आहे. मुलाचे शिकणे महत्त्वाचे नाही, तर केवळ गुणांची मागणी वाढत असल्यानेच, शिकवणीचे पीक फोफावलेले दिसते. यात पालकांबरोबर शाळादेखील तितक्याच जबाबदार आहेत, हे लक्षात घ्यायला हवे.
’असर’ने नुकत्याच केलेल्या एका पाहणी अहवालानुसार, इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या शिकवणीला जाण्याच्या प्रमाणात गेल्या काही वर्षांत सातत्याने वाढ झाल्याचे दिसते. २०१८ मध्ये २४.२ टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गात सहभागी झाले होते. २०२० मध्ये तेच प्रमाण ३३.२ टक्क्यांवर पोहोचले, तर २०२१ मध्ये याच प्रमाणात ३७ टक्क्यापर्यंत वाढ झाली आहे. तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता, २०१८ मध्ये शिकवणीला जाणार्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २७.७ टक्के होते, तर २०२० मध्ये हेच प्रमाण ३२.९ टक्के इतके झाले. त्यात २०२१ मध्ये वाढ होऊन, ते प्रमाण ३९.४ टक्क्यांवर पोहोचले आहे. सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा विचार करता, २०१८ मध्ये २८.६ टक्के विद्यार्थी शिकवणीला प्रवेशित झाली होती. २०२० मध्ये हे प्रमाण ३०.७ टक्के, तर २०२१ मध्ये हेच प्रमाण ३८.९ टक्क्यांवर पोहोचले होते. नववी व त्यावरील वर्गांचा विचार करता, २०१८च्या निष्कर्षानुसार, ३५.५ टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गात दाखल झाले होते. २०२० मध्ये ३३.६ टक्के विद्यार्थी, २०२१ मध्ये ४१.१ टक्के विद्यार्थ्यांनी शिकवणी वर्गाला प्रवेश घेतले होते. शिकवणी वर्गाला प्रवेश घेतलेल्या सरासरीचा विचार करिता, २०१८ मध्ये २८.६ टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गात शिकत होते. २०२० मध्ये हे प्रमाण ३२.५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. म्हणजे एका वर्षात सुमारे चार टक्के प्रमाणात वाढ झाली. २०२१ मध्ये हे प्रमाण ३९.२ टक्के होते. म्हणजे त्यामागील वर्षापेक्षा हे प्रमाण सुमारे साडेसात टक्क्यांनी वाढ झाल्याचे अधोरेखित होते. या काळात ’कोरोना’चा परिणाम असे मानले, तरी त्यानंतरही तोच प्रवाह पुढे दिसतो.
देशात शाळा शिक्षणासाठी अस्तित्वात असताना, सरासरी ४० टक्के विद्यार्थी शिकवणी वर्गाला प्रवेश घेत असतील, तर शाळांचा हेतू आणि तेथील शिक्षण प्रक्रियेवर शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. शिकवणीला प्रवेश घेणारी ४० टक्के विद्यार्थी संख्या ही काही कमी नाही, याचाही विचार शिक्षण व्यवस्थेत काम करणार्या प्रत्येकाने करायला हवा. शिकवणी वर्गाला जाणारे, विद्यार्थी केवळ सरकारी शाळेतील आहे, असे नाही तर खासगी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे सरासरी प्रमाण ३९.५ टक्के इतके आहे, तर खासगी शाळांमधील प्रवेशाचे प्रमाण ३८.२ टक्के इतके आहे. अर्थात, हा फरक फार मोठा नाही, हेही लक्षात घ्यायला हवे. सरकारी शाळा गुणवत्तेच्या नाहीत, असा शिक्का सातत्याने मारला जातो. अशा वेळी पर्याय म्हणून खासगी शाळांकडे प्रवेश घेण्याचा ओढा दिसतो आहे. मात्र, या निष्कर्षाकडे आपण पाहिले, तर खासगी शाळांमध्ये प्रवेश घेऊनही, विद्यार्थी शिकवणी वर्गात प्रवेश घेताना दिसत आहेत. त्यामुळे शाळा कोणतीही असली, तरी शिकवणीकडील ओढा वाढताना दिसतो आहे. देशात सुमारे पाच लाख शिकवणी वर्गांचे आस्तित्व आहे. या सर्व प्रक्रियेत साधारण ५० लाख रोजगार गुंतलेला आहे, असे सांगितले जाते. अर्थात, रोजगार महत्त्वाचा असला, तरी विद्यार्थ्यांवरील तणाव उंचावून, आपण फार काही साध्य करू शकणार नाही.
केंद्राने केलेल्या निर्देशात १६ वर्षांखालील विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गास प्रवेशास प्रतिबंध करण्यात आला आहे. सध्या बाजारात शिकवणी वर्गाच्या जाहिराती मोठ्या प्रमाणावर आहेत. विशिष्ट शिकवणी वर्गाला प्रवेश म्हणजे हमखास विशिष्ट महाविद्यालय, विशिष्ट ठिकाणी प्रवेश असे जणू समीकरणच़ यशाची आणि टक्केवारीची दिली जाणारी हमी चिंताजनकच मानायला हवी. या स्वरुपात जाहिराती करण्यात येत आहेत, त्यामुळे पालकांची मोठ्या प्रमाणावर आर्थिक फसवणूक होते. अशा वेळी विशिष्ट गुण संपादन व विशिष्ट संस्थेत हमखास प्रवेश देण्याचे आश्वासन देणारी जाहिरात करण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. ही तरतूद वर्तमानात पालकांसाठी अधिक महत्त्वाची ठरणार आहे. शिकवणी वर्गाला प्रवेश म्हणजे हमखास प्रवेश ही फसवणूक ठरत असताना, पालकांना कायदा अथवा शासन निर्णय नसल्याने फारसे काही करता येत नव्हते. अलीकडे शिकवणी वर्गाचे शुल्काचे आकडे केव्हाच हजारोंचे आकडे पार करून गेले आहेत. काही ठिकाणी तर हे आकडे लाखोंची उड्डाणे घेत आहेत.त्यामुळे सामान्य पालकांच्या हातून शिक्षण केव्हाच दूर गेले आहे. त्यामुळे शिकवणी वर्गाच्या संदर्भाने सुयोग्य शुल्क आकारण्याबाबत सूचित केले आहे. यापूर्वी देखील या संदर्भात सूचना अनेकदा करण्यात आलेल्या होत्या; मात्र त्याची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही, आता तरी दखल घेतली जाईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.
एखाद्या विद्यार्थ्याने शिकवणीला प्रवेश घेतला आणि त्यासाठी त्याने पूर्ण रक्कम भरली असेल आणि त्याने मध्येच शिकवणी वर्ग सोडला असेल, तर पैसे परत दिले जात नाही. आता मात्र शिकवणी वर्गाच्या व्यवस्थापनाला त्याने जितका काळ शिकवणी वर्गात शिकणे केले आहे, तितक्याच काळाचे शुल्क घेऊन उर्वरित रक्कम परत करावी लागणार आहे.अर्थात, शासनाने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत.शासनाने निर्धारित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन न केल्यास, संबंधित शिकवणी वर्गाच्या चालकास एक लाख रूपये दंड केला जाईल. गरजेप्रमाणे शिकवणी वर्गाची मान्यतादेखील रद्द केली जाईल, असेही म्हटले आहे. त्यामुळे यापुढील काळात निश्चित शिकवणी वर्गास काही प्रमाणात पायबंद होईल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.खरे तर शिकवणी वर्ग इतक्या लहान वयात लावल्यामुळे विद्यार्थ्यांवर ताण येतो. अलीकडे प्राथमिक शाळांची दहा ते पाच अशी वेळ ग्राह्य धरली, तर सकाळी व सायंकाळी विद्यार्थ्यांना शिकवणी वर्गाला जावे लागते. विद्यार्थ्यांचे वय आणि शिकण्याचा कालावधी हे सारे अमानसशास्त्रीय ठरते. अशा वेळी गरजेपेक्षा अधिक वेळ विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या नावाखाली काही लादण्याचा प्रयत्न होतो आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. शिकवणी वर्गाच्या प्रवेशामुळे विद्यार्थ्यांचे मैदानाशी नाते तुटले आहे. विद्यार्थ्यांचे मनोरंजन, संवाद हरवत चालला आहे. त्याचा विपरित परिणाम आरोग्यावर होतो आहे. अभ्यासाच्या अतिरिक्त वेळ आणि तणावमुळे विद्यार्थ्यांच्या झोपेची वेळ कमी होते आहे.
