नवी दिल्ली : संपूर्ण जग सध्या भारताकडे विश्वबंधु म्हणून पाहत आहे, भारताकडून संपूर्ण जगास अपेक्षा आहेत. या प्रवासात युएई हा भारताचा भक्कम साथीदार असून भारत आणि युएई एकविसाव्या शतकाचा नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अबुधाबी येथे केले. भारतीय समुदायास संबोधित करताना ते बोलत होते.
भारताने संपूर्ण जगास स्थैर्य विकासाची हमी दिली आहे. त्यामुळे संपूर्ण जग भारताकडे विश्वबंधु म्हणून पाहत आहे. जगभरात कोठेही संकट येवो, मदत करणाऱ्या पहिल्या देशांमध्ये भारताचा समावेश होते. करोनाच्या जागतिक संकटात भारताने आपल्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. त्यामुळे संपूर्ण जगास खात्री आहे की भारत सर्वसमावेशक नवी जागतिक व्यवस्था निर्माण करू शकतो. यामध्ये युएई हा भारताचा भक्कम मित्र आहे. एकविसाव्या शतकाचा नवा इतिहास रचण्यासाठी भारत आणि युएई सज्ज आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
युएईच्या विकासामध्ये भारतीय समुदायाचे मोठे योगदान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, भारतीय समुदायासाठी मंदिराच्या उभारणीसाठी युएईच्या राष्ट्राध्यक्षांनी तत्काळ मान्यता दिली. दोन्ही देशांचे सांस्कृतिक संबंध हजारो वर्षांपासून आहेत, आता आर्थिक संबंधही मजबूत होत आहेत. युएई हा भारताचा तिसरा सर्वांत मोठा व्यापार भागिदार तर सातवा सर्वांत मोठा गुंतवणूकदार आहे. भारतातील डिजीटल क्रांतीचा लाभ युएई आणि येथील भारतीयांनाही प्राप्त होण्यासाठी भारत सज्ज आहे. भारताची चौफेर प्रगती होत असून २०४७ सालापर्यंत विकसित भारताचे स्वप्न साध्य करण्यासाठी देश सज्ज आहे, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले आहे.
दोन्ही देशांमध्ये झाले द्विपक्षीय करार
संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकृत दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आज अबुधाबी येथे आगमन झाले. संयुक्त अरब अमिरातीचे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान यांनी विमानतळावर त्यांचे स्नेहपूर्ण स्वागत केले आणि त्यानंतर त्यांचे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. उभय नेत्यांमध्ये परस्पर संवाद आणि शिष्टमंडळ स्तरावर चर्चा झाली. त्यांनी द्विपक्षीय भागीदारीचा आढावा घेतला आणि सहकार्याच्या नवीन क्षेत्रांवर चर्चा केली.
· द्विपक्षीय गुंतवणूक करार: हा करार उभय देशांमधील गुंतवणुकीला अधिक चालना देण्यासाठी एक प्रमुख सहाय्यक ठरेल. भारताने युएई सोबत द्विपक्षीय गुंतवणूक करार आणि सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे.
· विद्युत आंतरजोडणी आणि व्यापार क्षेत्रातील सहकार्यावर सामंजस्य करार: यामुळे ऊर्जा सुरक्षा आणि ऊर्जा व्यापारासह ऊर्जा क्षेत्रात सहकार्याची नवीन कवाडे उघडली जातील.
· भारत-मध्य पूर्व आर्थिक कॉरिडॉरवर भारत आणि युएई मधील आंतर-सरकारी आराखडा करार : या विषयावरील परस्पर सामंजस्य आणि सहकार्य यावर हा करार आधारित असेल आणि यामुळे भारत आणि युएई दरम्यानच्या प्रादेशिक कनेक्टिव्हिटी सहकार्याला प्रोत्साहन मिळेल.
· डिजिटल पायाभूत सुविधा प्रकल्पांमधील सहकार्याबाबत सामंजस्य करार: हे डिजिटल पायाभूत सुविधा क्षेत्रात गुंतवणूक सहकार्यासह विस्तृत सहकार्यासाठी एक चौकट तयार करेल आणि तांत्रिक ज्ञान, कौशल्ये आणि विशेषज्ज्ञांची देवाणघेवाण सुलभ करेल.
· उभय देशांमधील राष्ट्रीय पुराभिलेखागार सहकार्य नियमावली: ही नियमावली पुरालेख सामग्रीची पुनर्स्थापना आणि जतन यांचा समावेश असलेल्या या क्षेत्रातील व्यापक द्विपक्षीय सहकार्याला आकार देईल.
· वारसा आणि संग्रहालयांच्या क्षेत्रात सहकार्यासाठी सामंजस्य करार: यामुळे गुजरातमधील लोथल येथील सागरी वारसा संकुलाला पाठबळ देण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांमधील बांधिलकी वाढेल.
· त्वरित पेमेंट प्लॅटफॉर्म - युपीआय (भारत) आणि एएएनआय (युएई) यांच्या परस्पर संलग्नतेबाबत करार: यामुळे दोन्ही देशांमधील अखंड सीमापार व्यवहार सुलभ होतील. हे गेल्या वर्षी जुलैमध्ये माननीय पंतप्रधानांच्या अबुधाबी भेटीदरम्यान इंटरलिंकिंग पेमेंट आणि मेसेजिंग सिस्टम्सच्या सामंजस्य कराराचे अनुसरण करते.
· देशांतर्गत डेबिट/क्रेडिट कार्ड्स संलग्न करण्याबाबतचा करार - रुपे (भारत) सह जेएवायडब्लूएएन (युएई): आर्थिक क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचे एक महत्त्वाचे पाऊल, यामुळे संयुक्त अरब अमिरातीतील रूपे ची सार्वत्रिक स्वीकृती वाढेल.