मुंबई : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा २'ची सध्या देशभरात चांगलीच चर्चा सुरु आहे. एकीकडे प्रेक्षकांच्या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे. मात्र, दुसरीकडे चित्रपटाच्या शोदरम्यान काही दुर्घटना देखील घडल्या आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. यावरुन अभिनेता अल्लू अर्जूनवर गुन्हा दाखल झाला असून या सर्व प्रकरणावर अल्लू अर्जुनने मौन सोडलं आहे.
अल्लू अर्जुन याने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, "या कठीण काळात मी त्या महिलेच्या कुटुंबासोबत उभा राहीन. त्या कुटुंबासाठी जे शक्य होईल ते मी करेन. मी त्यांना २५ लाखांची नुकसानभरपाई देण्याचं जाहीर करतो. याशिवाय उपचाराच्या सर्व खर्चाची मी मदत करेन." अशाप्रकारे अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर भावुक प्रतिक्रिया देत मृत महिलेच्या कुटुंबाला धीर दिला असून त्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे.