मारकडवाडीतील मर्कटचाळे

    04-Dec-2024   
Total Views |

MARKADWADI
 
सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी हे गाव गेल्या तीन-चार दिवसांपासून भलतेच चर्चेत आहे. या गावातील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घेण्याचा घाट घातला होता. आता कोणालाही प्रश्न पडेल की, हे सगळे पराभूत उमेदवाराचेच कारस्थान असावे. पण, नाही, हा सगळा डाव रचला तो चक्क विजयी उमेदवारानेच. माळशिरस मतदारसंघातून विजयी झाले ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ. उत्तमराव जानकर. त्यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा १३ हजार, १४७ मतांनी पराभवदेखील केला. म्हणजे हा फरक थोडाथोडका, शे-दोनशेचाही नसून, दहा हजारांहूनही अधिक. मग विजयी माळ गळ्यात पडल्यानंतरही ईव्हीएमच्या नावाने बोटे मोडण्याचा करंटेपणा एखाद्याने का दाखवावा, हाच खरा प्रश्न. त्यातच एखाद्या विशिष्ट गावातील मतसंख्येवरच उत्तमरावांचा आक्षेप. जानकरांच्या म्हणण्यानुसार, मारकडवाडीतून त्यांना यापूर्वीच्या निवडणुका, २०२४च्या लोकसभा निवडणुकीतूनही बहुतांशी मतदान झाले होते. मग असे एकाएकी विधानसभेला वारे कसे फिरले, असा त्यांचा प्रश्न. जानकर म्हणतात, “माझ्या अभ्यासानुसार मला या गावात १ हजार, ४०० आणि समोरच्याला ५०२ इतकी मते पडली. पण, निकालावेळी समोरच्या उमेदवाराला मारकडवाडीतून १ हजार,०३ मते पडल्याचे समोर आले. समोरच्या उमेदवाराला दुप्पट मतदान झाले,” असा आरोप करीत जानकरांनी सर्व खापर ईव्हीएमवर फोडले. मग काय, गावकर्‍यांची माथी भडकावून गावामध्ये फेरमतदानाचा घाट घालण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला. निवडणूक आयोगाने रीतसर स्पष्टीकरण दिल्यानंतरही ग्रामस्थ मतदानावर ठाम होते. पण, पोलिसांनी संपूर्ण गावात जमावबंदीचे कलम लावून हा प्रयत्न हाणून पाडला. अखेर जानकरांनीही माघार घेतली. पण, अशाप्रकारे मतदान प्रक्रियेला जनतेच्या डोक्यावर बंदूक ठेवून आव्हान देण्याचा अट्टहास जानकरांनी का केला? की असे काही करुन जानकरांचा केवळ पवार साहेबांना खुश करण्याचा हा बालिश प्रयत्न होता? शिवाय या सगळ्या घडामोडींमागे सोलापूरच्या एका नामांकित राजकीय घराण्याचा हातही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ते काहीही असले तरी अशाप्रकारे लोकशाही प्रक्रियेवर मुद्दाम अविश्वास दाखविण्याचे हे प्रयत्न सर्वस्वी घातकच. कारण, लोकांकडूनच फेरमतदानाचा असा चुकीचा पायंडा हा लोकशाही मूल्यांनाच नख लावणारा ठरु शकतो.
विरोधक मगरींचे अश्रू ढाळे...
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यापासूनच ईव्हीएमविरोधातील उरबडवेगिरीला अक्षरश: ऊत आला. आपल्या पराभवाचे खापर मविआतील तिन्ही पक्षांसह अन्य लहानमोठे पक्षही ईव्हीएमवर फोडून मोकळे झाले. पण, काही महिन्यांपूर्वीच झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये याच मविआची सरशी झाली होती. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांपैकी ३१ मतदारसंघात मविआने आघाडी घेतली, तर महायुतीला १७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तसेच केंद्रातही भाजपला पूर्ण बहुमत न मिळता सत्तास्थापनेसाठी मित्रपक्षांची मदत घ्यावी लागली. पण, त्यावेळीही भाजपने ईव्हीएमवर कोणताही आक्षेप न नोंदवता जनमताचा कौल मोठ्या मनाने मान्य केला. पण, जूनमधील लोकसभेचे निकाल आणि आताचे विधानसभेचे निकाल, यामध्ये इतकी तफावत कशी, याच प्रश्नाच्या गुंत्यात विरोधक अजूनही गुरफटले आहेत. म्हणूनच विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधी खोटेनाटे आरोप असतील किंवा ईव्हीएमविरोधी राज्यभर पदयात्रा काढण्याचे मनसुबे असतील, ते विरोधकांनी जाहीर केले. एवढ्यावरही जनमत सहजासहजी ईव्हीएमविरोधी वळविता येणार नाही, म्हटल्यावर ‘सिव्हिल सोसायटी’ आणि नंतर बाबा आढाव यांच्यासारख्या आंदोलनजीवींना यामध्ये उतरविण्याचा खटाटोप करुनही झाला. समाजमाध्यमांवरुनही ईव्हीएमविरोधी विविध क्लिप्स पसरवून बुद्धिभेदाचेही जोरदार प्रयत्न झाले. म्हणजे एकूणच काय तर जनतेचा विश्वासही या निकालावर बसू नये, अशाप्रकारे अपप्रचाराचे डावपेच खेळले गेले. पण, यंदा जनताही मविआच्या या खेळीला बळी पडलेले नाही आणि पडणारही नाही. खरे तर विरोधकांनी ईव्हीएमला पराभवाचे मूळ ठरविण्याचा करंटेपणा करण्यापेक्षा, विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवाचे एकएकटे नव्हे, तर सामूहिक चिंतन करणे अपेक्षित. कारण, मविआच्या पराभवाला महायुतीचे एकीचे बळ जितके कारणीभूत, तितकेच मविआतील अंतर्गत संघर्षानेही त्यांच्यासाठी खड्डा खणण्याचेच काम केले. पण, हे कळले तरी मविआतील नेत्यांना वळणार नाही, हेही तितकेच खरे. म्हणूनच अपयशाची जबाबदारी नेमकी कोणाच्या माथ्यावर मारायची, याचे मविआने शोधलेले एकमेव उत्तर म्हणजे ईव्हीएम! ते म्हणतात ना, यशाचे शंभर वाटेकरी असतात, पण इथे पराभवाचा एकच - ईव्हीएम!

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची