'ईडी’चा फेरा चुकविण्यासाठी अरविंद केजरीवालांचे विपश्यना, ध्यानधारणा, चौकशीला दांड्या असं सगळं करून झालं; मात्र ‘ईडी’चा ससेमिरा काही सुटलेला नाही. आता त्यांनी काँग्रेसला दणका देत, पंजाब तसेच चंदीगढ लोकसभेच्या सर्व जागा एकट्याने लढण्याचे जाहीर केले. तसेच दिल्लीतील सर्व सात लोकसभेच्या जागा आप जिंकेल, असा दावाही केला. त्यामुळे ज्यांच्यासोबत आघाडी आहे, त्या काँग्रेसला पंजाब-दिल्लीत एकही जागा आप देणार नाही, हे तर स्पष्टच आहे. त्यामुळे केजरीवालांचा ‘एकला चलो रे’चा निर्णय आधीच पक्का झालेला दिसतोय. ’इंडी’ आघाडीसोबत दगाफटका करणार नाही, अशा शपथा घेऊनही, त्यांनी आघाडीला बगल दिलीच. नुकतेच पंजाबमध्ये केजरीवाल जनतेकडे आशीर्वाद मागायला गेले. खन्ना येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी आशीर्वादाऐवजी मतांची भीक मागितली. त्यामुळे आशीर्वादाऐवजी मतं मागून, तिथेही केजरीवालांनी दगाफटका केलाच. दरम्यान, पंजाबमध्ये आपने काँग्रेससोबत लढू नये, अशी इच्छा पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची होती. जागावाटपाबाबत झालेल्या बैठकांपासून त्यांनी अंतर राखले होते. त्यानंतर केजरीवालांनी लोकसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्याची घोषणा केल्यानंतर, केजरीवालांवर आपच्या पंजाब युनिटचा दबाव होता, हे स्पष्ट झाले. केजरीवालांनी सोमवारी अयोध्येतील रामलला मंदिरात जाऊन, सहकुटुंब दर्शन घेतले. एकीकडे ’ईडी’ पाठ सोडत नसताना आणि तिकडे काँग्रेसची आघाडी म्हणजे ’असून अडचण, नसून खोळंबा’ असा प्रकार असल्याने, त्यांनी थेट रामललाच शरण जाण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय. यावेळी त्यांच्यासोबत भगवंत मान हेदेखील उपस्थित होते. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह रामललाच्या दर्शनाला गेले होते. यावेळी त्यांचे अयोध्यावासीयांनी जोरदार स्वागत केले. दरम्यान, मागील महिन्यात केजरीवालांनी हरियाणातील एका सभेत “मी याठिकाणी सत्तेसाठी नाही आलो, ना पैसे कमविण्यासाठी आलो ना मंत्री किंवा मुख्यमंत्री बनण्यासाठी आलो!” असे म्हटले होते. ‘ईडी’ने इतके समन्स पाठवूनही, चौकशीला न जाणारे, केजरीवाल खोटं किती बोलू शकतात, हे यावरून समजून येते. त्यामुळे रामललाचे दर्शन घेऊन, आपल्या चुकांवर पांघरूण घालण्याचा त्यांचा प्रयत्न कदापि यशस्वी होणार नाही!
जुन्या काळात देवघरात नंदादीप असायचे, जे दिवसभर तेवत राहायचे. खंड न पडता, दिवा देवघरात तेवत राहावा, म्हणून नंदादीपाला विशेष प्राधान्य दिले जायचे. असाच काहीसा प्रकार ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा. एकीकडे नंदादीप अखंड तेवत राहून, घरामध्ये सकारात्मकता पसरविण्याचे काम करतो आणि दुसरीकडे ‘राजदीप’ मात्र दिवसरात्र भाजप विरोध करून, सगळीकडे नकारात्मकता पसरविण्याचे काम करतात. ही नकारात्मकता पसरविण्यासाठी, खास बक्षिसेदेखील दिली जातात आणि त्या बक्षिसाच्या लाभार्थी ठरल्या आहेत, त्यांच्या पत्नी सागरिका घोष. नुकतेच तृणमूल काँग्रेसने त्यांना राज्यसभेसाठी तिकीट दिले. राजदीप अनेकदा सोशल मीडिया आणि वृत्तवाहिनीच्या माध्यमातून भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपप्रचार करण्यासाठी, देशभरात ओळखले जातात. या बाबतीत पती-पत्नी दोघांचेही मत समान.राजदीप हे ’रसगुल्ला पत्रकारिते’साठीही ओळखले जातात. ज्यासाठी त्यांना बहुधा त्यांची पत्नी राज्यसभा खासदार झाल्याच्या रुपाने बक्षीस मिळाले आहे. राजदीप यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात कबूलही केले होते की, “जर मी ममता बॅनर्जींना त्यांच्या राज्यात होत असलेल्या, हिंसाचारावर कठोर प्रश्न विचारले असते, तर त्यांना रसगुल्ला मिळाला नसता.” राजदीप यांनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीतील हिंसाचाराच्या संदर्भात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना कोणताही प्रश्न विचारला नाही; कारण ते ’चाय पे चर्चा’ करण्यासाठी गेले होते आणि त्यांनी प्रश्न विचारला असता, तर त्यांना रसगुल्ला मिळाला नसता.हिंदू कुटुंबे आणि मुस्लीम जावई यांच्यातील जिहादला ‘मानसिक वेडेपणा’ बनवून, जबरदस्तीने धर्मांतर करण्याच्या धमकीचा अतिशय सोयीस्करपणे विपर्यास सागरिका यांनी केला होता. घोष यांनी घृणास्पद गुन्ह्यातील पीडितांना गप्प केले आणि पीडितांनाच दोष देण्यास सुरुवात केली. ज्या स्त्रियांना अशा भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागते, ते ’मुस्लीम जावई’च्या मानसिक वेडाचे परिणाम आहे, असे त्यांचे मत. एकूणच हिंदूविरोध दोघांमध्ये कुटूनकुटून भरला असून, ज्याची पोचपावती सागरिका यांना राज्यसभेच्या तिकिटाच्या रुपात मिळाली. आपली वाहवा करणार्या आणि हिंसेविरोधात प्रश्न न विचारणार्यांवर ममता अशी राज्यसभेची माया दाखवत असतील, तर बंगाली जनताही येत्या काळात ममतांवरील खरी माया दाखवून देतील, हे निश्चित!