स्टेमची पाणी उचल क्षमता वाढणार - विविध कामांसाठी २७८ कोटी मंजूर
09-Dec-2024
Total Views | 42
ठाणे : ( Thane ) ठाणे, भिवंडी-निजामपूर आणि मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पात ५०० दशलक्ष लिटर क्षमतेचे नवीन पंप हाऊस आणि बारा किलोमीटरची नवीन जलवाहिनी यांच्या कामाचा शुभारंभ महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. यामुळे स्टेमची पाणी उचल क्षमता वाढुन नागरिकांची जलचिंता दूर होणार आहे.
ठाणे, भिवंडी-निजामपूर मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रास पाणीपुरवठा करणाऱ्या स्टेम प्रकल्पाची पाणी उचल क्षमता वाढवण्यासाठी, नवीन पंप हाऊसचे बांधकाम, नवीन जलवाहिनी टाकणे आणि जुन्या जलवाहिनीची दुरुस्ती करणे या कामासाठी शासनाकडून २७८ कोटी रुपयांचा निधी ऑक्टो.२०२४ मध्ये मंजूर करण्यात आला आहे.उल्हास नदीपात्रातून पाणी उचलण्यासाठी ३०० दशलक्ष लिटर क्षमतेचे पंप हाऊस आणि जलवाहिनी यांचे बांधकाम १९८५ मध्ये करण्यात आली होती. तेव्हा, शहाड ते टेमघर अशी ०९ किलोमीटरची अशुद्ध पाणी वाहून देणारी जलवाहिनी आणि टेमघर ते माणकोली मुख्य वितरण टाकी अशी ०३ किलोमीटरची शुद्ध पाण्याची जलवाहिनी टाकण्यात येणार आहे.
स्टेम अंतर्गत येणाऱ्या महापालिका क्षेत्राची वाढीव पाण्याची आवश्यकता लक्षात घेऊन नवीन पंप हाऊस आणि नवीन जलवाहिनी यांचे काम पूर्ण करण्यासाठी दोन वर्षांचा अवधी देण्यात आला असला तरी ते काम दीड वर्षातच पूर्ण करावे. त्यामुळे या परिसराला कोणत्याही अडथळ्याशिवाय पाणीपुरवठा करणे शक्य होईल. तसेच, भविष्यात वाढीव पाणी उपलब्ध झाल्यास तेही या यंत्रणेमार्फत पुरवणे शक्य होईल, असे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. यावेळी, ठामपाचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, स्टेमचे व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत आदी उपस्थित होते.
क्षमता वृध्दी आणि वीज बचत
नवीन पंप हाऊसमुळे पाणी उचलण्याची क्षमता तर वाढेलच. शिवाय नवीन जलवाहिनी अंथरल्यामुळे पाण्याची गळती तसेच घट कमी होईल. तसेच, सध्या नऊ पंप चालवून पाणी उचलावे लागते. नवीन व्यवस्थेत सहा पंप चालवावे लागतील. त्यामुळे विजेची मोठ्या प्रमाणात बचत होईल, असा विश्वास व्यवस्थापकीय संचालक संकेत घरत यांनी व्यक्त केला.