२०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प घेऊन काम करणार्या मोदी सरकारने भारताचे सांस्कृतिक वैभव आणि परंपरा सातासमुद्रापार नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. विशेष म्हणजे, त्यांचे महत्त्व जगाला समजावून सांगत, त्याची महतीही पटवून दिली. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे योग. नुकतेच सौदी अरेबियातील मक्का येथे दुसर्या ’सौदी ओपन योगासन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘अल-वेहदा सौदी क्लब’ने आयोजित केलेल्या या स्पर्धेत अनेक मुलामुलींनी सहभाग घेतला. योगला जगाने स्वीकारले; मात्र सौदी अरेबियातील मक्का शहरात पहिल्यांदा नव्हे, तर सलग दुसर्यांदा अशा स्पर्धेचे आयोजन होणे, ही खरंच भारताच्या दृष्टीनेही तितकीच महत्त्वपूर्ण घटना. अशा या या स्पर्धेत जेद्दाह, मक्का, मदिना, तैफ आणि इतर शहरांतील अनेक जण सहभागी झाले. त्यामुळे सौदीमधील योगाच्या वाढत्या लोकप्रियतेचा हा पुरावाच म्हणता येईल.
‘सौदी योग समिती’ने आयोजित केलेला हा महोत्सव ‘सौदी अरेबिया ऑलिम्पिक समिती’ आणि क्रीडा मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. ’सौदी योग समिती’चे अध्यक्ष नूफ अल-मारवाई यांनी या स्पर्धेला उपस्थित राहून, उपस्थितांना शारीरिक आणि मानसिक आरोग्याला चालना देण्यासाठी योगाचे महत्त्व पटवून सांगितले. भारताचे सौदीमधील काऊंसिल जनरल मोहम्मद शाहीद आलम यांनीही या स्पर्धेला हजेरी लावत, ”अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे सौदी अरेबिया आणि भारतामधील सांस्कृतिक देवाणघेवाण आणि राजनैतिक संबंध आणखी दृढ होतील,” असे सांगितले. या स्पर्धेला अनेक आंतरराष्ट्रीय प्रतिनिधीदेखील उपस्थित होते. पहिली ’सौदी ओपन योग आसन चॅम्पियनशिप’ २०२२ मध्ये जेद्दाह येथे आयोजित करण्यात आली होती.
दरम्यान, दि. ११ डिसेंबर २०१४ रोजी संयुक्त राष्ट्र महासभेने दरवर्षी २१ जून हा दिवस ’जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. भारत हे योगसाधनेचे माहेरघर. जेव्हा संपूर्ण विश्व कोरोना महामारीशी लढा देत होते, तेव्हा योग हा अनेक देशांसाठी आशेचा किरण ठरला. आपल्या ऋषी-मुनींनी योगासाठी ‘समत्वम् योग उच्यते’ असे म्हटले. त्यांनी सुख-दुःखात एक सारखे वर्तन राहावे, वागण्यात संयम राहावा, यासाठी योगाला एका मापदंडाचे स्थान दिले. कोरोनासारख्या जागतिक आपत्तीमध्ये योगाने ही गोष्ट सिद्धदेखील करून दाखवली. जगाच्या कानाकोपर्यात लाखोंच्या संख्येने नवे योगसाधक तयार झाले. योगामध्ये सांगितलेल्या संयम आणि शिस्तबद्धता या सर्वप्रथम धड्याला सर्वांनी आपापल्या जीवनात अंगी बाणवायचे प्रयत्नदेखील सुरू केले आहेत. कोरोनाकाळात कुठलाही देश, साधनांच्या, सामर्थ्याच्या आणि मानसिक अवस्थेच्या पातळीवर या विषाणूशी लढण्यासाठी तयार नव्हता. अशावेळी योग हे आत्मबळ मिळविण्याचे सर्वात मोठे माध्यम बनले होते. या आजाराशी आपण लढू शकतो, हा विश्वास योगाने लोकांमध्ये वाढीस लावला. अनेक डॉक्टरांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत योगचा एखाद्या संरक्षक कवचासारखा वापर केला. योगच्या साहाय्याने, डॉक्टरांनी स्वतःला तर सशक्त केलेच; पण त्याचसोबत रुग्णांना लवकर बरे करण्यासाठीदेखील योगाचा उपयोग करून घेतला. देश-विदेशात योग संस्थांची संख्या वाढतेय.
‘वसुधैव कुटुम्बकम्’ हा मंत्र भारताची प्राचीन परंपरा असून, आजही त्याच सूत्राने भारताची जागतिक वाटचाल होताना दिसते. आज जगानेही ‘योग’ ही संकल्पना मान्य केली आहे. संयुक्त राष्ट्रांत आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव योगशास्त्र संपूर्ण विश्वासाठी सुलभतेने उपलब्ध व्हावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनच मांडला गेला होता. सौदी अरेबियाने योगाचा स्वीकार केल्याने, सौदी ’ओपन योगासन चॅम्पियनशिप’सारख्या स्पर्धा निरोगीपणा, एकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढविण्यात येत्या काळात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील, यात काही शंका नाही. एकीकडे योगाबाबत असे सकारात्मक चित्र असताना, अजूनही योगाकडे केवळ हिंदू संस्कृतीचे प्रतीक आणि धार्मिक प्रार्थनेशी योगपरंपरेला जोडणारे, सूर्यनमस्कारांवरुनही नाकं मुरडणारे देशविदेशातील अन्य मुसलमान, मक्केच्या या योगमार्गाचे अनुकरण करतील का?
७०५८५८९७६७