मुंबई, दि.५ : विशेष प्रतिनिधी "समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास झाला. जालना, संभाजीनगरचे चित्र बदलले आहे. महाराष्ट्राचे औद्योगिक केंद्र आता पुण्याप्रमाणेच संभाजीनगर आणि जालनाकडे विस्तारताना दिसेल. त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचे चित्र बदलेल. मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग उभारण्यात येईल ", असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री होताच देवेंद्र फडणवीस यांनी माहिती की, पायाभूत सुविधांमध्ये आपला भर नदीजोड प्रकल्पाचे काम सुरु व्हावे यावर असेल, सौरऊर्जेचे जे प्रकल्प सुरु केले आहेत त्यात २०२६पर्यंत १६००० मेगावॅटचे सौरऊर्जा प्रकल्प सुरु करायचे आहेत. हे प्रकल्प शाश्वत विकासाचे प्रकल्प असून याचा फायदा शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांना होणार आहेत. पायाभूत सुविधांच्या कामांवर नजर ठेवण्यासाठी मागील काळासारखीच वॉररुम असेल. जलयुक्त शिवार योजनेला गती देण्यात येईल, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
शक्तीपीठ महामार्गाबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,"शक्तीपीठ महामार्गाला सांगली जिल्ह्यापर्यंत पूर्ण समर्थन आहे. शेतकरी आमच्याकडे येऊन सांगत आहेत की, भूसंपादन करा. या महामार्गाला कोल्हापूर जिल्ह्यात विरोध आहे. आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला तेव्हा आम्ही विरोध पत्कारून नाही तर शेतकऱ्यांना समजावून सांगून केला. त्यामुळे आमचा प्रयत्न हा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची आरेखन अंतिम करायची. जिथे विरोध होतोय तिथे चर्चा करून काही उपाय मिळतोय का? याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. शेतकऱ्यांना नाराज करून, त्यांच्या जमिनी घेऊन विका करण्याची मानसिकता आमची नाही. त्यामुळे काही पर्यायी रस्ते तयार करण्यात येतील किंवा अस्तित्वात असणाऱ्या हायवेला कोल्हापूरजवळ कुठे जोडणी देता येईल का, उड्डाणपूल उभारता येईल याचा विचार केला जाईल. या महामार्गाच्या उभारणीवर माझा केवळ यासाठी जोड आहे की, जसं समृद्धी महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भाचा विकास झाला. जालना, संभाजीनगरचे चित्र बदलले आहे. महाराष्ट्राचे औद्योगिक केंद्र आता पुण्याप्रमाणेच संभाजीनगर आणि जालनाकडे विस्तारताना दिसेल. त्यामुळेच शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाड्याचे चित्र बदलेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
"मागील पूर्ण वर्षात जो काही एफडीआय आला त्याच्या ९० टक्के एफडीआय हा केवळ सहा महिन्यात आला आहे. त्यामुळे मोठ्याप्रमाणात गुंतवणूक येत आहे. अनेक कंपन्या महाराष्ट्रात येऊ इच्छित आहेत तसेच महाराष्ट्रात हे उद्योग आल्यास मोठ्याप्रमाणावर रोजगार निर्मिती होईल, असं उद्योगांशी यासंदर्भातील चर्चा आता अंतिम टप्प्यात आहे. लवकरच मी नव्या उद्योगांची घोषणा करणार आहे," अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.