मुंबई : उबाठा गटाचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातूनच उद्धव ठाकरेंची इज्जत काढण्याचे काम संजय राऊतांनी सुरु केले आहे, असा घणाघात भाजप नेते नितेश राणेंनी केला आहे. शनिवार, ७ डिसेंबर रोजी विधानभवनात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
नितेश राणे म्हणाले की, "उद्धव ठाकरेंची इज्जत काढण्याचे काम राजरोसपणे सुरु झाले आहे. आतापर्यंत सामना हे उबाठा सेनेचे मुखपत्र होते. पण उद्धव ठाकरेंचीच लायकी काढण्याचे काम सामना वृत्तपत्रातून होत आहे. निर्भया, दामिनी पथकांचे हेल्पलाईन नंबर बंद झाल्याची एक बातमी आज छापून आली आहे. निर्भया, दामिनी पथकासाठी हेल्पलाईन नंबर काढण्याचा जीआर २०२२ चा आहे. २०२२ ला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी सुरु केलेल्या योजनेला संबंधित अधिकारी फाट्यावर मारत असतील आणि त्यांचीच इज्जत सामनातून निघत असेल तर संजय राऊतांचा पगार कितीवेळ सुरु ठेवायचा हे उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी ठरवावे."
"या हेल्पलाईन नंबरमध्ये काही त्रुटी असल्यास आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या निश्चितपणे दूर करतील. सगळे हेल्पलाईन नंबर सुरु ठेवून माताभगिनींना कशी मदत मिळेल यावर आम्ही लक्ष घालू. पण सामनामध्येच अशा बातम्या छापून स्वत:च्याच मालकाची इज्जत काढणे संजय राऊतांनी बंद करावे," असा सल्ला त्यांनी दिला आहे.
बांग्लादेशातील हिंदुंचा आवाज बनण्यासाठी रस्त्यावर उतरणार!
"बांग्लादेशमध्ये राहणाऱ्या आमच्या हिंदु बंधु-भगिनींवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही राज्यभरात १० डिसेंबर रोजी रस्त्यावर उतरणार आहोत. यादिवशी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदू आपली ताकद दाखवणार असून बांग्लादेशातील हिंदू एकटे नाहीत, असा संदेश देणार आहोत," असेही त्यांनी सांगितले.
हिंदूत्व आणि विकास या दोन मुद्यांवर निवडणूक लढली!
"कणकवली-देवगड विधानसभेच्या जनतेने माझी हॅट्रिक केली आहे. माझ्या मतदारसंघातील हिंदू समाजाने मला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे. हिंदूत्व आणि विकास या दोन प्रमुख मुद्यांवर मी निवडणूक लढवली. मला मिळालेल्या ५८ हजार मतांमध्ये कुठलेही मुस्लिम मत नाही, हे मी हक्काने सांगू शकतो. हिंदुत्ववादी विचारांच्या मतदारसंघाचा आमदार म्हणून मी निवडून आलो असून सत्ताधारी आमदार म्हणून पुढचे तीन वर्षे मी काम करणार आहे," असेही नितेश राणेंनी यावेळी सांगितले.