ज्ञानवापीतील पूजेच्या निर्णयानंतर ओवेसीचा संताप; म्हणाले-हा निर्णय चुकीचा, हे उघडपणे...

    01-Feb-2024
Total Views |
Asaduddin Owaisi on Gyanvapi

नवी दिल्ली : ज्ञानवापी संकुलाच्या धार्मिक वैशिष्ट्यावरून सुरू असलेल्या न्यायालयीन वादाच्या दरम्यान वाराणसीतील जिल्हा न्यायालयाने दि.३१ जानेवारीला ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिणेकडील तळघर (व्यास तळघर) हिंदूंनी दैनंदिन पूजेसाठी सोपवण्याचे निर्देश दिले. त्यानंतर ३० वर्षानंतर ज्ञानवापीत पुजा-अर्चा झाली. पण या निर्णयाबद्दल असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, हा निर्णय वर्शिप कायद्याचे उल्लघंन आहे.
 
पुढे ते म्हणाले की, हा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा निवृत्तीचा दिवस होता. दि. १७ जानेवारी रोजी त्यांनी जिल्हा दंडाधिकारी यांची रिसीव्हर म्हणून नियुक्ती केली होती. आता तळघरात पूजा करण्याचा अधिकार देऊन संपूर्ण प्रकरण निकाली काढले आहे. १९९३ पासून तिथे काहीही होत नव्हते, पण आता तुम्ही पूजा करण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे ह्या निर्णयाने वर्शिप कायद्याचे उघडपणे उल्लंघन झाले आहे, हा चुकीचा निर्णय आहे. तसेच ६ डिसेंबरची पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते. राममंदिर खटल्याचा निकाल देताना आम्ही श्रद्धेच्या आधारावर निकाल दिल्याचे सांगितले होते. आता या बाबी भविष्यातही सुरू राहणार आहेत, असे ही औवेसी म्हणाले.

आज ३० वर्षांनी शिवभक्तांना न्याय मिळाला. बाबा विश्वनाथ मंदिर परिसरात व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार देण्याबाबत न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयाचे मी मनापासून स्वागत करतो. १९९३ पासून भाविक या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते - केशवप्रसाद मौर्य, उपमुख्यमंत्री

ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमीच्या जीर्णोद्धारासंदर्भातील जनहित याचिका त्वरित सूचीबद्ध करण्याची विनंती करण्यासाठी मी आता सर्वोच्च न्यायालयात जाईन. वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांसमोर अर्ज दाखल करून आम्हीही या खटल्यात पक्षकार होण्याचा निर्णय घेतला आहे. - सुब्रह्मण्यम स्वामी, राज्यसभा खासदार