गेल्या काही महिन्यांत‘डिजिटल अरेस्ट’ हा सायबर गुन्हेगारीचा नवा प्रकार उघडकीस आला आहे. तेव्हा, त्याचे नेमके स्वरुप आणि खबरदारी याचा आढावा घेणारा हा लेख...
तंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे जगातील अब्जावधी लोकांच्या जीवनामध्ये फार वेगाने बदल घडताना आपण पाहत आणि अनुभवत आहोत. या सर्व प्रकारच्या तंत्रज्ञानांमध्ये माहिती आणि संवादाचे तंत्रज्ञान (इन्फर्मेशन अॅण्ड कम्युनिकेशन टेक्नोलॉजी - ICT) सर्वांत आघाडीवर आहे. यामुळे पूर्वी असलेले अंतराचे बंधन आता नाहीसे झाले आहे आणि आज सर्वांना सर्व प्रकारची माहिती मिळू शकते. तसेच परस्परांशी गतिशील संवादही होऊ शकतो. मोबाईल फोन आणि इंटरनेट ही तसे म्हटले तर फार प्रभावी साधने आहेत. त्यांच्यातील छुपे सामर्थ्य ओळखून त्यांचा डोळसपणे उपयोग केला, तर बरीच कामे सहजपणे होतात, खर्च आणि वेळ वाचतो आणि वापरकर्त्याच्या ज्ञानातही भर पडते. या तंत्राचा वापर करून डिजिटल व्यवसाय करता येतो. पण, त्यासाठी सायबर सुरक्षेचा कळीचा मुद्दा लक्षात घेणे जरुरीचे आहे. ‘सायबर’ हा शब्द वर्ल्डवाईड वेब आणि इंटरनेटच्या महाजालाच्या संदर्भात वापरला जातो, हे आता बहुतेकांना माहीत आहे. सायबर-सुविधा, सायबर-गुन्हे, सायबर वॉर यांसारखे शब्दप्रयोगही बर्यापैकी रुळले आहेत. परंतु, सर्वसामान्य नागरिकांचा थेट सायबर वॉरशी काय संबंध, अशी शंका काहींना येऊ शकेल आणि त्यात काही चुकीचे नाही. देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणार्या अतिरेकी संघटना, गुन्हेगार आणि याप्रकारचे उद्योग करणार्या टोळ्यांना संगणकीय प्रणालींचा चांगलाच फायदा होतो. वेळ वाचतो, मनुष्यबळ वाचते, एखादी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडताना उद्भवणारे संभाव्य धोके टळतात. कारण, बरीचशी कामे एका ठिकाणी बसूनच होऊ शकतात. पूर्वी सुरक्षा ही फक्त भौतिक गोष्टींची गणली जायची. आता सायबर सुरक्षा व सर्व संगणकीय भांडवलाची व माहितीची सुरक्षा ही एक अत्यावश्यक बाब झाली आहे. हे बहादर सायबर भामटे नवनवीन क्लुप्त्या वापरून आपले लक्ष्य साध्य करतात. त्यासाठी ते सतत नवनवीन क्लुप्त्या अमलात आणतात. एक प्रकारे ते कलाकाराच असतात. फक्त आपली बुद्धी, कला चुकीच्या मार्गाने वापरतात. यातीलच एक ‘डिजिटल अरेस्ट’ हा नवीन प्रकार काही महिन्यांपूर्वी उघडकीस आला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे डिजिटल स्वरुपात अटक. या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचे सांगून किंवा ‘ईडी’ किंवा ‘सीबीआय’चा अधिकारी असल्याचेे सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल करतो. तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉण्ड्रिंगच्या प्रकरणात ‘डिजिटल अरेस्ट’ करत असल्याची बतावणी करतो.
