संविधानिक संस्थांवरील बिनबुडाचे आरोप लोकशाहीसाठी घातक
आमदार राहुल नार्वेकर; त्यांचा सन्मान राखण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर
09-Dec-2024
Total Views | 43
मुंबई : "विरोधी पक्षातील नेत्यांनी संवैधानिक संस्थांवर बिनबुडाचे आरोप करणे, हे संसदीय लोकशाहीसाठी घातक आहे. त्यामुळे माझी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींना विनंती आहे, संवैधानिक संस्थांवर असे आरोप करून त्यांचा सन्मान कमी करू नका", असे प्रतिपादन आमदार अॅड. राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी रविवार, दि. ८ डिसेंबर रोजी केले.
विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. नार्वेकर म्हणाले, "विधासभेत विरोधी पक्षनेता कोण असेल? किंवा विरोध पक्ष नेता कोणाला बनवावे, हा संपूर्ण अधिकार विधानसभा अध्यक्षांचा असतो. प्राप्त परिस्थिती, भूतकाळातील अशाप्रकारच्या घटना आणि संविधानातील तरतुदींच्या आधारे विधानसभा अध्यक्ष सभागृहासंबंधित सर्व निर्णय घेतात. हे संवैधानिक पद आहेच; पण १३ कोटी जनतेला न्याय देण्याची ताकद त्यात आहे. कारण त्यांनी निवडून दिलेले २८८ आमदार हे जनतेच्या आशा आकांक्षा मांडण्यासाठी सभागृहात येतात. जर या सदस्यांना न्याय दिला नाही, तर महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेवर अन्याय होईल. म्हणून संसदीय लोकशाही जपण्यासाठी हे पद फारच महत्त्वाचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.