"हिंदूंवर होणारा अन्याय थांबवा..." सय्यद अहमद बुखारींनी युनुस सरकारला बजावले!
04-Dec-2024
Total Views | 126
नवी दिल्ली : (Syed Ahmed Bukhari) दिल्लीच्या जामा मशिदीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांनी मंगळवार, दि. ३ डिसेंबर रोजी बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर होणाऱ्या अन्यायाला"निंदनीय" म्हटले आहे. तसेच बांगलादेशाच्या युनुस सरकारला ही कृत्ये थांबविण्यासाठी विनंती करत त्वरित पावले उचलण्याचे आवाहन केले.
ते म्हणाले, "एक विश्वासू शेजारी, बांगलादेशचा जवळचा मित्र आणि सामायिक सांस्कृतिक वारसाचा संरक्षक म्हणून आम्हाला आशा आहे की, बांगलादेशचे मुहम्मद युनूस हिंदू अल्पसंख्याकांवरील अन्यायाला आळा घालण्यासाठी तातडीने तोडगा काढतील.
हिंसाचार करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी - शाही इमाम
शाही इमाम अहमद बुखारी यांनी बांगलादेशातील अलीकडच्या घडामोडींचा दाखला देत ते म्हणाले की, युनूसने मुस्लिम बहुल राष्ट्र म्हणून आपली आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मलीन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हिंदूंवरील हिंसाचारावर त्वरित कारवाई करण्याचा सल्ला दिला आहे. इस्लाम धर्म आणि इस्लामिक न्यायशास्त्राच्या सिद्धांतानुसार अल्पसंख्याकांविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या अन्याय आणि भेदभावाला परवानगी देत नाही, असे त्यांनी एका पत्रात म्हटले आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये शेख हसीना यांच्या राजीनामानंतर झालेल्या सत्ताबदलाने बांगलादेशात अल्पसंख्याकांवर, विशेषत: हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण वाढल्याने भारताकडून सतत चिंता व्यक्त केली जात आहे. इतिहासातील घटनांचे दाखले देत भारत आणि बांगलादेश यांच्या निर्मितीपासून बांगलादेश हा नेहमीच जवळचा मित्र म्हणून पाठीशी उभा राहिला असल्याचे ते पुढे म्हणाले आहेत.