कधी म्हणतो की, तुम्ही परदेशात जे सामान पाठवले आहे, ते बेकायदेशीर आहे. मी असे काही पाठवले नाही, असे सांगितले, तर तुमचे आधार कार्ड आणि फोन नंबर त्यावर आहे, असे सांगण्यात येते. त्यानंतर बराच वेळ ती व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअॅप किंवा स्काईप कॉलवर राहायला सांगते. कारण, तुम्हाला अटक झाली आहे, असे तो सांगतो. आता या तथाकथित गुन्ह्यातून तुम्हाला जामीन हवा असेल, तर पैशाची मागणी केली जाते. समोरची व्यक्ती म्हणते की, पैसे पाठवा म्हणजे खटला भरणार नाही. व्हिडिओ कॉलवर पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेला असतो. इतकेच काय, तर अगदी पोलीस ठाण्यासारखे वातावरणसुद्धा असते! मग लोक घाबरून पैसे पाठवतात आणि तिथे घोटाळेबाजांचा उद्देश साध्य झालेला असतो. यात सायबर भामटे आपल्याला पोलीस, ‘सीबीआय’, ‘ईडी’, कस्टम किंवा इन्कम टॅक्स वा अमलीपदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी असल्याची बतावणी करीत पीडित व्यक्तीला कॉल करतात. नंतर त्याच्यावर किंवा त्याच्या कुटुंबीयांवर अनैतिक कामात सामील असल्याचा आरोप करतात. त्यानंतर फ्रॉड करणारे व्हिडिओ कॉल करण्याची मागणी करतात. साधा कॉल अथवा व्हिडिओ कॉल करून अटक करण्याची भीती दाखवतात. नंतर पीडित व्यक्तीला खोटी कागदपत्रे दाखवून किंवा खोटे ओळखपत्र दाखवून घाबरवले जाते. त्यांना अटकेची कारवाई टाळण्यासाठी दंड भरण्यासाठी दबाव टाकला जातो. गुन्हेगार तुम्हाला व्हिडिओ कॉल करतात आणि पोलीस स्थानकासारखे वातावरण दाखवतात. ते तुम्हाला अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगतात. हे करण्यासाठी फसवणूक करणारे आपल्या सावजांची वैयक्तिक माहिती गोळा करतात. मग ते पोलीस, ‘सीबीआय’, ‘आरबीआय’ आणि अमली पदार्थ अशा मोठ्या विभागांचे अधिकारी बनून व्हिडिओ कॉल करतात. त्यांच्या विडिओ कॉलमध्ये सरकारी मानक, कार्यालय अशांची हुबेहूब प्रतिकृती केली जाते. हे गुन्हेगार पूर्ण आत्मविश्वासाने बोलतात आणि कायदेशीर कारवाई करण्याची भीती दाखवतात, ज्यामुळे लोकांना विश्वास बसतो की, ते खरोखरच सरकारी अधिकारी आहेत. यानंतर ते त्यांच्या जाळ्यात अडकून फसवणुकीला बळी पडतात. या प्रकारच्या फसवणुकीला अनेकजण बळी पडले आहेत, अनेकांचे लाखो-करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.
मग ही ‘डिजिटल अरेस्ट’ खरी असते का?
जर तुम्हाला ‘डिजिटल अरेस्ट’ म्हणजे काय, ते कळले असेल, तर वास्तविक ‘डिजिटल अरेस्ट’ नावाची कोणतीही गोष्ट मुळी अस्तित्वात नाही. या धमक्या संपूर्णपणे तोतयागिरी असते. त्यांचा हेतू केवळ पीडित व्यक्तीकडून लवकरात लवकर ऑनलाईनमार्गे पैसे लुबाडण्याचा असतो. त्यामुळे पोलीस असल्याची बतावणी करून पीडित व्यक्तीला घाबरवले जाते आणि तणावाखाली आणले जाते. सर्वसामान्य माणसाला कायद्याचे फारसे ज्ञान नसते व बदनामीची भीती असते, कोर्ट-कचेर्या टाळण्याचा व मिटवा-मिटवीवर भर असतो. थोडेफार पैसे देऊन जर ब्याद टळत असेल, तर पुढचा मनस्ताप टळतो, याच मानसिकतेचा गैरफायदा घेतला जातो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, असे काही झाले, तर थोडे थांबा, विचार करा, आपल्याबरोबर काही चुकीचे होत नाहीये ना, हा विचार करा.
