नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसचा घेराव सुरू केला आहे. सपा, डावे पक्ष आणि राष्ट्रवादीनंतर आता राजदने इंडी ( INDI ) आघाडीच्या नेतृत्वासाठी बैठक घेऊन एकमताने नेता निवडण्याची मागणी केली आहे.
हरियाणापाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीमध्ये आता काँग्रेसविरोधातच आघाडी उघडण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी आघाडीचे नेतृत्व करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर आता आघाडीतल अन्य सहकारी पक्षदेखील काँग्रेसवर दबावाचे राजकारण करत आहेत.
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष तेजस्वी यादव म्हणाले की, जर एखाद्या वरिष्ठ नेत्याने या आघाडीचे नेतृत्व केले तर पक्षाला हरकत नाही. ममतांच्या इच्छेचा संदर्भ देत ते म्हणाले की आपल्या पक्षाचा त्यावर कोणताही आक्षेप नाही. आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या सर्व पक्षांनी एकमताने नेता निवडला पाहिजे. त्यासाठी या गटातील सर्व पक्षांची बैठक बोलावून सर्वानुमते निर्णय घेण्यात यावा, असे त्यांनी म्हटले आहे.
विशेष म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्याचा निर्णय सपाने घेतला आहे. सपाच्या या निर्णयास ममता बॅनर्जी यांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता आगामी काळात इंडी आघाडीचे घटकपक्ष आपापल्या राज्यांमध्ये काँग्रेससोबतची आघाडी तोडण्याचा नवा पॅटर्न निर्माण होण्याची सर्वाधिक शक्यता आहे. आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्येही आपने काँग्रेससोबतची आघाडी तोडली आहे. त्यानंतर आता बिहारमध्ये राजद तर उत्तर प्रदेशात सपाही विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला बाजुला करण्याची शक्यता नाकारता येणार नाही