अणुयुद्धाची तयारी करणे नंतर होऊ शकते. मात्र, संशोधन व आधुनिकीकरण चालू ठेवावे. जगात सध्या विविध ठिकाणी ६० हून अधिक युद्धे सुरू आहेत. संरक्षणदृष्ट्या अत्यंत प्रबळ असलेल्या राष्ट्रावर दुसरी राष्ट्रे आक्रमण करण्यास धजावत नाहीत. आपल्याला शांतता हवी आहे. पण, आपणास सर्व प्रकारच्या लढाईकरिता सदैव तयार राहणे जरुरी आहे.
अणुयुद्ध लढण्याकरिता ‘आण्विक त्रिसूत्री’ (Nuclear Triad) ही एक लष्करी संकल्पना आहे, ज्यामध्ये तीन भाग असतात. आंतरखंडीय क्षेपणास्त्रे (SLBMs)म्हणजे जमिनीवर आधारित आण्विक क्षेपणास्त्रे, आकाशातून हल्ला करणारे ‘स्ट्रॅटेजिक बॉम्बर्स’ म्हणजे अणुबॉम्ब आणि क्षेपणास्त्र असलेले विमान आणि पाणबुडी-प्रक्षेपित बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Solid fuel), आण्विक-क्षेपणास्त्र-सशस्त्र पाणबुड्या. ही क्षमता आतापर्यंत भारताकडे नव्हती, जी आता निर्माण होत आहे.
भारत पाणबुडीतून अण्वस्त्रे डागण्यास सज्ज
भारतीय नौदलात अलीकडेच समाविष्ट झालेल्या ‘आयएनएस अरिघात’ या पाणबुडीतून अण्वस्त्रक्षम ३ हजार, ५०० किमी पल्ल्याच्या ‘के-4’ बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. या चाचणीने चीनच्या मुख्य भूभागातील बराचसा भाग प्रहार टप्प्यात येईल. यातून भारताची ‘आण्विक त्रिसूत्री’ अधिक बळकट झाली आहे. आण्विक युद्धात प्रतिहल्ला चढविण्यासाठी (Second strike capability) अजून एक प्रभावी पर्याय उपलब्ध झाला आहे.
पाण्याखालील क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणालीचे कठीण काम
भारताची अणुशक्तीवर चालणारी ‘आयएनएस अरिघात’ ही दुसरी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (एसएसबीएन) आहे. तीन महिन्यांपूर्वीच ती नौदलात सामील झाली. या पाणबुडीतून दि. २७ नोव्हेंबर रोजी भारतीय नौदलाने अण्वस्त्रक्षम ३ हजार, ५०० किमी मारक क्षमतेचे ‘के-४’ क्षेपणास्त्र डागण्याची चाचणी केली. पाण्याखालील क्षेपणास्त्र प्रक्षेपक प्रणाली हे अत्यंत कठीण काम आहे. पाणबुडीतून डागलेल्या क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण क्षमता सिद्ध करण्यासाठीची चाचणी हे महत्त्वाचे पाऊल आहे. यात शस्त्रप्रणालीचे परिचालन व तांत्रिक मापदंड सिद्ध केले जातात.
‘के-४’ क्षेपणास्त्र काय आहे?
नौदलाच्या ‘अरिहंत’ वर्गातील पाणबुड्यांसाठी ‘संरक्षण संशोधन व विकास संस्थे’ने (डीआरडीओ) विकसित केलेले ‘के-4’ हे 3 हजार, ५०० किमी पल्ल्याचे क्षेपणास्त्र जे स्वदेशी क्षेपणास्त्रांच्या ‘के’ मालिकेतले आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या सन्मानार्थ त्यांच्या ‘के’ आद्याक्षरावरून त्याचे नामकरण करण्यात आले आहे. विकसित क्षेपणास्त्राची 2014 आणि २०१६ मध्ये यशस्वी चाचणी घेण्यात आली होती व आण्विक शस्त्रे वाहून नेण्याची क्षमता प्रमाणित करण्यात आली. घन रॉकेट प्रणोदकावर (Solid fuel) ते आधारित आहे. या क्षेपणास्त्रात तीन घटकांना परस्परांना जोडणारी प्रणाली आहे, ज्यामुळे शत्रूला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीतून ‘के-४’ क्षेपणास्त्राचा माग काढणे आणि त्यास नष्ट करणे कठीण होईल.
देशाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचे
स्वदेशी बनावटीची पाणबुडी, स्वदेशी क्षेपणास्त्राने अण्वस्त्रक्षम होईल. अनेक तांत्रिक अडथळे पार करून ‘के’ मालिकेतील या क्षेपणास्त्रांचा विकास करण्यात आला. पाणबुडीतून अण्वस्त्र डागण्याची क्षमता भारताच्या सामर्थ्यात सामरिक जोड देणारी ठरेल. या वर्गातील तिसरी ‘आयएनएस अरिदमन’ ही पाणबुडी पुढील वर्षात कार्यान्वित होईल. त्यानंतर अणुशक्तीवरील दोन पाणबुड्या ‘के-5’ या पाच हजार किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी सज्ज असतील.
आण्विक प्रतिबंधासाठी (Nuclear deterrence) एक पाणबुडी नेहमी गस्तीवर असणे आवश्यक असते. देशाला किमान चार ‘एसएसबीएन’ची गरज आहे. एखादी पाणबुडी बंदरात असताना, दुसरी गस्तीवर राहू शकते. आण्विक पाणबुडी अधिक काळ त्या पाण्याखाली राहू शकतात. या पाणबुड्या देशाची ‘आण्विक त्रिसूत्री’ बळकट करतील. आण्विक प्रतिबंधन क्षमता वाढवून देशाच्या सुरक्षेत निर्णायक भूमिका निभावतील.
पहिल्या ‘आयएनएस अरिहंत’ पाणबुडीवर ‘के-१५’ या ७५० किमीवर मारा करणार्या क्षेपणास्त्रांची चाचणी झाली होती. ३ हजार, ५०० किमीच्या ‘के-४’ ने सुसज्ज ‘आयएनएस अरिघात’च्या चाचणीने चीनच्या मुख्य भूभागातील बराच भाग प्रहार टप्प्यात येईल. ‘आयएनएस अरिदमन’च्या समावेशानंतर भारताची प्रतिहल्ला चढविण्याची आण्विक क्षमता पुढील वर्षात तैनात होईल. या दोन्ही पाणबुड्यांची उपस्थिती संभाव्य धोक्यांचा प्रतिबंध करण्याची आणि राष्ट्रीय हिताचे संरक्षण करण्याची भारताची क्षमता आणखी वाढवणार आहे.
भारत आणि चीन अणुयुद्ध
भविष्यकाळातील युद्ध, आकाशात, जमिनीवर, समुद्रात लढले जाऊ शकते. त्या दिशेने भारताने प्रथम ‘पृथ्वी’ व ‘अग्नि’ प्रक्षेपणास्त्राची चाचणी घेतली होती. भारताचे, चीन किंवा पाकिस्तानशी अणुयुद्ध होईल का, याचा अंदाज कुठल्याही तज्ज्ञांना लावणे सोपे नाही. १९४५ नंतर अणुबॉम्बचा वापर कोठेच झाला नाही. तरीही पाकिस्तान व चीनकडून वेळोवळी मिळणार्या धमक्यांपासून रक्षण करण्याकरिता अणुयुद्धाची तयारी करणे गरजेचे आहे.
अणुयुद्ध करण्याकरिता अणुबॉम्ब व तो टाकण्याकरिता वाहन (Carrier) हे दोन्ही गरजेचे आहेत. आकाशातून अणुबॉम्ब, जमिनीवरून क्षेपणास्त्र मारण्याची क्षमता उच्च दर्जाची हवी. आकाशातून अणुबॉम्ब डागण्याकरिता आपल्या हवाईदलात ‘सुखोई’, ‘मिराज’ अशी विमाने सुसज्ज आहेत. ही सध्याच्या गरजेसाठी पुरेशी आहेत. जमिनीवरून क्षेपणास्त्र मारण्याची क्षमता ‘पृथ्वी’ व ‘अग्नि’ या दोन्ही मिसाईल्समध्ये आहे.
अणुबॉम्ब जमिनीवरून डागण्यासाठी वाहने ‘पृथ्वी १’, ‘पृथ्वी २’,(३५० किमी), ‘अग्नि १’ आणि ‘अग्नि २’ (दोन हजार किमी), ‘अग्नि ३’ ( तीन हजार किमी) शस्त्र म्हणून भारतीय सैन्यात सामील झालेले आहेत. ‘अग्नि ४’ (चार हजार किमी)ची मागच्या वर्षी चाचणी करण्यात आली होती. जमिनीवरून फायर करण्याकरिता ‘अग्नी ५’च्या रुपाने (पाच हजार किमी) शस्त्र म्हणून सैन्यात येण्याकरिता अजूनसुद्धा एक ते दोन वर्षे लागू शकतात.
भारताची अणुबॉम्ब क्षेपणास्त्र क्षमता
भारताकडे ९० ते ११० अणुबॉम्ब असावेत, जे सध्याच्या गरजेला पुरेसे आहेत. थोडक्यात, आज आपल्याकडे जी क्षेपणास्त्रे आहेत, त्यांच्या मदतीने आपण पाकिस्तानशी, चीनशी युद्ध करण्याकरिता पूर्णपणे सक्षम आहोत.
प्रक्षेपणास्त्रे विकसित करायला चीनची पाकिस्तानला मदत
‘अग्नि १’ विरुद्ध ‘अब्दाली’, ‘ब्राह्मोस’ विरुद्ध ‘बाबर’, ‘पृथ्वी’ विरुद्ध ‘घोरी’, ‘नाग’ विरुद्ध ‘शाहीन’, ‘अग्नि ५’ विरुद्ध चीनचे ‘सीएसएस १’, ‘२’, ‘३’, ‘४’! भारत, पाकिस्तान आणि चीन यांच्या शस्त्रांची ही नावे. भारताच्या ‘अग्नि ५’ला उत्तर म्हणून पाकिस्तानने ‘हफ्त ४’चे परीक्षण केले. या क्षेपणास्त्र चाचणीसाठी चीन व उत्तर कोरियाने पाकिस्तानला मदत केली. लष्करी आणि सुरक्षा क्षेत्रात पाकिस्तान भारतासोबत चीनच्या मदतीने समानता विकसित करण्याचा प्रयत्न करीत आहे. १९९८च्या भारताच्या आण्विक चाचण्यांनंतर पाकिस्ताननेही आण्विक चाचण्या घेतल्या. चीन पाकिस्तानच्या दोन आण्विक भट्ट्यांना मदत करत आहे.
शांतता हवी, पण लढाईकरिता सदैव तयार राहणे जरुरी
‘के-४’ने सुसज्ज ‘आयएनएस अरिघात’च्या चाचणीने भारताची आण्विक प्रतिकारशक्ती पूर्णपणे कार्यान्वित होत असली, तरी आण्विक पाणबुडीला मुख्यालयाशी तत्काळ संवाद साधता येईल, यासाठी प्रभावी प्रणाली उभारण्यासाठी काम करावे लागणार आहे.
अणुयुद्ध, पारंपरिक युद्ध आणि अपारंपरिक युद्ध तयारी करणे खर्चाचे असते, म्हणून गरजेप्रमाणे प्राधान्य दिले जावे. आपण माओवाद, काश्मीरमधला दहशतवाद आणि ईशान्य भारतातील बंडखोरी आणि बांगलादेशी घुसखोरी थांबवण्यास प्राधान्य द्यायला हवे. त्यानंतर सैन्याच्या शस्त्राचे आधुनिकीकरण, पूर्ण करणे महत्त्वाचे आहे.
हेमंत महाजन