महाराष्ट्र- कर्नाटक सीमावाद चिघळणार? कर्नाटकात इंडी आघाडी सरकारकडून मराठी भाषिकांची गळचेपी!
09-Dec-2024
Total Views | 23
बेळगाव : (Maharashtra-Karnataka Border Dispute) महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा डोकं वर काढताना दिसत आहे. सध्या बेळगावात सुरु असलेल्या घडामोडींमुळे सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्याचे आयोजन केलेले असताना कर्नाटक सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारत संबंधित परिसरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच महाराष्ट्रातील नेत्यांनाही राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मराठी भाषिकांची ही गळचेपी असल्याचा आरोप मराठी एकीकरण समितीकडून करण्यात आला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समिती दरवर्षी कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी या महामेळाव्याचे आयोजन करत असते. यंदाही बेळगावच्या वॅक्सिन डेपो मैदानावर या मेळाव्याचे महाअधिवेशन पार पडणार होते. मात्र, कर्नाटकमधील इंडी आघाडीच्या सरकारने या मेळाव्याला परवानगी नाकारली आहे. कर्नाटक सरकार संविधानानुसार चालत नसून गेल्या चार वर्षात सरकारकडून दडपशाही वाढल्याचा आरोप समितीने केला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित परिसरात कर्नाटक सरकारकडून अधिवेशनाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत संचारबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच या महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वॅक्सिन डेपो मैदानात तैनात करण्यात आला आहे. मराठी भाषिक एकत्र जमू नये याची खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे. तर दुसरीकडे मराठी भाषिक जनता देखील आपल्या भूमिकेवर ठाम आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महामेळावासाठी आग्रही आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.