अनेकदा विद्यार्थी शाळेत शिकत असताना दुर्लक्ष करतात. कारण, ते शिकवणीला होईल, अशी अपेक्षा ठेवून असतात. त्यामुळे दोन्ही ठिकाणी शिकवूनही अनेकदा शिकणे परिणामकारक होताना दिसत नाही. शिकल्यानंतर सराव, चिंतन, मनन करण्यासाठी विद्यार्थ्यांना वेळ आणि संधी उपलब्ध असण्याची गरज असते, तीच त्यांना पुरेशा प्रमाणात वेळेअभावी मिळत नाही. शिकवणी वर्गात शिकत असताना, अनेक ठिकाणी प्रयोगशाळा नाहीत, ग्रंथालय नाहीत. अशा स्वरुपात केवळ गुणांसाठी शिकणे घडते आहे. आशय पूर्णतः समजून घेण्यापेक्षा केवळ गुणांसाठीच्या युक्त्या पदरी पाडून, विद्यार्थ्यांच्या ओंजळीत केवळ शिक्षणाच्या नावाखाली गुण ओतले जात आहे. शिक्षण म्हणून जो व्यापक अर्थ शिक्षणाच्या हेतूला जोडलेला आहे, तो शिकवणीच्या वर्गात साध्य होतो का? याचाही विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. शिक्षण म्हणजे व्यक्तिमत्त्वाचा विकास असतो. शिक्षण म्हणजे जगण्याची समृद्ध वाट असते, असे असताना शिकवणीत जगण्याची शक्ती मस्तकी भरली जाते का? याचा विचार करण्याची गरज आहे. भारतातील शिकवणी संस्कृतीबद्दल ’राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’तही चिंता व्यक्त केली आहे. शिक्षणाच्या व्यवस्थेतून अशी काही व्यवस्था उभी करायची आहे की, जेणेकरून शिक्षणाला गिळंकृत करू पाहणार्या शिकवणीसारखी वाढत चाललेली संस्कृती दूर सारायला जायला हवी, ही अपेक्षा या निमित्ताने पूर्णत्वाला जायला हवी. सरकारने कितीही चांगले निर्णय घेतले, तरी त्याचे यशापयश हे पालकांच्या मानसिकतेवर अवलंबून असणार आहे. पालकांनीच शिक्षणाचा खरा अर्थ जाणून घेऊन, पाल्यांच्या विकासाचा विचार करायला हवा.केवळ पैसे कमविणारा व्यवसाय अथवा नोकरी देणारे अभ्यासक्रम म्हणजे शिक्षण नाही, तर त्या पलीकडे उत्तम माणूस घडवते, जगण्याला शक्ती आणि उमेद देते त्यालाच ’शिक्षण’ म्हणतात, याचाही विचार करायला हवा. त्यादृष्टीने पालकांची मानसिकता बदलायला हवी.धोरणातील तरतूदींचा विचार शिक्षणाच्या मूळ हेतूशी नाते सांगणारा आहे. त्यामुळे त्या हेतूपासून दूर न जाता, तोच मार्गक्रमण करण्याची निंतात गरज वर्तमानात अधोरेखित होऊ लागली आहे. त्यातच सर्वांचे हित सामावलेले आहे.