नवी दिल्ली : वारंवार स्थगन प्रस्तावांद्वारे लोकसभेचे कामकाज चालू दिले नाही तर रविवारीदेखील कामकाज चालवण्यात येईल, असा इशारा लोकसभा ( Loksabha ) अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षांच्या खासदारांना दिला.
हिवाळी अधिवेशनाच्या सहाव्या दिवशीही संसदेत गदारोळ झाल्याने लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करावे लागले. गेल्या आठवडाभरापासून सभागृहाचे कामकाज सुरळीत होऊ शकलेले नाही. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही कामकाज वारंवार तहकूब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंगळवारी सदस्यांना ताकीद दिली की, स्थगितीमुळे सभागृहाच्या कामकाजात आणखी व्यत्यय आल्यास त्यांना वेळेच्या नुकसानीची भरपाई करावी लागेल. प्रश्नोत्तराच्या तासानंतर लगेचच ओम बिर्ला म्हणाले की, शनिवारी, १४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होईल. जर स्थगन प्रस्ताव सुरूच ठेवले आणि सभागृह तहकूब होत राहिल्यास, सभागृह जेवढे दिवस तहकूब केले जाईल; तेवढे शनिवार आणि रविवारी कामकाजाला उपस्थित राहावे लागेल, असे बिर्ला यांनी स्पष्ट केले.