भुरळ पाडणारे संवाद आणि ‘बिग बजेट’ चित्रपटांचे अलौकिक उदाहरण
एखादा चित्रपट किंवा त्या चित्रपटातील गाणे किंवा अलीकडच्या चित्रपटांच्या भाषेत बोलायचे झाल्यास बीजीएम अर्थात पार्श्वसंगीत आपण सतत गुणगुणत असतो. तसेच काहीसे सध्या झाले आहे ते ‘पुष्पा 2’ या चित्रपटाबाबत. सर्वत्रच ‘पुष्पाराज’ हे गाणे किंवा त्याची धून सोशल मीडियावरही सतत पाहून, ऐकून गुणगुणली जात आहे. पण खरेच एखाद्या चित्रपटाची आणि त्यातील प्रमुख पात्राची किती ‘क्रेझ’ असावी, हे दाक्षिणात्य चित्रपटांच्या मांडणीतून आणि कलाकारांकडून खरेच शिकण्यासारखे आहे असे म्हटल्यास खरेच अतिशयोक्ती वाटणार नाही. दि. 5 डिसेंबर रोजी बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘पुष्पा 2’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. 2021 साली आलेल्या ‘पुष्पा : द राईझ’ या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणजेच ‘पुष्पा 2 : द रुल’.
तर, ‘पुष्पा 2’ या चित्रपटाची सुरुवात जिथे ‘पुष्पा 1’चा शेवट झाला होता, तिथूनच करण्यात आली आहे. लाल चंदनाची तस्करी करून देशात आणि देशाच्या बाहेर घेऊन जाण्याचा धंदा करणारा पुष्पा आणि त्याचे ते गैर काम थांबवणारा पोलीस अधिकारी शेखावत, यांचे वैर चित्रपटाच्या दुसर्या भागातही सुरूच आहे. त्याशिवाय, श्रीवल्ली आणि पुष्पाच्या नात्याची नवी सुरुवात, पुष्पाचा कौटुंबिक भूतकाळ कसा बदलला आणि भविष्यात आणखी एका नव्या संकटाची दारे स्वतः पुष्पा कशी उघडतो, हे सारे काही ‘पुष्पा 2 : द रुल’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
पुष्पा म्हणजे एक गुंड, जो लाल चंदनाची तस्करी करून परदेशात नेऊन विकत असतो. एका गुंडाच्या हाताखाली कसे जग नाचते किंवा एक गुंड राजकीय वातावरण कसे आपल्या मर्जीने बदलू शकतो, याचा विचार करत त्याची मनाला भिडणारी मांडणी दिग्दर्शक सुकुमार यांनी केली असून, ती मांडणी चित्रपटातून पाहताना उत्सुकता वाढत राहते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, दाक्षिणात्य चित्रपटांना सीक्वेल्सचा अर्थ पूर्णपणे समजतो आणि चित्रपटात सादर केलेल्या प्रत्येक प्रसंगातून त्याची प्रचिती येत राहते. म्हणजे काय? तर चित्रपटात एक प्रसंग दाखवला आहे, जिथे पुष्पा खोल समुद्रात पडतो आणि त्याला पोहता येत नसल्यामुळे पाण्यातच तो बेशुद्ध होतो. हा प्रसंग पुष्पाच्या भूतकाळाशी जोडून लहानपणी कसे त्याला त्याच्या कुटुंबावरून हिणवले गेले, त्याचा परिणाम बालपणापासूनच पुष्पाच्या मनावर कसा झाला? आणि एखादी गोष्ट जर त्याला हवी असेल किंवा त्याला स्वतःला सिद्ध करायचे असेल, तर तो कोणत्या थराला जाऊ शकतो हे अनेक प्रसंगांतून दाखवत, पुष्पराजची अर्थात पुष्पाची मानसिकतादेखील दिग्दर्शकांनी अगदी योग्यरित्या सादर केली आहे. याशिवाय, जगासमोर कितीही मोठा गुंड असला, तरी घरात त्याच्या कुटुंबासमवेत, पत्नी आणि आईसमवेत त्याचे कसे नातेसंबंध आहेत, याची मांडणीदेखील अगदी मनाला भावणारी आहे. त्याशिवाय, दाक्षिणात्य लोक आपली संस्कृती, देव-धर्म कसे जपतात याचे सादरीकरणदेखील फार सुंदरपणे केले आहे.