घोटाळेबाजांच्या प्रश्नांना उत्तरे देऊ नका. जर असे कॉल तुम्ही लगेच कट केले, तर पुढे काहीच होत नाही. जर तुम्हाला कोणी ब्लॅकमेल करत असेल, तर त्याची तक्रार करा, हा सगळ्यात उत्तम उपाय आहे. एकदा पैसे गेले की, पैसे परत आणणे पोलिसांना कठीण होते. कारण, अशा सायबर गुन्हेगारांचा माग काढणेही अतिशय अवघड. कारण, हे गुन्हेगार कदाचित दुसर्या राज्यात व देशातही असतात. त्यामुळे पोलिसांना कार्यक्षेत्राची समस्या येऊ शकते. या सायबर गुन्हेगारांकडे वेगळ्याच व्यक्तीच्या नावाचे सिमकार्ड असतात. कधी सेकंड हँड फोन किंवा चोरीचा फोन असतो. वेगळ्याच आयडीने तयार केलेले अकाऊंट असते. एकदा खंडणी मिळाली की, ते या सगळ्या गोष्टी नष्ट करतात. त्यांनी ज्या लोकांच्या नावाचं अॅड्रेस प्रुफ, फोटो वगैरे चोरलेला असतो, पोलीस त्यांच्याकडे जातात आणि खरे घोटाळेबाज तसेच मोकाट फिरत असतात.
‘डिजिटल अरेस्ट’पासून कसे वाचावे?
१. कोणालाही पैसे देऊ नका : कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारच्या कॉलवर पैसे देऊ नका.
२. पोलीस स्थानकात जा : जर तुम्हाला असे कोणतेही कॉल आले, तर तत्काळ तुमच्या नजीकच्या पोलीस स्थानकात जा.
३. बँक आणि मोबाईल कंपनीला कळवा : जर तुमच्या बँक खात्यातून पैसे काढले गेले असतील, तर तत्काळ बँकेला कळवा.
४. सायबर क्राईम सेलला तक्रार करा : तुम्ही सायबर क्राईम सेलमध्ये तक्रार दाखल करू शकता.
हे कायम लक्षात ठेवा...
१. पोलीस कधीही फोनवर पैसे मागणार नाहीत.
२. तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नका.
३. जर तुम्हाला कोणतीही शंका आली तर त्या व्यक्तीशी बोलणे थांबवा.
झटपट अर्थार्जन करण्यासाठी काही अनुभवी संगणक सायबर गुन्हेगारीचा मार्ग पत्करत आहेत. सायबर गुन्हेगार नवीन तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून गुन्हे करण्याच्या नवनवीन युक्त्या शोधतात. कुठलीही गोष्ट ही दोन बाजू घेऊनच येते. साधे सुरीचे उदाहरण घ्या, फळ कापण्यासाठी किंवा एखाद्याला इजा करण्यासाठी. संगणक, मोबाईल व इतर आधुनिक उपकरणांचेपण असेच आहे. आपले आयुष्य, व्यवहार, उद्योग, व्यापार अधिक वेगवान व सुलभ करण्यासाठी हे तंत्रज्ञान विकसित व लोकप्रिय झाले. पण, त्याचबरोबर दुसरी बाजूही लक्षात घेतली पाहिजे. असे गुन्हे टाळायचे असतील, तर जनजागृती हा एकमेव उपाय आहे. हल्ली आपल्या सर्वच आर्थिक व्यवहारांची माहिती ऑनलाईन उपलब्ध असते. बँकेच्या संगणकीय प्रणालीत घुसलेले चोर (हॅकर्स) ही माहिती सहज मिळवून तिचा स्वतःच गैरवापर करतात किंवा ही माहिती इतरांना विकून मोकळे होतात. आर्थिक गुन्हे व ते करायचे अनेक नवीन मार्ग तंत्रज्ञान वापरून सायबर गुन्हेगार शोधत आहेत. इंटरनेट तंत्रज्ञानाला भौगोलिक सीमा नसल्याने असे गुन्हे उघडकीला आणणे पोलिसांना अवघड कार्य बनते. यामुळेच सायबर गुन्हे टाळण्याचे प्रयत्न जास्त महत्त्वाचे ठरतात .
(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत.)
डॉ. दीपक शिकारपूरकर