हंगाम नसताना कुडाळमध्ये हवेवर तरंगणाऱ्या 'मलबार ग्लायडिंग फ्राॅग'चे दुर्मीळ दर्शन; रुग्णालयात सापडला बेडूक

    09-Dec-2024
Total Views |
malabar gliding frog


मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अधिवासाच्या दृष्टीने काही भागांपुरता मर्यादित असणारा 'मलबार ग्लायडिंग फ्राॅग' या बेडकाचे दुर्मीळ दर्शन कुडाळ तालुक्यातील 'एसएसपीएम मेडिकल काॅलेज अॅण्ड लाईफटाईम हाॅस्पिटल'मध्ये घडले आहे (malabar gliding frog). हा बेडूक कुडाळ तालुक्यातील तुरळक ठिकाणी पावसाळी हंगामात दिसतो (malabar gliding frog). मात्र, डिसेंबर महिन्यात त्याचे दर्शन घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (malabar gliding frog)
 
 
'मलबार ग्लायडिंग फ्राॅग' हा पश्चिम घाटात प्रदेशनिष्ठ असणारा बेडूक आहे. हवेवर तरंगत जाण्यासाठी हा बेडूक प्रसिद्ध आहे. मात्र, हा बेडूक दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यामध्येच प्रामुख्याने दिसतो. कुडाळ तालुक्यामधून धामापूर परिसरातून त्याच्या तुरळक नोंदी आहेत. अशा परिस्थितीत १ डिसेंबर रोजी 'एसएसपीएम मेडिकल काॅलेज अॅण्ड लाईफटाईम हाॅस्पिटल'मध्ये 'मायक्रोबायोलॉजी लॅब टेक्निशियन' पदावर काम करणाऱ्या जागृती सावंत यांना 'मलबार ग्लायडिंग फ्राॅग'चे दर्शन रुग्णालयाच्या आवारात घडले. त्या स्वत: वन्यजीवप्रेमी असल्याने त्यांना हा बेडूक वेगळा वाटला. म्हणून त्यांनी बेडकाचे छायाचित्र टिपून 'आय-नॅचरलिस्ट' या व्यासपीठावर त्याची नोंद केली. त्यामाध्यमातून या बेडकाची त्यांना ओळख पटली.
 
 

'मलबार ग्लायडिंग फ्राॅग' हे पावसाळी हंगामात प्रामुख्याने दिसतात. वर्षातील इतर नऊ महिने शीतनिद्रेसाठी हे बेडूक झाडांच्या उंच फांद्यांवर जातात, ज्याला 'हायबरनेशन' म्हणतात. अशा परिस्थितीत डिसेंबर महिन्यात या बेडकाचे दर्शन कसे झाले, याविषयी सावंत यांनी दै. मुंबई तरुण भारतला सांगितले की, "१ डिसेंबर रोजी कुडाळ परिसरात तुरळक स्वरुपात पाऊस झाल्याने या बेडकाची शीतनिद्रा भंग पावल्याची शक्यता आहे. यापूर्वा या परिसरात हा बेडूक कधीच दिसलेला नाही. त्यामुळे या परिसरातून त्याची नोंद वैशिष्ट्यपूर्ण आहे."

प्रजोत्पादनाची प्रक्रिया
'मलबार ग्लायडिंग फ्राॅग' हा वृक्षवासी असल्याने त्याची प्रजननाची क्रिया झाडावरच होते. समागमावेळी बेडकाची जोडी एखादे डबके किंवा वाहणाऱ्या ओढ्यावर असणाऱ्या झाडाच्या फांदीवर आसरा घेते. जेणेकरुन जन्मास येणारे बेडूकमासे (टॅडपाॅल्स) खाली पाण्याच्या स्त्रोतात पडतील. जोडीने समागमाची प्रक्रिया सुरू केल्यावर मादी अंड्यांबरोबर एक चिकट स्त्राव सोडते आणि मागच्या पायाने तो चोळायला सुरुवात करते. अशावेळी नर आपले शुक्राणू अंड्यावर सोडतो आणि दोघे मिळून पायाच्या हालचालीने फेस तयार करतात. याला 'फोम नेस्ट' म्हणतात. या फेसाळलेल्या घरट्यात साधारण ८९ ते २०६ संख्येने अंडी असतात. मादी आपले हे घरटे पानांच्या मदतीने झाकून घेते. त्यानंतर नराने सोडलेल्या शुक्राणूमुळे अंडी फलित होण्यास सुरुवात होते. काही दिवसांनी या घरट्यामध्ये बेडूकमाशांची वाढ झालेली दिसते. हे बेडूकमासे घरट्यामधून खाली पाण्यात उड्या मारतात. पाण्यात हळूहळू त्यांची वाढ होते. त्यांची शेपूट नाहीशी होऊन त्यांना आकार येण्यास सुरुवात होते. त्यांना 'फ्राॅगलेट' म्हणतात. हे 'फ्राॅगलेट' डबक्याजवळ असणाऱ्या झाडांच्या पानांवर निपचिप पहुडलेले दिसतात.