सीरियातील हुकूमशाही संपुष्टात

राष्ट्रपती असद बेपत्ता; राजधानी दमास्कस बंडखोरांच्या ताब्यात

    09-Dec-2024
Total Views | 38
Syria

दमास्कस : सीरियात ( Syria ) बंडखोरांनी सत्तापालट केला आहे. अध्यक्ष बशर अल-असद कुटुंबाची ५० वर्षांची हुकुमशाही राजवट आता संपुष्टात आल्याची घोषणा खुद्द सीरियाच्या लष्करप्रमुखांनी केली आहे. बंडखोर आता राजधानी दमास्कसपर्यंत पोहोचले असून राष्ट्राध्यक्ष असद यांनीही दमास्कसमधून पळ काढला आहे.

बंडखोरांच्या हल्ल्यानंतर दमास्कस आता असदपासून मुक्त झाले आहे. बंडखोरांनी ताब्यात घेतल्यावर हजारो लोक दमास्कसच्या मुख्य चौकात जमले. यावेळी, अर्धशतकानंतर स्वातंत्र्याचा जयघोष करण्यात येत आहे.

राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद गायब?

सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांच्याबाबत अनेक अफवा पसरल्या आहेत. दमास्कसमधून पळून जाण्याच्या प्रयत्नात ते ज्या विमानात प्रवास करत होते, ते विमान क्रॅश झाले किंवा बंडखोरांनी गोळ्या झाडल्याचा संशय आहे. सीरियन एअर फ्लाईटने दमास्कस विमानतळावरून उड्डाण केले. हे विमान सुरुवातीला सीरियाच्या किनारी भागाकडे जात होते. मात्र, उड्डाण सुरू असताना विमानाने अचानक आपली दिशा बदलली आणि काही मिनिटे विरुद्ध दिशेने उड्डाण केल्यानंतर ते रडारवरून गायब झाले. विमानाचे शेवटचे ठिकाण बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या होम्स शहराजवळ होते.

अमेरिकेने सीरियाच्या युद्धात अडकू नये : डोनाल्ड ट्रम्प

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी, “सीरियातील परिस्थितीमध्ये अमेरिकेने अडकू नये,” असे सांगितले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत, एका अभूतपूर्व हालचालीत सीरियातील विरोधी सैनिकांनी अत्यंत समन्वित हल्ल्यात अनेक शहरे पूर्णपणे काबीज केली आहेत. ते आता दमास्कसच्या सीमेवर आहेत, असदला पराभूत करत आहेत. त्यासोबतच “आम्ही एक मोठा निर्णय घेण्याची तयारी करत आहोत,” असेही त्यांनी म्हटले आहे. “सीरिया एक समस्याग्रस्त देश आहे. पण, आमचा मित्र नाही. अमेरिकेला याच्याशी काही देणे-घेणे नसले पाहिजे. ही आमची लढाई नाही. यात सहभागी होऊ नये,” असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.

यापूर्वीदेखील बंडखोरांकडून सत्तापालट

सीरियात अशी बंडखोरी आणि सत्तापालट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. १९५०-६०च्या दशकात जेव्हा सीरियात सत्तापालट झाले, तेव्हा लष्कराने आधी रेडिओ-टीव्ही इमारतीचा ताबा घेतला आणि नंतर नवीन सरकारची घोषणा केली. आता पुन्हा एकदा हयात तहरीर अल-शाम (एचटीएस ग्रुप)ने त्याच बंडाची पुनरावृत्ती केली आहे.

बाथ पार्टीच्या राजवटीचा अंत

५० वर्षांपूर्वी बशर अल-असद यांचे वडील हाफेज अल-असाद यांनी मोठ्या रक्तपाताने देशाची सत्ता काबीज केली. बंडखोरांनी एका निवेदनात म्हटले आहे की, “बॅथिस्ट राजवटीत (असाद पक्ष) ५० वर्षांच्या दडपशाहीनंतर आणि १३ वर्षांच्या गुन्हेगारी, यातना आणि विस्थापन आणि सर्व प्रकारच्या कब्जा करणार्‍या सैन्याला तोंड देत असलेल्या दीर्घ संघर्षानंतर, आम्ही आज, दि. ८ डिसेंबर २०२४, आम्ही त्या गडद युगाचा अंत आणि सीरियासाठी नवीन युगाची सुरुवात घोषित करतो.”

रशिया आणि इराणचे नियंत्रण झाले कमी

इराण आणि रशियाच्या मदतीने बशर अल-असाद हे सीरियात सत्तेवर आहेत. त्यांचे सरकार हे इराण आणि रशियाच्या पाठबळावरच टिकून होते. अलीकडील घडामोडींमुळे सीरियातील परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. रशियाचा मागील अडीच वर्षांहून अधिक काळ युक्रेनबरोबर संघर्ष सुरू आहे. तर, इराण आणि हिजबुल्ला यांच्या इस्रायलसोबत संघर्ष सुरूच आहे. अशा स्थितीत रशिया आणि इराणचे सीरियावरील नियंत्रण कमी झाले असून, सीरियातील बंडखोर गटांनी याचा फायदा घेत असाद यांना मोठा धक्का दिला आहे.

बंडखोरांकडून राष्ट्रपतींच्या राजवाड्यात लूट

आठवडाभर चाललेल्या संघर्षानंतर सीरियन बंडखोर सैन्याने अखेर रविवार, दि ८ डिसेंबर रोजी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवला. मात्र, त्यांना सरकारी सैनिकांच्या कोणत्याही प्रतिकाराला सामोरे जावे लागले नाही. राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद देशातून पळून गेले आहेत, त्यानंतर सीरियाच्या लोकांनी दमास्कसमधील राष्ट्रपती राजवाड्यात प्रवेश केला आणि असद राजवाड्यातील वस्तू लुटल्या. लुटारुंमध्ये महिलांची संख्याही मोठी आहे. तसेच, सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली आहे. दरम्यान, सीरियात राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांचे पुतळे तोडले जात असून बंडखोर गट आणि नागरिक हवेत गोळीबार करून आनंद साजरा करत आहेत.

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121