महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात ‘कारगिल- द टेल्स ऑफ वेल्लर’
08-Dec-2024
Total Views | 28
ठाणे : कारगिल युद्धाला ( Kargil War ) यंदा २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे या युद्धात हुतात्मा झालेल्या वीरांना श्रद्धांजली म्हणून ‘कारगिल-द टेल्स ऑफ वेल्लर’ या दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. ’शारदा एज्युकेशन सोसायटी’च्या ‘आनंद विश्व गुरुकूल’ आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरे करण्यात आले.
कारगिल युद्धाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या युद्धात हुतात्मा झालेल्या हुतात्म्यांच्या बलिदानाच्या आठवणीने जखमा ओल्या होतात. या हुतात्म्यांचे स्मरण म्हणून हा अनोखा कार्यक्रम डॉ. घाणेकर नाट्यगृहात नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून वीरमाता अनुराधा गोरे, लेफ्टनंट कर्नल गीता सिद्धांती राव (रिटायर्ड, इंडियन आर्मी), भिवंडी महापालिकेचे आयुक्त अजय वैद्य, ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य करून वीर जवानांना श्रद्धांजली अर्पण करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.
शिक्षकवृंदाने तिरंग्याच्या वेशात सामूहिक देशभक्तीपर गीत गायले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, जवानांच्या सुख-दुःखातील प्रसंगाला अनुसरून स्थलसेना, नौसेना, वायुसेनेच्या वेशात गाण्यांवर नृत्य सादर केले. नृत्य सादर करीत असताना दृक-श्राव्याच्या माध्यमातून कारगिल युद्धातील विविध प्रसंगही पडद्यावर दाखविण्यात आले. ते सर्व प्रसंग पाहून उपस्थित प्रेक्षकवर्ग भारावून गेला. यावेळी संस्थेच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले.
संस्थेचे सचिव प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी संस्थेच्या वाटचालीची माहिती दिली. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सीमा हर्डीकर यांनी वर्षभराचा आढावा सादर केला. विद्यालयाच्या स्मरणिकेचे अनावरणही करण्यात आले.
संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. खजिनदार अक्षर पारसनीस यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाला उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, संस्थेचे सर्व विश्वस्त, प्राचार्य डॉ. सीमा हर्डीकर, ठाणे शहरातील अनेक नामांकित व्यक्ती, संस्थेच्या विविध विभागांचे प्राचार्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.