‘पुष्पा 1’ असो किंवा ‘पुष्पा 2’ असो, या चित्रपटाचा ‘युएसपी’ हे त्यातील प्रत्येक संवाद आणि फायटिंग सिक्वेन्स आहेत. त्याशिवाय, दाक्षिणात्य चित्रपट बिग बजेट असतात, म्हणजे काय? तर चित्रपटनिर्मितीचा खर्चच 400 ते 500 कोटी इतका का असतो आणि तो खर्च पडद्यावर कसा झळकतो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘पुष्पा 2’. घराच्या अंगणात अनेक चार चाकी गाड्या तर उभ्या आहेतच, पण स्वतःचे हेलिकॉप्टर असणार्या पुष्पाचा थाटच काही निराळा आहे. त्याशिवाय भव्य सेट आणि चित्रपटाचे भव्य सादरीकरण बिग बजेट चित्रपट का आहे, याचे उत्तर आपणहून देतो. खरे तर चित्रपटाची कथा फार साधी-सोपी आहे. म्हणजे एका कुख्यात गुंडाला पकडण्यासाठी पोलीस करत असणारी धडपड आणि या सगळ्यात एकमेकांवर करण्यात आलेल्या पलटवारांमुळे, एकमेकांच्या मनात तयार होणारी सूडभावना. पण एकीकडे व्यवसायात येणार्या अडचणी आणि दुसरीकडे नातेसंबंध जपण्याची संकल्पना, फारच रंजक वाटते. प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यासाठी फायटिंग सीक्वेन्स, पुष्पा हा आपल्यातीलच एक सामान्य माणूस कसा वाटेल, यासाठी डिझाईन केलेले काही ठराविक प्रसंग, कथेला साजेसे पार्श्वसंगीत आणि चित्रपटातील प्रत्येक गाणे एकही क्षण रटाळवाणे वाटत नाही. त्यामुळे प्रत्येक प्रसंगात किंवा पुष्पाच्या प्रत्येक संवादाला प्रेक्षकांच्या टाळ्या, शिट्या कशा येतील, याची विशेष खबरदारी लेखक-दिग्दर्शकांनी घेतली आहे, यात काहीच शंका नाही.
‘पुष्पा 2’ चित्रपटाची कथा सुंदर आहे, सादरीकरण उत्तम आहे आणि याचे सगळे श्रेय जाते, ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेता अल्लू अर्जुन याला. तेलुगू चित्रपटसृष्टीला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा हा पहिला अभिनेता असून, त्याने पुन्हा एकदा आपले अलौकिक अभिनय कौशल्य सादर करून स्वतःला सिद्ध केले आहे. जसा पुष्पा राज्यातीलच नव्हे, तर देश आणि जगभरातील राजकीय नेत्यांना त्याची दखल घेण्यास भाग पाडतो, अगदी तशीच दखल आपल्या उत्कृष्ट अभिनयाच्या सादरीकरणामुळे जगभरातील प्रेक्षकांना दखल घेण्यास भाग पाडण्याचे काम, अल्लू अर्जुनने केले आहे. मग गुंडाच्या रुपातील अल्लू असो किंवा मग महाकालीमाता अंगात आल्यावर त्याने घेतलेले रौद्र रुप असो. प्रत्येक भूमिका त्याने अगदी चोख बजावली आहे. याशिवाय, चित्रपटातील खलनायक असलेला अभिनेता फहाद फासिल याने देखील अल्लू अर्जुनला टक्कर देणारा अभिनय सादर केला आहे. खरे तर, धिप्पाड नायकाच्या समोर धिप्पाडच खलनायक असावा, ही भूमिका दिग्दर्शकांनी न घेता, आपल्या कृतीतून तो खलनायक किती क्रूर आणि मोठा आहे दाखवण्याचा विचार कल्पकच आहे. चित्रपटात रश्मिका मंदाना हिने पुष्पाच्या बायकोची श्रीवल्लीची भूमिका सादर केली आहे खरी, पण संपूर्ण तीन तासांच्या चित्रपटात केवळ एकाच प्रसंगात तिला तिचा अभिनय सादर करण्याची संधी मिळाली आहे, असेच म्हणावे लागेल.
बरे, पुष्पराज याचे राज्य दुसर्या भागात संपत नाही, तर आता त्याच्या व्यवसायात आणि वैयक्तिक जीवनात नवा अध्याय सुरू होणार असून, ‘पुष्पा 3’ भेटीला येणार आहे. चित्रपटाच्या शेवटी ‘पुष्पा 3’ची अधिकृत घोषणा करण्यात आली असून , सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोनुसार अभिनेता विजय देवरकोंडाची पुष्पा चित्रपटात एन्ट्री होणार असे दिसत आहे. त्यामुळे आता ‘पुष्पा 3’ मध्ये काय घडणार, याची अधिक उत्सुकता प्रेक्षकांना लागली असेल, यात शंकाच नाही.
चित्रपट ः पुष्पा 2
दिग्दर्शक ः सुकुमार
कलाकार ः अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना, फहाद फासिल
रेटिंग ः